मुंबई, 24 मे : देशातल्या अनेक भागांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. काही भागांमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. तापमानाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात नैसर्गिक बदल होतात. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, हृदयाचे ठोके गतिमान होतात, जास्त घाम येऊ लागतो. बरेचदा उन्हाच्या चटक्यांमुळे अस्वस्थ वाटणं, थकवा, मळमळ, स्नायूंमध्ये वात येणं अशा गोष्टी घडू शकतात. खूप जास्त उन्हामुळे काही वेळा एकापेक्षा अधिक अवयव निकामी होण्याची शक्यता असते. प्रत्येक ऋतुमानानुसार आपलं शरीर जुळवून घेत असतं. उन्हाचा चटका वाढू लागल्यावरही शरीर स्वतःहून थंड राहण्यासाठी प्रयत्न करतं. “वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी शरीरात काही बदल होतात. शरीर घामाच्या रूपानं उष्णता बाहेर काढतं. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, हृदयाची धडधड वाढते,” असं नवी दिल्लीतील आकाश हेल्थ केअरच्या सीनिअर कन्सल्टंट-इंटर्नल मेडिसीन डॉ. परिणिता कौर यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उन्हाचा सामना करण्यासाठी शरीरात विविध प्रकारे अंतर्गत बदल होतात. घाम वाढतो घाम येणं ही शरीरानं स्वतःहून तयार केलेली ‘कूलिंग सिस्टिम’ असते. तापमान 45 अंशांच्या पुढे गेलं, घामाच्या ग्रंथी खूप जास्त काम करू लागतात. घाम आल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. पण यामुळे शरीरातलं पाणी व इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. त्यामुळे पाण्याची कमतरता भरून काढावी लागते. नाहीतर काही समस्या उद्भवू शकतात. हृदयाचे ठोके वाढतात तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्यावर हृदयाचे ठोके वाढतात. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळावा व जास्त पोषणमूल्य मिळावी, म्हणून हृदयाचं काम वेगानं सुरू होतं. शरीराला रक्तपुरवठा अधिक करण्यासाठी हृदयाचं काम व पर्यायानं ठोकेही वाढतात. शरीरातल्या इतर अवयवांचं काम सुरळीत सुरू राहावं, यासाठी हृदयावर दडपण येतं. त्यामुळे ज्यांना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या असतील, त्यांनी उन्हाळ्यात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, कुठे उष्णतेचा अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? रक्तवाहिन्या प्रसरण पावतात तापमान वाढल्यावर त्वचेच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे त्यातून अधिक रक्तपुरवठा होऊ शकतो व उष्णताही थोडी कमी होते. मात्र काही वेळेला यामुळे रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. थकवा, चक्कर येणं अशा समस्या उद्भवू शकतात. सनबर्न व त्वचेवर परिणाम वाढत्या उष्णतेचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्वचा कोरडी पडून काळी पडू शकते. सूर्याच्या अतिनील किरणांच्या सतत परिणाम होऊन सनबर्न होऊ शकतं. सुती पातळ कपडे, त्वचेवर सनस्क्रीन लावणं यामुळे त्वचेचं संरक्षण होऊ शकतं. उष्माघात तापमान खूप जास्त वाढलं, तर उष्माघाताचा धोका वाढतो. शरीरातलं पाणी कमी होऊन मळमळ, उलट्या, थकवा व वात येतो. शरीराचं तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं तर अवयव निकामी होण्याची भीती असते. त्यासाठी त्यावर तत्काळ उपचार करावे लागतात. नोएडा सेक्टर -26 च्या अपोलो हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे सीनिअर कन्सल्टंट डॉ. सरत साहू यांनी वाढत्या तापमानाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, तापमान वाढलं, तर घामाच्या स्वरूपात शरीरातलं पाणी बाहेर पडतं व शरीराला पाण्याची कमतरता भासते. तोंड कोरडं पडणं, मूत्रविसर्जन कमी होणं, डोकं हलकं वाटणं ही पाणी कमी झाल्याची लक्षणं आहेत. तापमान वाढल्यानं हृदयावर ताण येतो. त्यासाठी उन्हात जाणं व अधिक श्रम करणं टाळलं पाहिजे. उन्हाळ्यात क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (COPD) आणि अस्थमा वाढू शकतो. उष्ण हवेमुळे श्वास घेण्यात समस्या येऊ शकतात. उष्णतेच्या लाटेमध्ये हवेचं प्रदूषणही वाढतं. त्यासाठी थंडाव्याच्या ठिकाणी राहणं, नियमित औषधं वेळच्या वेळी घेणं या गोष्टी केल्या पाहिजेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलमधील संचालक आणि इंटर्नल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अजय अग्रवाल यांच्या मते, “4 वर्षांच्या आतली मुलं, बाळं आणि ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे लठ्ठ, आजारी व्यक्तींनाही हा धोका असतो.” त्यासाठी भरपूर पाणी पिणं, सकाळी 10 ते 4 पर्यंत विनाकारण घराबाहेर जाणं टाळणं, सुती व सैलसर कपडे घालणं, सनस्क्रीन लोशन लावणं, थंडाव्याच्या जागी बसणं, थंड पाण्यानं अंघोळ करणं या काही गोष्टी करणं हिताचं ठरतं. उन्हाळ्यात लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींकडे जास्त लक्ष द्यावं. यामुळे उष्माघाताचा धोका टळून उन्हाळा सुसह्य होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.