
अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आल्यापासून रोज काहीतरी कानावर येतंय. इथे प्रत्येक दिवस अनेक समुदायांसाठी चिंता आणि आव्हानांचा ठरतो आहे. महिला आणि LGBTQ समुदायाचे लोकही भयभीत झाले आहेत. तालिबान्यांना त्यांच्या लैंगिकतेबद्दल माहिती मिळाली तर, ते कत्तल करतील अशी भीती LGBTQ समुदायाला आहे.

अनेक तालिबान न्यायाधीशांनी खुलासा केला आहे की, अफगाणिस्तानात आता इस्लामिक शरिया कायदा लागू होईल आणि समलैंगिकांना भयानक मृत्यू दिला जाईल. समलैंगिक व्यक्तीच्या अंगावर भिंत पाडून त्यांना मारलं जाईल असं या न्यायाधिशांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या शिक्षा हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.

न्यायाधीश गुल रहीम यांनी जर्मन वृत्तपत्र बिल्डशी बोलताना सांगितलं की, चोरीची शिक्षा म्हणून गुन्हेगारांचे हात-पाय कापले जातील. जर, समलिंगी संबंध ठेवले तर, दोघांचेही प्रायव्हेट पार्ट सर्वांसमोर कापले जातील.

स्काय न्यूजच्या एका अहवालात एका अफगाण तरुणाने सांगितलं की,'मी टिनेजर असतानाच मला समजलं की मी समलिंगी आहे. त्यानंतर मला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. माझ्या जवळच्या मित्रांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. एकदातर वडिलांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारण मला माझ्या एका मित्राबरोबर पाहून मी समलैंगिक असल्याचा त्यांना संशय आला.

जीवाला असलेल्या धोक्याचा विचार करून त्याने एका मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आहे. अजूनही त्याला भावनांशी लढावं लागतं. कधीकधी तर स्वतःलाच इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतो. कारण, जिवंतपणी गुदमरतच जगावं लागणार आहे.

एका व्यक्तीच्यामते एखादी व्यक्ती LGBTQ आहे हे तालिबानला कळलं तर, तालिबान त्याला फाशीची शिक्षा देणार हे निश्चित आहे. त्यामुळेच त्या व्यक्तीने सर्व शेजारच्या देशांमध्ये व्हिसासाठी अर्ज केला आहे. पण, भारत सोडला तर, कोणताही देश अफगाणिस्तानच्या लोकांना व्हिसा देत नाही.

आणखी एका समलिंगी व्यक्तीने पिंक न्यूजला सांगितलं की, तालिबानला आता देशाला 1400 वर्षे मागे घेऊ जायचं आहे. त्यांना 1400 वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबर सौदी अरेबियाच्या वाळवंटात राहयचे तसं रहायचं आहे. नास्तिक आणि LGBQT लोकांना तालिबान राजवटीत स्थान नाही.




