
गेले दोन दिवस मुंबई, ठाण्यात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. मुसळधार पावसाचा धोका कायम असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

धुवांधार पडणारा पाऊस म्हटलं की अनेक ठिकाणी पाणी साचणं, पूर येणं अशी परिस्थिती ओढावते आणि या पाण्यात धोका असतो तो लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) म्हणजेच लेप्टोचा.

लेप्टोस्पायरोसिस हा आजार लेप्टोस्पायरा (स्पायराकिटस) या सूक्ष्मजंतुमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत.

शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्मजंतू उंदीर, कुत्रे इत्यादी प्राण्यांमध्ये आढळतात. संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेलं पाणी किंवा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो.

बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला लेप्टोस्पायरोसिस रोगाची बाधा होऊ शकते. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो. मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.

पावसाळ्यात आणि पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावं लागलं तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

साचलेल्या किंवा संथगतीने निचरा होत असलेल्या पाण्यातून गम बूट वापरण्यासारखी खबरदारी न घेता चालल्यास अशा व्यक्तींना किंवा ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा पाण्याशी संपर्क आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणं टाळावं किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावे.

साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'लेप्टोस्पायरोसिस' प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरेशी विश्रांती, पोषक आहार आणि वेळेत उपचार घ्यावा.(फोटो सौजन्य - ट्विटर)

उंदीर- घुशींचा नायनाट करावा. उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न मिळू न देणं, उंदराचं सापळं रचणं, त्याला विष घालणं इत्यादी मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वापरात आणावे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, अशी सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या असून ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने कमी जोखीम गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर 'डॉक्सिसायक्लीन' (200 मिलीग्रॅम) या कॅप्सुलचं एकदा सेवन करायला सांगावं. (फोटो सौजन्य - ट्विटर)

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून चालल्या असून त्यावेळी ज्यांच्या पायावर किंवा पाण्याशी संबंध आलेल्या शरीराच्या भागावर जखम होती, अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने मध्यम जोखीम गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर डॉक्सिसायक्लीन (200 मिलीग्रॅम) या कॅप्सुलचे दररोज एक वेळा याप्रमाणे सलग तीन दिवस सेवन करायला सांगावं.

ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एका पेक्षा अधिक वेळा चालल्या किंवा ज्यांनी साचलेल्या पाण्यात काम केलं आहे (उदा. बचावकार्य करणारे पालिका कर्मचारी), अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने अतिजोखीम गटात मोडतात. डॉक्टरांनी या व्यक्तींची आवश्यक ती तपासणी केल्यानंतर डॉक्सिसायक्लीन (200 मिलीग्रॅम) या कॅप्सुलचं आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सलग सहा आठवडे सेवन करायला सांगावं. (फोटो सौजन्य - ट्विटर)

गरोदर स्त्रिया आणि 8 वर्षांखालील बालकांना डॉक्सिसायक्लीन देऊ नये. त्याऐवजी गरोदर स्त्रियांना 500 मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन टॅब्लेट, तर 8 वर्षांखालील बालकांना 200 मिलीग्रॅम ऍझिथ्रोमायसिन सिरप वरील तपशीलानुसार द्यावं.

वर नमूद केलेले प्रतिबंधात्मक औषधोपचार हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं आहे, असं आवाहन डॉ. मंगला गोमारे यांनी केलं आहे.




