मुंबई, 09 डिसेंबर : द्राक्षं आवडत नाही, अशी व्यक्ती सापडणं तसं अवघडच आहे. द्राक्षांच्या हंगामात आवर्जून द्राक्षं विकत घेऊन खाणाऱ्यांची संख्या मोठी असते. आपल्याकडची द्राक्षं साधारण 100 ते 150 रुपये प्रति किलो दराने मिळतात. त्यामुळे ती सर्वसामान्यांच्याही आवाक्यात असतात; मात्र जपानमध्ये द्राक्षांची एक अशी जात आहे, की त्या जातीच्या 26 द्राक्षांच्या घडाची किंमत तब्बल 9 लाख रुपयांच्या आसपास असू शकते. म्हणजेच एका द्राक्षाची किंमत 35 हजार रुपये झाली. खरं वाटत नसलं तरी हे खरं आहे. तसंच, या द्राक्षांची विक्री होत नाही, तर लिलाव होतो. याबद्दल अधिक जाणून घेऊ या.
जपानमध्ये इशिकावा नावाच्या भागात द्राक्षांच्या या जातीची शेती केली जाते. या जातीचं नाव रुबी रोमन असं आहे. ही द्राक्षं सर्वसाधारण द्राक्षांच्या तुलनेत आकाराने चौपट मोठी असतात. तसंच, ही अन्य द्राक्षांच्या तुलनेत अधिक रसदार आणि गोड असतात. ही जात दुर्मीळ असल्याने या द्राक्षांची किंमत खूप जास्त असते. या द्राक्षांच्या एका घडात 24 ते 26 द्राक्षं असतात. 2022मधल्या लिलावात याच्या एका घडाला 8.8 लाख रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. 2021मध्येही साधारण एवढाच भाव मिळाला होता, असं बिझनेस इन्सायडरच्या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचा - ही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा
बिझनेस इन्सायडरच्याच वृत्तानुसार, सर्वप्रथम 2008मध्ये या जातीच्या द्राक्षांचा लिलाव करण्यात आला होता. तेव्हा 700 ग्रॅम वजनाच्या एका घडाला 910 अमेरिकी डॉलर्स अर्थात 64 हजार 800 रुपये भाव मिळाला होता. म्हणजेच तेव्हा एका द्राक्षाची किंमत 1800 रुपये एवढी होती. 2016मध्ये 26 द्राक्षांच्या एका घडाला 11 हजार डॉलर्स अर्थात 7 लाख 84 हजार रुपये एवढी किंमत मिळाली होती.
इशिकावाफूड नावाच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या द्राक्षांमध्ये साखरेचं प्रमाण, तसंच रसदारपणा जास्त असतो. हे द्राक्ष एकदा तोंडात टाकलं, की लगेचच त्याची गोडी संपूर्ण रसनेचा ताबा घेते. यांची किंमत खूप जास्त असल्याने ही द्राक्षं जपानच्या लक्झरी आयटेम्सच्या श्रेणीत समाविष्ट होतात. शुभ प्रसंगी किंवा काही मोठ्या कार्यक्रमांमध्ये भेट देण्यासाठी म्हणूनही या महागड्या द्राक्षांचा वापर तिथे केला जातो.
या द्राक्षांच्या शेतीची सुरुवात कशी झाली, हेही जाणून घेऊ या. जपानमधल्या इशिकावा इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी 1998 साली प्रीफॅक्चरल कृषी संशोधन केंद्राकडे अशी मागणी केली होती, की केंद्राने लाल रंगाच्या द्राक्षांची जात विकसित करावी. 400 वेलींवर त्या संदर्भातला प्रयोग करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनी त्या वेलींवर फळधारणा झाली. त्या 400पैकी केवळ 4 वेलींवर लाल रंगाची फळं आली. त्यापैकीही केवळ एकच जात उपयोगाची ठरली. त्या एका निवडक जातीची शेती आता शास्त्रज्ञांची टीम करते. द्राक्षांचा रंग, आकार, चव आदी बाबींकडे विशेष लक्ष दिलं जातं, अशी माहिती इशिकावाफूड या वेबसाइटने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.