हृदयविकार ही आता फक्त ‘पुरुषांची समस्या’ राहिलेली नाही. अलीकडच्या काळात स्त्रियांनादेखील हार्ट अॅटॅकसारख्या हृदयविकाराचा सामना करावा लागत आहे. खरं तर, विविध प्रकारचे हृदयविकार हे जगभरातील स्त्री आणि पुरुष दोघांच्या मृत्यूचं प्रमुख कारण ठरत आहेत. गायक केके, कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार, टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्यासह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर हृदयविकारांच्या वाढत्या घटनांबाबत गांभीर्यानं चर्चा सुरू झाली आहे. प्रामुख्यानं सर्व चर्चा पुरुष शरीरशास्त्राच्या दृष्टीकोनातून होत आहेत. पुरुष चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पण,स्त्रियांमध्येदेखील हृदयविकारांच्या त्रासाचं प्रमाण वाढत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांना कशामुळे हार्ट डिसिजेस होत आहेत?हे जाणून घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, स्त्रिया आणि पुरुषांची आपापली स्वतंत्र शारीरिक आणि हॉर्मोनलवैशिष्ट्ये आहेत. याचा परिणाम हृदयरोग आणि स्ट्रोकच्या रिस्कवर होऊ शकतो. हार्ट अॅटॅकदरम्यान स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी लक्षणं जाणवतात, ही बाब तुम्हाला माहिती आहे का? थकवा येणं, धाप लागणं आणि छातीत दुखण्याऐवजी जबडा किंवा पाठदुखी होणं, अशी ही लक्षणं आहेत. स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी लक्षणं जाणवत असल्यानं निदान कमी होतं आणि उपचार मिळण्यास उशीर होतो, हे सर्वात मोठं आव्हान आहे. अनेकदा, स्त्रियांना जाणवणाऱ्या लक्षणांचं चुकीचं निदान केलं जातं. यामुळे हृदयाच्या आरोग्याबाबत गंभीर चूक होऊ शकते. या शिवाय,स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक घटक मोठी भूमिका बजावतात. दिल्ली-एनसीआरमधील अमृता हॉस्पिटलमधील कार्डिऑलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विवेक चतुर्वेदी म्हणतात, “स्त्रियांना हृदयविकारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळतं,असा एक व्यापक गैरसमज आहे. वास्तविक हे खरं नाही. स्त्रियांनाही हार्ट अॅटॅकसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.”
डॉ. चतुर्वेदी म्हणाले की, ह्युमॅटिक मिट्रल व्हॉल्व्ह डिसीज आणि टाकायासु आर्टेरिटिस यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. हायपरटेन्शन-संबंधित हृदयविकारांसारख्या आजारांचं प्रमाण पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान आहे. पुरुषांना हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो,तर स्त्रियाही यात मागे नाहीत. ते म्हणाले, “विशेषतः सध्याच्या काळात अशी परिस्थिती दिसत आहे. स्त्रिया जीवनशैलीशी संबंधित अनेक रिस्क फॅक्टर्सचा सामना करत आहेत. तुलनेनं पुरुषांचा या फॅक्टर्सशी कमी सामना होतो.” ते पुढे म्हणाले की,हृदयविकारांनी ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये वारंवार असामान्य लक्षणं दिसू शकतात. सामाजिक-सांस्कृतिक असमानतेमुळे अनेकदा निदानास आणि उपचार मिळण्यात उशीर होतो,हेदेखील लक्षात घेण्यासारखं आहे. प्रमुख लक्षणं काय आहेत? सामान्यपणे हार्ट अॅटॅक आल्यावर छातीमध्ये तीव्र वेदना होतात. पण,स्त्रिया याकडे हार्ट अॅटकचं लक्षण म्हणून बघत नाहीत. त्याऐवजी त्या, छातीवर ताण आल्याचं सांगतात. मान, जबडा, खांदा, पाठीचा वरचा भाग दुखणं किंवा ओटीपोटात वेदना होणं,यांचा समावेश इतर लक्षणांमध्ये होतो. याशिवाय,काही स्त्रिया श्वास घेण्यास त्रास होणं,एका किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना जाणवणं, मळमळ किंवा उलट्या होणं, घाम येणं आणि डोकेदुखीचीही तक्रार करतात. स्त्रियांना काय धोका आहे? गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयातील फोर्टिस हार्ट अँड व्हॅस्क्युलर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. टी.एस. क्लेअर यांनी न्यूज18ला सांगितलं की,काही घटक हृदयविकाराच्या विकासात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये मोठी भूमिका बजावू शकतात. ते म्हणाले, “जर एखाद्या स्त्रीला डायबेटिस असेल तर तिला हृदयविकार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते. या शिवाय,जर तिला भावनिक ताण किंवा नैराश्याची समस्या असेल तर त्याचा परिणाम पुरुषांपेक्षा तिच्या हृदयावर जास्त होईल. स्मोकिंगमुळेही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या हृदयाला जास्त धोका असतो. फॅमिली हिस्ट्रीतून उद्भवणाऱ्या हृदयरोगांचाही धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच जास्त असतो”. Weight Gain : प्रयत्न करूनही वजन वाढत नाही? घरातील ‘या’ पदार्थांच्या सेवनाने होईल फायदा अहमदाबादमधील नारायणा मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट कार्डिऑलॉजिस्ट डॉ. व्योम मोरी यांच्या मते,मेनोपॉजच्या काळात स्त्रियांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल हे हृदयरोगांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉ. मोरी म्हणाले, “इस्ट्रोजेनच्या पातळीत घट झाल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये प्रतिकूल बदल होतात. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि जिस्टेशनल डायबेटिस व प्रीक्लेम्पसियासारख्या गर्भधारणेसंबंधी गुंतागुंतीमुळे स्त्रीला भविष्यात हृदयविकारांचा धोका वाढू शकतो.” हैदराबादस्थित यशोदा हॉस्पिटल्समधील इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. व्ही. राजशेखर यांनी पोलिश स्टडीचा संदर्भ दिला आहे. या स्टडीमध्ये असं निदर्शनास आलं आहे की,कोरोनरी आर्टरी डिसीजसह (सीएडी) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी इतर रोग हे स्त्रिया आणि पुरुषांमधील मृत्यूचं प्रमुख कारण आहेत. 2018मध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीमध्ये असं आढळलं आहे की, मृत्यूचं हे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. त्यात असंही म्हटलं आहे की, ‘अटिपिकल अंजायनल’लक्षणांची स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात नोंद होते. डॉ. राजशेखर म्हणाले, “स्त्रियांमध्ये,सीएडी समस्या कमी लेखली जाते. त्यामुळे कमी प्रमाणात निदान आणि उपचार होतात. हृदयविकारांमुळे सर्वात जास्त स्त्रियांचे मृत्यू होतात,हे अद्याप अनेकांना माहीत नाही. दुर्दैवानं,बर्याच जणींमध्ये हृदयविकार एक सायलेंट किलरची भूमिका बजावतो.” एका अभ्यासाचा संदर्भ देऊन डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं की,वयाच्या55वर्षांच्या आधी हृदयविकाराचा झटका आलेल्या जवळजवळ अर्ध्या स्त्रियांना त्यांची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. ज्या स्त्रियांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात त्यांच्या हृदयाच्या धमन्या लहान असतात. ज्यावर स्टेंट किंवा बायपासनं उपचार करणं अधिक कठीण असतं. स्त्रियांच्या हृदयाची चेंबर्स लहान आणि चेंबरच्या भिंती पातळ आहेत, ज्यामुळे गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या महिलांच्या शरीराच्या चर्येमध्ये फरक होऊ शकतो आणि त्याची औषध घेतल्यामुळे दुष्परिणामही होतात. याशिवाय,पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना एखाद्या दशकभर उशिरा हृदयाचे विकार जडतात. मात्र,ते जेव्हा लक्षात येतात तेव्हा ते जास्त गंभीर आणि त्यावर उपचार करणं अधिक कठीण असतं. समस्येवर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे? हावडा येथील नारायणा सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील अॅडल्ट कार्डिऑलॉजीचे सल्लागार डॉ. डेव्हिड रोझारियो यांनीही हेच मुद्दे अधोरेखित केले आहेत. स्त्रियांसाठी वय हा एक महत्त्वपूर्ण जोखमीचा घटक असल्याचंही ते म्हणाले आहेत. डॉ. रोझारियो म्हणाले, “स्त्रियांचं वय वाढलं की त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषत: मेनोपॉजनंतर स्त्रियांचा धोका पुरुषांपेक्षा जास्त वाढतो. स्त्रियांनी जोखमीच्या घटकांबद्दल जागरूक असणं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी सक्रिय पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम करणं,संतुलित आहार घेणं,तंबाखूचं सेवन टाळणं,तणावाचं व्यवस्थापन करणं आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणं या सर्व गोष्टी स्त्रियांमधील हृदयविकाराचा धोका कमी करण्यास हातभार लावू शकतात.” वैयक्तिक रिस्क फॅक्टर्स प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी हेल्थ केअर प्रोफेशनल्सशी सल्लामसलत करणं महत्वाचं आहे.