मुंबई, 30 एप्रिल- बदलती जीवनशैली (Lifestyle), योग्य आहार आणि व्यायामाचा अभाव आदी गोष्टींमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढताना दिसत आहे. अतिरिक्त वजनामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस (Diabetes) यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढत आहे. वजन नियंत्रणात राहण्यासाठी, तसंच गंभीर आजार होऊ नयेत याकरिता बहुतांश जण योग्य आहार, व्यायाम, ताण-तणाव व्यवस्थापनावर भर देताना दिसतात. परंतु, काही जणांकडून कळत-नकळतपणे काही चुका होतात. त्यामुळे त्यांचं वजन (Weight) तर वाढतंच; तसंच त्यांना अनेक आजारांचा सामनादेखील करावा लागतो. वजन वाढण्यामागे चार प्रमुख कारणं असतात. त्यात प्रामुख्याने बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड खाणं, कोल्ड्रिंक पिणं आणि पुरेशी झोप न घेणं यांचा समावेश असतो. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
लठ्ठपणा किंवा अतिरिक्त वजन ही जटिल समस्या मानली जाते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि विहाराचं काटेकोर व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं. काही चुकांमुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे अशा चुका टाळणंदेखील तितकंच गरजेचं आहे.
कोल्ड्रिंक (Cold drink) पिण्याची सवय आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. यामुळे वजन वाढतं. त्यामुळे उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण कोल्ड्रिंकमध्ये सुक्रोज असतं. यामुळे शरीरात फ्रुक्टोजची निर्मिती होते. या माध्यमातून शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात. त्यामुळे शरीराला भरपूर साखर मिळते आणि परिणामी वजन वाढू शकते. त्यामुळे कोल्ड्रिंक टाळणं गरजेचं आहे.
सध्याच्या काळात अनेकांना एकाच जागी दीर्घ काळ बसून काम करण्याची सवय जडल्याचं दिसतं. त्यामुळेदेखील वजन वाढू शकतं. एकाच जागी बसल्यानं शरीराची हालचाल पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे वजन वेगानं वाढण्याची शक्यता असते आणि ही बाब तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते.
बाहेरचं खाणं हे वजन वाढण्यामागचं सर्वांत प्रमुख कारण मानलं जातं. ज्या व्यक्ती भूक लागल्यावर फास्ट फूडचं (Fast Food) सेवन करतात, त्यांनी ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानं केवळ वजनच वाढत नाही, तर अन्य आजार होण्याची शक्यतादेखील वाढते.
रात्रभर जागरण केल्यानंसुद्धा वजन वाढतं. आजकाल युवक-युवती रात्री उशिरा येईपर्यंत जागरण करतात. त्यामुळे ही समस्या निर्माण होताना दिसते. यात पहिली गोष्ट म्हणजे जागरणामुळे झोप (Sleep) पूर्ण होत नाही आणि रात्रीच्या वेळी भूक लागल्यास कोणतेही पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे वजन वाढते. तुम्हालाही रात्रीचं जागरण करण्याची सवय असेल, तर ती वेळीच बंद करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Lifestyle, Weight gain