मुंबई, 13 जुलै : बरेच लोक हल्ली गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. जसजसे वय वाढते तसतसे हाडांची झीज होते आणि गुडघेदुखीची समस्या उद्भवते. गुडघ्यात तीव्र वेदना होणे, चालता न येणे, अगदी दैनंदिन कार्यही करणे शक्य होत नाही. अशावेळी आता माझा गुडघा कामातून गेला की काय? मला आता गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागेल की काय? अशी भीती वाटू लागते. गुडघ्याचा त्रास झाल्यास गुडघा प्रत्यारोपण म्हणजे गुडघा बदलण्याची गरज आहे का? किंवा गुडघा प्रत्यारोपण करण्याची ही योग्य वेळ आहे का?, गुडघा प्रत्यारोपण कधी करावं आणि कधी नाही हे कसे समजावे?, हे नेमके समजून घेऊया. गुडघ्या प्रत्यारोपण करायचा की नाही हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे एक्स-रे आणि दुसरे म्हणजे रुग्णाला होणारा त्रास. पुण्यातील संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पराग संचेती म्हणाले, “रुग्णाच्या एक्स-रेमध्ये त्याच्या गुडघ्याला किती हानी पोहोचली आहे, गुडघ्याचे कार्टिलेज किती खराब झाले आहे, गुडघ्याच्या खालील पायाचा वरील भाग आणि गुडघ्याच्या वरील मांडीच्या भागाकडील खालील भागाचे हाड म्हणजे गुडघ्यांना जोडणाऱ्या सांध्यांचे एकमेकांवर किती घर्षण होत आहे, हे पाहिले जाते. ही हाडे एकमेकांवर घासल्याने त्यांची झीज होत असते. हाडांची ही झीज चार टप्प्यात होते. जर एक्स-रेमध्ये चौथ्या टप्प्यातील झीज असल्याचे निदान झाले तर नी रिप्लेसमेंटची गरज आहे. दुसरे म्हणजे रुग्णाला काय काय त्रास होतो आहे, हे पाहिले जाते. गुडघा दुखतो आहे, चालायला त्रास होतो, बाहेर जाता येत नाही, दैनंदिन कार्य करता येत नाही, तीव्र वेदना होतात, औषधे घेतली, व्यायाम केला तरी गुडघ्याच्या वेदना काही कमी होत नाहीत, असे असेल तर नी रिप्लेमेंटची गरज आहे” एकंदर एक्स-रेमध्ये दिसणारी गुडघ्याची स्थिती किंवा अवस्था आणि क्लिनिकल फिचर म्हणजे रुग्णाला होणारा त्रास किंवा रुग्णाच्या तक्रारी या दोन्ही गोष्टी असतील तरच गुडघा प्रत्यारोपण करावे. म्हणजे बऱ्याचदा असे होते की एक्स-रे सामान्य असतो पण गुडघा खूप दुखतो आहे किंवा गुडघ्याला हानी पोहोचली आहे पण तो दुखत नाही मग अशा दोन्ही परिस्थितीत गुडघा प्रत्यारोपण करण्याची बिलकुल गरज नाही, असं डॉ. संचेती म्हणाले. डॉक्टरांच्या मते, गुडघ्याच्या आतील, मधल्या आणि बाहेरील अशा तिन्ही भागात झीज झाली असेल तर टोटल नी रिप्लेमेंट करावे लागते. म्हणजे पूर्ण गुडघा बदलावा लागतो. सामान्यपणे वयस्कर लोकांच्या तिन्ही भागापैकी एखाद्या भागात हानी दिसली तरी टोटल नी रिप्लेमेंटचाच सल्ला दिला जातो. कारण त्यांच्या गुडघ्याच्या इतर भागात आता समस्या दिसत नसली तरी त्यांच्या वयोमानानुसार काही कालवधीनंतर ती समस्या उद्भवू शकते. नाहीतर कमी वयाच्या रुग्ण ज्यांना गुडघ्याच्या काही भागातच त्रास असेल त्यांना हाफ नी रिप्लेसमेंट करायला सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.