मुंबई, 27 फेब्रुवारी : उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असते. उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी घरात पंखा, कूलर, एसीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी थंड पाणी प्यायलं जातं. काही जण पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. बहुतांश जण आजही पारंपरिक माठांचा वापर करतात. उन्हाळा सुरू होताच बाजारात माठखरेदीसाठी लगबग सुरू होते. पूर्वी घरोघरी असणारे माठ आता इतर पर्याय उपलब्ध झाल्याने नियमितपणे वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे; मात्र उन्हाळ्यात आवर्जून त्यांचा वापर केला जातो. बाजारात आपल्याला काळे, लाल आणि पांढऱ्या रंगाचे माठ पाहायला मिळतात. या तिन्ही प्रकारच्या माठांची वैशिष्ट्यं असतात. त्यापैकी नेमका कोणता माठ खरेदी करावा असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो. काळा, लाल आणि पांढरा यांपैकी कोणता माठ आरोग्यासाठी चांगला ते जाणून घेऊ या. पूर्वी घरोघरी लहान ते मध्यम आकाराचे माठ असत. गेल्या काही वर्षांत फ्रीज, कूलरसारखे पर्याय उपलब्ध झाल्याने साहजिकच माठाचा वापर कमी झाला. पूर्वी पाणी साठवण्यासाठी मातीचे मोठ्या आकाराचे माठ किंवा रांजण असत. आता विविध धातूंची किंवा प्लास्टिकची भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जातात. पूर्वी घरोघरी काळ्या रंगाचे माठ वापरले जात. आता काळ्यासह लाल आणि पांढऱ्या रंगाचेही माठ पाहायला मिळतात. त्यामुळे यांपैकी कोणता माठ चांगला हा प्रश्न मनात तयार येतो. पारंपरिक माठांचं स्वरूप आता काहीसं बदललं आहे. आता माठाला झाकण आणि नळही असतो. त्याचप्रमाणे नक्षीदार माठही बाजारात उपलब्ध असतात. काळ्या रंगांच्या माठाव्यतिरिक्त पांढऱ्या रंगाचे नक्षीदार माठही बाजारात पाहायला मिळतात. हे माठ आकर्षक दिसतात. ते चिनी मातीपासून बनवलेले असतात. त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळलेलं असण्याची शक्यता असते. हे माठ बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जातात. नैसर्गिक काळ्या रंगाच्या माठात ज्या प्रमाणात पाणी थंड होतं, त्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या माठात होत नाही. थंडगार पाणी हवं असेल तर पांढऱ्या रंगाचे माठ फारसे उपयुक्त ठरतील असं नाही. कमी थंड पाणी हवं असेल तर हे माठ वापरायला काहीच हरकत नाही. वाचा - अंडरआर्म्सच्या काळेपणाला कंटाळलात? हे घरगुती आणि सोपे उपाय करतील मदत आपल्याकडे पूर्वापार काळ्या रंगाचे माठ सर्रास वापरले जातात. काळ्या मातीच्या माठात पाणी चांगलं थंडगार होतं, असा अनुभव आहे. ही माती काळ्या खडकापासून उपलब्ध होते. ही माती सगळीकडे उपलब्ध असते. माठाच्या निर्मितीसाठी ही माती नैसर्गिकरीत्या चांगली असते. त्यामुळे नैसर्गिक थंड पाण्याचा अनुभव घेण्यासाठी काळ्या रंगाचा माठ अवश्य खरेदी करावा. वाचा - महिलांनी या 5 पद्धतीने घ्या स्वत:ची काळजी, शांत आणि तणावमुक्त होईल आयुष्य लाल मातीचे माठही बाजारात दिसतात. हे माठ लाल मातीपासून तयार केलेले असतात. विटा तयार करण्यासाठी जी माती वापरली जाते, तिचा वापर माठ बनवण्यासाठीदेखील केला जातो. वेगवेगळी डिझाइन्स आणि घाट असलेले, तसंच नळ, झाकण असलेले माठ लक्ष लगेच वेधून घेतात. या लाल माठात पाणी साधारण गार म्हणजे तुलनेने कमी गार होतं. त्यामुळे जास्त थंड पाणी नको असेल तर लाल माठ खरेदी करू शकता. एकंदरीत विचार करता, उन्हाच्या काहिलीत पाणी थंड करण्यासाठी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या माठाऐवजी काळ्या रंगाच्या माठाचा प्राधान्याने वापर करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.