जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / का वाढतेय आईच्या दुधाची मागणी? खरंच Bodybuilding साठी याचा वापर होतो का?

का वाढतेय आईच्या दुधाची मागणी? खरंच Bodybuilding साठी याचा वापर होतो का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आईचं दूध हे सर्वांत चांगलं असलं, तरी ते ताजंच सेवन करणं उत्तम असतं. त्याची साठवणूक करण्यासाठी काही निकष असतात. त्यांचं पालन न केल्यास अशा दुधामुळे आजार पसरू शकतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 17 ऑक्टोबर : बाळाच्या वाढीसाठी सर्वांत चांगलं असतं, ते आईचं दूध. या दुधामध्ये अनेक पोषणमूल्य असतात. लहानपणी मिळालेल्या या दुधामुळे बाळांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यांचा विकास चांगला होतो. काही मातांना दूध येण्यासंबंधी समस्या उद्भवतात. त्यांना त्यांच्या बाळांसाठी आईचं दूध मिळावं, या उद्देशानं काही वर्षांपूर्वी हे दूध साठवता येईल अशी योजना अस्तित्वात आली. आता तर अशाप्रकारे साठवलेल्या आईच्या दुधाची मागणी जगभरात वाढते आहे. भारतातही एक कंपनी साठवलेलं आईचं म्हणजे मानवी दूध विकत होती. मात्र भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं जुलैमध्ये त्यांचा परवाना रद्द केला आणि अशाप्रकारे अवैधरित्या आईचं दूध विक्रीवर कठोर बंधन आणली. गेल्या काही दशकांपासून आईच्या दुधाची मागणी समाजात वाढते आहे. भारत, कंबोडिया, अमेरिका आणि इंग्लंड यांसह जगभरातील अनेक देशांमध्ये आईच्या दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते आहे. या दुधापासून बनवलेले पदार्थही आता बाजारात उपलब्ध झाले आहेत. आईच्या दुधातील पोषणमूल्य नष्ट न करता हे पदार्थ तयार केले जातात. तसंच त्यांची पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यात आणखी पौष्टिक घटक मिसळले जातात. स्त्रियांना हे दूध ऑनलाईन उपलब्ध इंग्लंडमधील एक कंपनी स्तनपानाची समस्या असणाऱ्या स्त्रियांना हे दूध ऑनलाईन उपलब्ध करून देते. त्यामुळे या दुधाची मागणी वाढली आहे. इतकंच नाही, तर आजारी व्यक्ती, बॉडीबिल्डर आणि हेल्दी आहार घेणारे लोकही या दुधाचं सेवन करतात. अनेक वेळा हे दूध आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या संस्था व रुग्णालयांमध्ये पाठवलं जातं. या सगळ्यामुळे सध्या मानवी दुधाची मागणी वाढली आहे. भारतातही नियोलेक्टा लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (NLPL) ही कंपनी आईचं दूध विकत होती. मात्र जुलै महिन्यात भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणानं कंपनीचा परवाना रद्द केला. भारतात आईच्या दुधाच्या विक्रीला परवानगी नाही, असं FSSAI चं म्हणणं होतं. ही कंपनी 300 मिली दूध 4 हजार 500 रुपयांना विकत होती. इंग्लंडमध्ये 50 मिली दुधाची किंमत 4 हजार 300 रुपये (45 पाऊंड) आहे. या कारणामुळे आजार पसरू शकतात आईचं दूध हे सर्वांत चांगलं असलं, तरी ते ताजंच सेवन करणं उत्तम असतं. त्याची साठवणूक करण्यासाठी काही निकष असतात. त्यांचं पालन न केल्यास अशा दुधामुळे आजार पसरू शकतात. त्यामुळे त्याचं सेवन करणाऱ्या लहान किंवा प्रौढ कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर्नल ऑफ हेल्थ, पॉप्युलेशन अँड न्युट्रिशनच्या अभ्यासानुसार, फ्रोझन दुधामध्ये ताज्या दुधाच्या तुलनेत अँटिऑक्सिडंट्स कमी असतात. हे अँटिऑक्सिडंट्स पेशींच्या विकासासाठी व त्यांची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक असतात. या दुधाला अधिकवेळा थंड करण्यात आलं, तर त्याची चव बदलते. तसंच त्यातील पौष्टिक घटक कमी होऊन जीवाणू तयार होऊ लागतात. आईचं दूध काढण्यासाठी बाजारात इलेक्ट्रिक किंवा हातानं वापरण्याचे ब्रेस्ट पंप मिळतात. त्यातही हातानं वापरण्याचे, बॅटरीवर चालणारे, विजेवर चालणारे, बल्ब स्टाईल आणि यूज्ड ब्रेस्ट पंप असे काही प्रकार उपलब्ध असतात. त्यात असलेलं शील्ड स्तनाग्रांवर लावून त्याद्वारे दूध ओढून घेता येतं. कामासाठी बाहेर जाणाऱ्या स्त्रियांना हे खूप उपयोगाचं असतं. अशाप्रकारे काढलेलं दूध साठवून बाळाला हवं तेव्हा देता येऊ शकतं. अभिनेत्री भारती सिंहचं देखील यावर वक्तव्य याबाबत विनोदी अभिनेत्री भारती सिंह हिनंही एकदा सांगितलं होतं. तिचं बाळ तिचंच दूध पितं असं ती म्हणाली होती. तिच्यासारखी शूटिंगसाठी बराच काळ घराबाहेर राहणारी स्त्री बाळाला हवं तेव्हा दूध देऊ शकत नाही. यावरून तिनं तिचं दूध साठवून ठेवून तिच्या बाळाला दिलं असेल, असं म्हणता येईल. आईचं दूध साठवण्यासाठी हात धुवून स्वच्छ, कॅप्ड फूड ग्रेड ग्लास कंटेनर अर्थात काचेच्या किंवा जाड प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवावं. या भांड्यांमध्ये रासायनिक बिस्फेनॉल ए (बीपीए) नसतं. खास दूध साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर करता येऊ शकतो. घरगुती वापराच्या प्लॅस्टिक पिशव्या किंवा बाटल्यांमध्ये हे दूध ठेवू नये. आईचं दूध फ्रीजमध्ये 8 दिवस साठवून ठेवता येऊ शकतं, मात्र त्याचा वापर 4 दिवसांतच केला पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फ्रीजचं तापमान 0 ते 3.8 अंश सेल्सिअस असावं. फ्रीजरमध्ये हे दूध अधिक काळापर्यंत साठवता येऊ शकतं. मात्र कोणत्या प्रकारचा फ्रीजर आहे, त्यावर त्याचा कालावधी ठरतो. तुमच्या फ्रीजरमध्ये वेगवेगळे कंटेनर असतील, तर हे दूध 3-4 महिने साठवता येऊ शकतं. डीप फ्रीजरमध्ये ठेवल्यास 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी हे दूध ठेवता येऊ शकतं. फ्रीजशिवाय हे दूध साठवून ठेवायचं असेल, तर ते घरातील तापमानावर अवलंबून असतं. घरातील तापमान 25 अंश किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर शक्यतो 4 तासांच्या आतच हे दूध संपवावं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बाळाच्या जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला केवळ आईचं दूध दिलं जातं. ते बाळाचं सर्वार्थानं पोषण करतं. ज्या मातांना स्तनपान देण्यासंबंधी समस्या असतात, त्यांच्या बाळांसाठी अशाप्रकारे आईचं साठवलेलं दूध हे वरदानच ठरू शकतं. मात्र त्याच्या साठवणुकीचे मापदंड योग्यप्रकारे पाळले जातात का, हे पाहिलं पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात