नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : संगीत (Music) आणि मनुष्याचं काही तरी वेगळंच नातं आहे. आपण कशाही मूडमध्ये असलो तरी संगीत आपल्याला नेहमीच साथ देतं. दु:खी असताना संगीतामुळे मनाला उभारी मिळते, तर आनंदी असताना, काही क्षण एन्जॉय करतानाही चांगलं संगीत ते क्षण अविस्मरणीय करतं. संगीताचा अनेक आजारपणांमध्ये उपचार म्हणूनही वापर केला जातो. त्याला म्युझिक थेरपी (Music Therapy) असं म्हणतात. त्या थेरपीच्या साह्याने अनेक मानसिक आजारांवर उपचार करताना मदत होते, असं म्हटलं जातं.
सध्या आपण सगळेच खूप ताणतणावाच्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. प्रत्येकासाठी तणाव वेगवेगळा असतो. सध्याचं राजकीय वातावरण, सामाजिक परिस्थिती, हवामान इथपासून ते वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक ताणतणावांवरही म्युझिक थेरपीचा (Music Therapy) उत्तम उपयोग होऊ शकतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या health.harvard.edu या वेबसाइटवर Lorrie Kubicek यांनी या विषयावर ब्लॉग लिहिला आहे. त्या मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये सर्टिफाइड म्युझिक थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ब्लॉगमधल्या माहितीचा सारांश येथे पाहू या.
कोविडनंतरचा काळ जगभरातल्या सगळ्यांसाठीच मानसिक कसोटीचा काळ होता. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेकांना म्युझिक थेरपीची चांगली मदत झाली. आयुष्य जगण्याचा दर्जा म्हणजेच Quality Of life वरही म्युझिक थेरपीचा परिणाम होतो, असं नुकतंच संशोधनातून सिद्ध झालं आहे. एखाद्या ताणातून, समस्येतून बाहेर पडून रिलॅक्स (Relaxation) होण्यासाठी, पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यासाठीचा दृष्टिकोन देण्यासाठीही म्युझिक थेरपी उत्तम काम करते, असं संशोधकांचं म्हणणं आहे. संगीत ऐकणं, गाणं म्हणणं, एखादं वाद्य वाजवणं आणि म्युझिक थेरपीमुळे मानसिक आरोग्यात कमालीची सुधारणा होते, तर आपल्या शारीरिक आरोग्यातही काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. या दोन्ही गोष्टी अर्थातच आपल्या जीवनशैलीशी निगडित आहेत.
हे वाचा - तुम्हालाही सण-उत्सवातील मजा-मस्ती नकोशी वाटते? मानसिक आजार तर नाही ना?
प्रत्येकाचं या संगीताशी असलेलं नातं अत्यंत वैयक्तिक (Personal Relation With Music) असतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. म्हणजे काही वेळा झोपताना आपल्याला अगदी हळुवार म्युझिक चांगलं वाटतं. व्यायाम करताना थोडंसं डान्सवालं म्युझिक असेल, तर त्यामुळे व्यायामाला उत्साह येतो. आपल्या भावना काही वेळा आपण गाण्यातून व्यक्त करतो. म्युझिक कॉन्सर्टमुळे आपण आपल्यासारखीच आवड असणाऱ्यांबरोबर जोडले जातो.
म्युझिक थेरपी कधी उपयुक्त ठरू शकते?
प्रमाणित म्युझिक थेरपिस्टकडून (Certified Music Therapist) याचे उपचार करून घेणं चांगलं. अशा प्रमाणित थेरपिस्टने पदव्युत्तर थेरपी कोर्स केलेले असतात.
म्युझिक थेरपी ही Active आणि Receptive अशा दोन प्रकारची असते. Active म्युझिक थेरपी म्हणजे स्वत: गाणं म्हणणं, एखादं वाद्य वाजवणं, डिजिटल म्युझिक तयार करणं, इत्यादी.
Receptive प्रकारामध्ये संगीत ऐकणं, संगीताच्या साथीने काही काल्पनिक प्रसंग निर्मिती, प्लेलिस्ट तयार करणं इत्यादींचा समावेश होतो.
हे वाचा - Birthday Status In Marathi : प्रियजनांचा वाढदिवस करा आणखी विशेष, अशा द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अस्वस्थता कमी करणं, मूड चांगला करणं, कॅन्सरसारख्या आजारात किंवा अशाच प्रकारच्या अन्य दुर्धर आजारांत उपचारांदरम्यानच्या वेदना कमी करणं, व्यक्त होण्यासाठी मदत करणं, प्रेरणा मिळवणं अशी म्युझिक थेरपीची उद्दिष्टं असू शकतात. आपल्याला कोणत्या प्रकारची म्युझिक थेरपी उपयुक्त ठरते हे प्रत्येकावर अवलंबून असतं.
संगीत ऐकणं
याचा जवळपास प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांत जास्त अभ्यास करण्यात आला आहे. लाइव्ह किंवा रेकॉर्डेड म्युझिक (Live Or Recorded Music) असो, एखादा फोकस ठरवून संगीत ऐकलं जातं किंवा बॅकग्राउंड म्हणून ऐकलं जाऊ शकतं. तुमचं मन शांत करण्यासाठी म्युझिक ऐकू शकता. उत्साह वाटत नसेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर संगीत ऐकण्याने खूप सकारात्मक फरक पडू शकतो.
एखादं वाद्य वाजायला शिकणं (Instrument) किंवा वाजवणं
यामुळे आपलं दु:ख काही काळ विसरायला होतं. आपलं लक्ष दुसरीकडे वेधलं जातं. वेदना कमी होतात. भावना व्यक्त होण्यासाठीही याचा उपयोग होतो. काही वेळा व्यक्त होणं सोपं जावं किंवा शिकणं सोपं जावं यासाठी काही वाद्यं अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली असतात. एखादं वाद्य वाजविण्यात तरबेज होण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. हा काळ तुम्हाला सहनशक्ती शिकवतो.
गाणं म्हणणं (Singing)
तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही नक्की याचा उपयोग करून बघा. गाणं म्हणण्याने अनेकदा आपल्याला मोकळं वाटतं. इतकंच नाही, तर गाणं म्हणण्याचे आरोग्यदृष्ट्याही फायदे आहेत. यामुळे तुमच्या फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो.
संगीत हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी, अनेक अवघड गोष्टी सोप्या करण्यासाठी, ध्येय गाठण्याला प्रेरणा देण्यासाठी संगीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. रोजच्या कटकटीच्या रूटीनमधून फक्त थोडासा वेळ काढा आणि म्युझिक थेरपीचा आनंद घ्या. कदाचित तुमचं आयुष्य आणखी सुंदर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, On this Day