मुंबई, 11 डिसेंबर : दुबईला (Dubai) जाणं आणि तिथं खरेदी करणं, विशेषत: तिथून सोनं खरेदी (Gold Purchase) करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. कित्येकजण तर फक्त सोनं खरेदीसाठी दुबईला जातात असंही ऐकायला मिळतं. पण असं काय आहे दुबईच्या सोन्यामध्ये की अनेक लोकांना तिथेच खरेदी करावीशी वाटते? की अन्य देशांपेक्षा दुबईत खरोखरीच सोनं स्वस्त आहे? खरं तर जगात इतर कोणत्याही देशात गेलं की तिथं काय बघायचं, काय खायचं याची एक यादी असते. पण दुबईत मात्र शॉपिंगची यादी असते आणि त्यातही सोन्याचं शॉपिंग आवर्जून केलं जातं. दुबई सोनं खेरीदीसाठी फेवरिट डेस्टिनेशन का आहे, जाणून घेऊया - सगळ्यांत पहिलं कारण दुबईतल्या सोन्याची शुध्दता (Purity) सगळ्यांत जास्त असते असं मानलं जातं. अन्य देशांच्या तुलनेत दुबईतलं सोनं जास्त चांगलं असतं असं म्हणतात. आणि त्याच्या शुध्दतेमुळे दुबईतून सोनं घ्यायला अधिक पसंती दिली जाते. - आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दुबईत सोन्याचा दर बराच कमी आहे. दुबईत एक ग्रॅम सोन्याचा भाव 216.00 AED आहे आणि 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2160 AED आहे. भारतीय करन्सीमध्ये विचार केल्यास हा भाव 44107 रुपये इतका होतो. याचाच अर्थ दुबईत सोनं जवळपास 44 हजार रुपये दहा ग्रॅम या भावानं मिळतं. भारतात सोनं अर्थातच इतकं स्वस्त नाही. सध्या तरी सोन्याचा भाव आपल्याकडे साधारणपणे 49 हजार रुपये तोळा इतका आहे. म्हणजेच दुबईतून सोनं घेतलं तर प्रति 10 ग्रॅम मागे जवळपास 6 हजार रुपयांचा फायदा होतो. अर्थात हा भाव 24 कॅरेटचा आहे हे लक्षात घ्या. - तसंच दुबईत सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन्समध्ये खूप व्हरायटी मिळते असं म्हणतात. तिथं मिळणाऱ्या दागिन्यांवर नाजूक काम केलेलं असतं. त्यामुळे भारतात मिळणाऱ्या डिझाईन्सपेक्षा भारतीयांना दुबईत वेगळ्या प्रकारची डिझाईन्स मिळतात. त्यामुळेच अनेक भारतीय दुबईत जाऊन सोनं खरेदी करतात. किती सोनं आणता येतं? दुबईतून किती सोनं आणता येतं यावरही काही मर्यादा आहेत. अर्थात हे सगळं तुमचं सामान, तुम्ही तिथे किती दिवस होतात या सगळ्यावर अवलंबून असतं. अनेक वर्षांपासून परदेशात राहणारी व्यक्ती जर दुसऱ्या देशात गेली तर त्यांना काही सूट दिली जाते. पण तुम्ही फक्त तीन चार दिवसांसाठी परदेशी गेलात आणि मग लगेचच भारतात परतणार असाल तर त्यासाठीचे नियम वेगळे आहेत. एक वर्षापासून परदेशात राहणाऱ्या भारतीय महिलांना त्यांच्यासोबत 40 ग्रॅम सोनं आणण्याची परवानगी आहे. पुरुषांना फक्त 20 ग्रॅम सोनं सोबत आणता येतं. त्याशिवाय टूरवर, सहलीवर गेलेल्यांसाठीही वेगळे नियम आहेत. महिला एक लाख रुपयांपर्यंतचं तर पुरुष 50 हजार रुपयांपर्यंत सोनं खरेदी करु शकतात. कुटुंबातील व्यक्तींच्या नावावरही सोनं खरेदी केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सोन्याची जास्त खरेदीही करु शकता. एरवी आपण अमेरिका वा युरोपीय देश किंवा फिरण्यासाठी म्हणून इतर देशांमध्ये गेलो तर तिथं काय काय करायचं यादी वेगळी असते. दुबईत गेल्यावर प्रेक्षणीय स्थळं पाहण्याबरोबरच खरेदी आणि महत्त्वाची म्हणजे सोनं खरेदी यादीमध्ये असतंच. तुम्हीही कधी दुबईत गेलात तर सोनं खरेदी करण्याची संधी घालवू नका, पण नियम बघून.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.