मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बुलेटराणी! भारतातील खडतर प्रवास बाईकने पूर्ण करणारी पहिली तरुण मुलगी म्हणते..

बुलेटराणी! भारतातील खडतर प्रवास बाईकने पूर्ण करणारी पहिली तरुण मुलगी म्हणते..

"मी ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी विरोध केला. पण, मी स्मितहास्य करुन म्हटलं, "तिला थोडी माहितीय की पुरुष चालवतोय की महिला". हे मी म्हणून गेले खरी, पण.. : डिंपल सिंग, मुंबई.

"मी ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी विरोध केला. पण, मी स्मितहास्य करुन म्हटलं, "तिला थोडी माहितीय की पुरुष चालवतोय की महिला". हे मी म्हणून गेले खरी, पण.. : डिंपल सिंग, मुंबई.

"मी ज्यावेळी हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी विरोध केला. पण, मी स्मितहास्य करुन म्हटलं, "तिला थोडी माहितीय की पुरुष चालवतोय की महिला". हे मी म्हणून गेले खरी, पण.. : डिंपल सिंग, मुंबई.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

चौदाव्या दिवशी मी जेव्हा दोन्ही बाजूंनी चाळीस फूटांपर्यंत बर्फ असलेल्या निसरड्या ओल्या रस्त्यावरुन बुलेट चालवत होते. तेव्हा मी माझ्या ध्येयाच्या आणखी जवळ जात होते. दिवसभर गाडी चालवून अंग शिणलं होतं. सचपास पर्वताचं टोक दृष्टीक्षेपात आलं अन् आपोआप रेसची मुठ आवळली गेली. गाडीचा वेग वाढला तसा माझ्यातला उत्साहही दुणावला. जसजसे शेवटचं शिखर जवळ येत होतं, तसा माझा सुरुवातीपासूनचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर तरळू लागला. अनेकांचा विरोध, नाराजी पत्करुन मी इकडे आल्याचं मला आठवत होतं. अन् अखेर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहचले. गाडी बंद केली तसं मला समोरचं सगळं मोठं दिसू लागलं. गालावर ओघळ आले. मी आवंढा गिळला, माझे इतर सहकारीही एकएक करुन येत होते. गाडी स्टँडवर लावली.. पण, मला कंट्रोल झालं नाही, माझा एकएक हुंदका बाहेर पडू लागला. कशीबशी मी सचपास मंदिरासमोर आले, गुडघे टेकले अन् आतापर्यंत दाबून ठेवलेल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली...

मी डिंपल सिंग, माझा जन्म मुंबईतला. वडिलांकडे बुलेट गाडी होती. त्यामुळे लहानपणापासून बुलेट चालवण्याचं आकर्षण होतं. पण, कधी संधी मिळाली नाही. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना खेळ 'माझा जीव की प्राण' झाला. व्हॉलीबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवर 9 वेळा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय. यात चारवेळा कर्णाधारही होते. खेळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी जाण्यासाठी प्रवास करावा लागायचा, त्यातूनच मला प्रवासाची आवड लागली. नंतर जॉब लागल्यानंतर सगळं सुटलं होतं.

अशातच सोशल मीडियावर बुलेट रायडींग शिकवत असल्याची जाहिरात पाहिली. मी त्यात भाग घेतला आणि दोन दिवसात गाडी शिकले. त्याच वर्षी 2018 मध्ये मी बुलेट घेण्याचा निर्णय घेतला. मी बुलेट घेणार म्हटल्यावर अनेकजण म्हणाले झेपेल का? जमेल का? गाडी घेण्याचं खुळ डोक्यातून काढून टाक. मी थोडी निराश झाले. पण, बुलेट घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. माझ्या कुटुंबियांनी मात्र मला पाठींबा दिला. यात माझी आई सर्वात पुढे होती. माझ्या आईला तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी करता आल्या नाही. त्यामुळे 'डिंपल तू लढ, मी आहे पाठीशी' अशीच ती नेहमी म्हणत असते. या वेळेलाही ती धावून आली. पुढच्या पाच दिवसात माझ्याकडे बुलेट होती. बुलेट घेतानाही मी 500 स्टँडर्ड निवडली, जी माझ्या वडिलांच्या जुन्या बुलेटशी मिळतीजुळती आहे. जी किक मारुन स्टार्ट होते.

बुलेट घेतल्यानंतर काही महिन्यात मुंबईच्या आसपासचे सर्व रोड, रस्ते, घाट फिरुन झाले. त्यामुळे गाडी बऱ्यापैकी हातात बसली होती. 'डिंपलची सुट्टी म्हणजे बाईक रायडींग' हे एव्हाना सगळीकडे झालं होतं. आता मला मोठ्या प्रवासावर जाण्याची इच्छा होत होती. सामान्यपणे लोकं हळूहळू प्रवासाचा टप्पा वाढवतात. म्हणजे आधी राज्यात, नंतर शेजारच्या राज्यात.. असे करत मग मोठ्या प्रवासासाठी बाहेर पडतात. मी याला अपवाद ठरले. मी छोट्यामोठ्या राईडनंतर थेट जगातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या “सचपास” आणि “स्पिती व्हॅलीत” जाण्याचा निर्णय घेतला. वर्ष होतं 2019. यावेळीही मला लोकांचा विरोध झाला. इतक्या दूर जायला खूप अनुभव लागतो, तुला जमेल का? वैगेरे लोक म्हणू लागले. पण, मी विचार केला की कधीतरी हे करावच लागणार आहे, त्यावेळीही माझी पहिलीच वेळ असेल. आणि "बुलेटला थोडी माहितीय की पुरुष चालवतोय की महिला".

खेळाची पार्श्वभूमी असल्याने लवकर माघार घेणं माझ्या स्वभावातच नाहीय. त्यामुळे मी कोणाचंही न ऐकता तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे आईचा सर्वात आधी होकार मिळाला. सचपास आणि स्पिटी व्हॅलीत जाण्यासाठी आमचा दहा जणांचा ग्रुप होता. यात दोन मुली आणि आठजण मुलं होते. मी सोडले तर प्रत्येकजण अनुभवी होता. मात्र, माझ्या आत्मविश्वास सांगत होता की मी हे करू शकते. हिमाचल प्रदेशातील हा रस्ता पूर्णपणे ऑफरोड आहे. चाळीस फूट उंच बर्फाच्या मधून गाडी चालवणे त्यातही रस्ता ओला असताना कठीण गोष्ट आहे. त्यात हाडं गोठवणारी थंडी, त्यामुळे ही गोष्ट आणखी आव्हानात्मक होते. अश्या रस्त्यावरून बाईक चालवण्याचा मला कोणत्याही प्रकारचा अनुभव नव्हता. पण मी निर्धार पक्का केला होता. मनाची तयारी केली की काहीही झालं तरी मागे फिरायचं नाही.

निमुळते रस्ते, खड्डे आणि पाणी साचलेले निसरडा रस्ता, डोंगर दऱ्यातून वाट काढत, थंडीत धोकादायक वळणं पार करीत बाईक चालवणे हे खूप परिश्रमाचे काम आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भीतीचा लवलेश येऊ न देता मी स्वतः वर विश्वास ठेवून ही राईड पूर्ण केली. जेव्हा मी (सचपास) माझ्या प्रवासातील शेवटचे टोक गाठले तेव्हा खूप भावनाविवश झाले होते. मला जाणीव झाली की आयुषयात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, अडथळ्यांना देखील आत्मविश्वासाने मात करू शकतो. मग तिथे 15 हजार 500 फुटावर असणाऱ्या सचपास मंदिरात जाऊन इथपर्यंत पोहचण्यासाठी बळ दिल्याबद्दल देवाचे आभार मानले.

मी वर सांगितल्याप्रमाणे ऑफरोड, ओला रस्ता, हाडं गोठवणारी थंडी.. हे सगळं खरं असलं तरी मी मुंबईतून निघाल्यापासून डेस्टीनेशनला पोहचेपर्यंत जो प्रवास अनुभवत होते, तो शब्दबद्ध करणे अवघड आहे. असं म्हणतात की काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागतो. ही ट्रीप तशीच आहे. मुंबईसारख्या दमट वातावरणात राहत असलेली मी नैसर्गिक सौंदर्याची उधळण केलेल्या या प्रदेशात आल्यानंतर माझ्या भावना स्वर्गात आल्यासारख्या होत्या. कडाक्याची थंडीही मला गुलाबी थंडीसारखी भासत होती. मी ज्यावेळी प्रवासाला सुरुवात केली त्यावेळी माझ्या नावावर कुठलातरी रेकॉर्ड होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण, योगायोगाने या खोऱ्यात येणारी मी देशातील सर्वात तरुण मुलगी ठरले. यासाठी माझ्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

आज मला जास्त आनंद आहे मी इतरांचे न ऐकता स्वतःवर विश्वास ठेवला. माझा स्वतःवर विश्वास नसता तर तो आनंदी क्षण माझ्या आयुष्यात कधीच आला नसता. I hold an India Book of record, “Youngest rider to ride”. मी या निमित्ताने सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते, स्वतःवर विश्वास ठेवा, भीतीला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. काहीही झालं तरी तुमच्या आवडींचा स्वप्नांचा पाठलाग करा!

डिंपल सिंग, मुंबई.

First published:

Tags: Bike riding, Digital prime time