मुंबई, 19 ऑक्टोबर : तुम्ही नातेवाईकांकडे किंवा कामानिमित्त एखाद्या कार्यालयात गेलात तर बुट, सँडल बाहेर काढून मोज्यांवर आतमध्ये जावं लागतं. अशा वेळी मोज्यांतून दुर्गंधी येत असेल तर ही बाब तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरते. काही केलं तरी या दुर्गंधीपासून सुटका होत नाही. परंतु नैसर्गिक उपाय करून या समस्येवर मात करता येऊ शकते. ‘एनडीटीव्ही इंडिया हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. तळपाय बुटांमध्ये बराच वेळ राहिल्यामुळे घाम येऊन पायातून दुर्गंधी यायला लागते. वारंवार एकच मोजे किंवा बुट वापरल्यानं किंवा पायांशी संबंधित इतर आजार असतील तर पायातून येणारी ही दुर्गंधी अधिक असते. बुट किंवा मोज्यातून दुर्गंधी येऊ नये म्हणून नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतो. पायांमध्ये घामाच्या अनेक ग्रंथी असतात त्यामुळे अधिक काळ चालल्यानं किंवा व्यायाम केल्यानं पायांना खूप घाम येत असतो. दिवसभर पायात मोजे किंवा बुट घातला जातो तेव्हा घाम येऊन पायांतून दुर्गंधी येऊ शकते. फंगसच्या प्रजननासाठी बुट ही उत्तम जागांपैकी एक जागा आहे. पायांना येणाऱ्या घामामुळे फंगस आणि बॅक्टेरियाच्या वाढीमुळे इन्फेक्शन म्हणजेच संसर्ग वाढण्याचा धोकाही अधिक असतो. या उपायांचा होईल फायदा बेकिंग सोडा पायातून येणाऱ्या दुर्गंधीला रोखण्यासाठी बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त आहे. घामामुळे बुटामध्ये निर्माण होणारी दुर्गंधी किंवा ओलावा यामुळे नाहीसा होऊ शकतो. रात्रीच बुटांमध्ये बेकिंग सोडा शिंपडावा. कॉफी फिल्टरमध्ये बेकिंग सोडा ठेऊन त्याला रबर बँडने बांधता येऊ शकते. ही पुरचुंडी प्रत्येक बुटामध्ये ठेवावे. हा प्रयोग आठवड्यातून एकदा तरी करायला हवा. हेही वाचा - Diwali 2022 : दिवाळीला सुंदर, चमकदार त्वचा हवीय? मग आत्ताच रुटीनमध्ये करा हे छोटे बदल पांढरं व्हिनेगर बुटांमधून येणारी दुर्गंधी रोखता यावी म्हणून पांढरं व्हिनेगर उपयोगी आहे. पाणी आणि पांढरं व्हिनेगर 50-50 टक्के घ्यावं. या मिश्रणाला बुटाच्या लायनिंग व सोलवर शिंपडावं आणि नैसर्गिक पद्धतीने त्याला वाळण्यासाठी ठेवावे. हा प्रयोगही आठवड्यातून एकदा केल्यास याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. आंबट फळांच्या साली बुटात ठेवा चवीला आंबट असलेल्या फळांची साल काढून ती बुटात ठेवायला हवी. यात असणाऱ्या तेलामुळे याचा सुंगध पसरू शकतो. बुटांमध्ये संत्रं, द्राक्ष, लिंबू अशा फळांच्या साली ठेवाव्यात. एक दिवस आड ही प्रक्रिया करायला हवी. मीठही उपयोगी बुटातील ओलावा नाहीसा करून दुर्गंधीपासून सुटका व्हावी यासाठी मिठाचा चांगला उपयोग होऊ शकतो. कॅनव्हॉसच्या बुटात थोडं मीठ टाकावं आणि रात्रभर तसंच ठेवावं. सकाळी बुट व्यवस्थित धुवून घ्यावे. बुटातील ओलावा नाहीसा करण्यासाठी दररोज रात्री ही क्रिया करता येऊ शकते. वृत्तपत्राची रद्दी बुटात गोळा करून ठेवा दररोज सायंकाळी घरी आल्यावर बुट काढले, की त्यात वृत्तपत्राची रद्दी टाकून व हवेशीर जागी बुट ठेवावेत. या क्रियेमुळे बुटातील ओलावा शोषून घेतला जातो व बॅक्टेरियाची वाढ होत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.