Google वर शोधला जातोय विरुष्काच्या मुलीचा PHOTO, पण...
विरुष्काला मुलगी झाल्याची बातमी (Virushka daughter photo) आली आणि तमाम नेटकऱ्यांनी या जोडीच्या बाळाला पाहण्यासाठी Google वर धाव घेतली. पण इतक्यात तिची छबी दिसण्याची शक्यता नाही. विराटने काय लिहिलंय वाचा. तेच आहे कारण...
नवी दिल्ली, 11 जानेवारी: विराट कोहली- अनुष्का शर्मा या भारतातल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोडप्याला कन्यारत्न झालं. याची गोड बातमी विराटने त्याच्या instagram अकाउंटवरून चाहत्यांना दिली आहे. ही बातमी आली आणि त्याच्या चाहत्यांनी आणि तमाम नेटकऱ्यांनी या जोडीच्या छोटीचा फोटो कुठे दिसतोय का हे महाजालात शोधायला सुरुवात केली. Google च्या जगभरातल्या टॉप ट्रेंड्समध्ये विराट - अनुष्काच्या मुलीबद्दल सर्वाधिक सर्च झालं. पण या छोटीची छबी इतक्यात आपल्याला दिसू शकत नाही. याचं कारण आज विराटने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलंच आहे. शिवाय बाळाच्या जन्माआधी काही दिवसांपूर्वीच अनुष्कानेही तिच्या एका मुलाखतीत आपण एक मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
विराटने मुलगी झाल्याची बातमी शेअर करताना 'आमचे खासगी क्षण आम्हाला जपू द्या', असं आवाहन केलंच आहे. पण अनुष्काने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीतही हे स्पष्ट केलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा म्हणाली, ‘आमच्या बाळाचा जन्म होईल तेव्हा आम्ही शक्यतो त्याला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू. आमच्या बाळाला एखाद्या सेलिब्रिटीच्या नाही तर सामान्य मुलासारखी वागणूक मिळावी असा आमचा प्रयत्न असेल.’ लहानपणापासून मीडिया आणि कॅमेरे बाळाला फेस करावे लागू नयेत असं विराट आणि अनुष्काचं मत आहे.
विराट आणि अनुष्का दोघेही 32 वर्षांचे आहेत. त्यांनी ऑगस्टमध्ये लवकरच आई-बाबा होणार, असं जाहीर केल्यापासूनच त्यांच्या बाळाची चर्चा आहे. यापूर्वी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या तैमूरची अशीच चर्चा होती. तो अजूनही सोशल मीडियावरचा सर्वांत अधिक चर्चेत असणारा छोटा सेलेब्रिटी असल्याचं मानलं जातं. आता विरुष्काला बाळ होईल, तेव्हा ते तैमूरची जागा घेईल, असंही गमतीने म्हटलं जात होतं. सोशल मीडियावर विराटने मुलगी झाल्याची बातमी दिल्यानंतर यासंबंधी मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले.