जिनिव्हा, 20 मे : कोरोनानंतरत आता मंकीपॉक्स व्हायरसने (Monkeypox Virus) दहशत निर्माण केली आहे. ज्या देशात याआधी कधीच मंकीपॉक्स दिसला नाही, त्या देशातही मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणं पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेही धसका घेतला आहे. WHO ने याला रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलली आहेत. एक मोठा निर्णय घेतला आहे.
डब्ल्यूएचओने मंकीपॉक्स व्हायरसबाबत चर्चा करण्यासाठी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. रशियन मीडियाने याबाबत माहिती दिली आहे. व्हायरसच्या संसर्गाची कारणे आणि स्रोत यावर चर्चा करणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश असेल.
मे महिन्यात बऱ्याच देशांमध्ये मंकिपॉक्सची प्रकरणं दिसून आली आहेत. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची नऊ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. यातील बहुतेक रुग्ण गे किंवा बायसेक्शुअल (Bisexual) पुरुष आहेत. यापूर्वी 2021 साली ब्रिटनमध्ये या आजाराचे काही रूग्ण आढळले होते. आता त्यानंतर अमेरिकतही या आजारानं डोकं वर काढलं आहे.
हे वाचा - जिथं याआधी कधीच घुसू शकला नाही त्या देशातही Monkyepox Virus चा शिरकाव; भारताला किती धोका?
अमेरिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी (US Health Officials) दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्समध्ये हा दुर्मिळ विषाणू सापडण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. तर पोर्तुगालमध्ये (Portugal) पाच कन्फर्म केसेसची नोंद झाली आहे. स्पेनमध्ये (Spain) 23 संभाव्य प्रकरणांची टेस्ट घेतली गेली आहे. या दोन्ही देशांमध्ये यापूर्वी कधीच मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले नव्हते.
काय आहे मंकीपॉक्स?
मंकीपॉक्स हा एक विषाणू (Virus) आहे. स्मॉल पॉक्स व्हायरस फॅमिलीमध्ये याचा समावेश होतो. ज्याची लागण झाल्यामुळे ताप (Fever) येऊन अंगावर विचित्र झुबकेदार पुरळ (Bumpy Rash) दिसू लागतात. सहसा सौम्य समजल्या जाणाऱ्या या विषाणूचे दोन मुख्य स्ट्रेन आहेत. पहिला म्हणजे काँगो स्ट्रेन (Congo Strain) आणि दुसरा वेस्ट आफ्रिकन स्ट्रेन (West African Strain). यापैकी काँगो स्ट्रेन हा अधिक गंभीर आहे. या स्ट्रेनमधील (Fatality Rate) मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यंत आहे. तर, वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनमधील मृत्यूदर 1 टक्क्यांच्या आसपास आहे. ब्रिटनमध्ये आढळलेले रुग्ण हे वेस्ट आफ्रिकन स्ट्रेनचे आहेत.
कसा पसरतो मंकीपॉक्स?
हा विषाणू रुग्णाच्या जवळून संपर्कात आल्यास पसरतो. हे प्रमाण प्राण्यांमध्ये जास्त तर मानवांमध्ये कमी आहे. 1958 मध्ये प्रथम माकडांमध्ये (Monkeys) हा व्हायरस आढळला होता. म्हणून त्याला मंकीपॉक्स हे नाव देण्यात आलं. त्याची सुरुवात माकडांपासून झाली असली तरी आता उंदीरवर्गीय (Rodents) प्राणी हे त्याचे मुख्य प्रसारक असल्याचं म्हटलं जात आहे.
हे वाचा - तुम्ही कोरोनाच्या संसर्गापासून वाचला आहात? जाणून घ्या या मागचं कारण, पुढेही होईल फायदा
आता सुरू झालेलं ट्रान्समिशन (Transmission) तज्ज्ञांना गोंधळात टाकणारं आहे. कारण, युनायटेड किंग्डममध्ये 18 मे पर्यंत सापडलेल्या नऊ रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात निदर्शनास आलं आहे. फक्त 6 मे रोजी आढळलेला पहिला रुग्ण नुकताच नायजेरियाला जाऊन आला होता. सध्या सापडलेले बहुतेक रुग्ण बायसेक्शुअल, गे किंवा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle, Who