मुंबई, 21 जून- International Yoga Day: आज जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. 2015 पासून दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांनी 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणावेळी योग दिवसाचा प्रस्ताव सादर केला होता. यानंतर हा प्रस्ताव मान्य होऊन 2015 पासून योग दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला. योग हा शरीरासाठी जेवढा फायदेशीर आहे तेवढाच किंबहूना त्याहून जास्त फायदेशीर मानसिक पातळीवर आहे.
रोजच्या धकाधकीच्या जिवनात काम आणि वेळेचा ताळमेळ घालणं हे प्रत्येकासाठीच मोठं आव्हान आहे. अनेकजण दिवसातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये असतात. कामाचा ताण आणि आयुष्यातील चढ- उतारांमुळे अनेकांना शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. ऑफिसमध्ये खूप वेळ खुर्चीवर बसून काम केल्याने अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी असे अनेक आजार जडतात. कामाच्या व्यापामुळे खुर्ची सोडणेही शक्य नसल्याने आरामदेखील मिळत नाही. वेळेच्या अभावामुळे घरी व्यायाम करणे तुम्हाला शक्य नसेल तर, ही आसनं ऑफिसमध्येच बसून करता येऊ शकतात.
मान गोलाकार फिरवणे-
प्रथम पायातील चप्पल काढुन खु्र्चीवर निवांत बसावे. डोळे मिटून घ्यावेत आणि शांतपणे बसावे. हनुवटीला मानेला लावून उजव्या बाजूपासून डावीकडे फिरवावी. सुरुवातीला ही क्रिया 5 वेळा करावी. त्यानंतर उलट्या दिशेने ही क्रिया परत करावी. खांद्यांवर जोर न देता हा व्यायाम करावा. या आसनाने तुमच्या मानेला आणि खांद्यांना आराम मिळेल.
मानेला वाकवा-
पायांना जमिनीलगत ठेऊन, हातांना गुडघ्यावर ठेवावे. हळुहळु श्वास घ्या आणि मानेला वरच्या दिशेने न्यावे. श्वास सोडताना सावकाश मानेला खाली करावे. 5 वेळा ही क्रिया केल्याने मानेच्या हाडांना आराम मिळेल व ते मोकळे होतील.
हातांना छातीवर ठेवा-
खुर्चीवर पाय दुमडून बसा. डावा हात मांडीवर ठेवून डोळे बंद ठेवून शांतपण बसा. श्वाासांवर लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर डोळे उघडून उजव्या हाताने कपासारखा आकार करावा आणि तो ह्रदयाच्या बाजूवर ठेवावा. सुरुवातीला ही क्रिया 25 ते 50 वेळा करावी. हृदयासाठी ही क्रिया फार उपयुक्त आहे.