कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज

कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला अंदाज

2020 हे वर्ष कोरोनासहच (coronavirus) संपत आलं आहे. या व्हायरसमुळे प्रत्येक जण वैतागला आहे आणि प्रत्येकाच्या मनात का एकच प्रश्न आहे, कधी संपणार कोरोना?

  • Share this:

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : 2020 हे वर्ष प्रत्येकासाठीच वाईट ठरलं. याचं कारण म्हणजे कोरोनाची महासाथ (corona pandemic). कोरनाव्हायरसच्या (coronavirus) भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. संक्रमणावर नियंत्रण राहावं यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केला. लोक घरात बंदिस्त झाले, कित्येकांच्या नोकऱ्या-रोजगार गेला. या सर्वाचा परिणाम लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही होऊ लागला. त्यामुळे कधी एकदाचा का कोरोना जातो? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सोशल मीडियावर यावर बरेच मिम्सही व्हायरल होऊ लागले होते. प्रत्येकाच्या मनात असलेल्या या प्रश्नाचं उत्तर अखेर तज्ज्ञांनी दिलं आहे.

कोरोनाचं संकट नेमकं कधी संपणार? याबाबत भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 2021 साल. हो पुढच्या वर्षीच कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू.  2021 सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होईल, आपण सामान्य परिस्थितीत येऊ, अशी शक्यता एम्सच्या (AIIMS) कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे. एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे.

डॉ. संजय राय म्हणाले, "भारतात कोरोना लशीचं दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार झालं, तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लशींपैकी कोणतीही कोरोना लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. पण लस आली किंवा नाही आली तरीदेखील पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी शक्यता आहे. पण जोपर्यंत कोरोनाविरोधात प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय आपण करायला हवेत"

हे वाचा - अरे देवा! कोरोनाव्हायरसनंतर आता Brucella Bacteria चा कहर; हजारो लोक संक्रमित

दरम्यान 2021 मध्ये भारताची कोरोना लसही उपलब्ध होईल, अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी राज्यसभेत त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, "जगभरात जसे कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसंच भारतातही सुरू आहे. भारतातील तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या  वेगवेगळ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची एक समिती याचा अभ्यास करत आहे. प्रगत टप्प्यातील नियोजन केलं जात आहे.  पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लस उपलब्ध होऊ शकेल अशी आशा आम्हाला आहे. यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि लशीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्याही संपर्कात आहोत"

हे वाचा - भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; दिसून आले SIDE EFFECT

भारतात कोरोनाचे 52 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यापैकी 41 लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 10 लाखांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 84 हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 18, 2020, 6:17 PM IST

ताज्या बातम्या