नवी दिल्ली, 30 एप्रिल : सध्या सर्वत्र तीव्र उन्हाळा (Summer) जाणवत आहे. उन्हाच्या (Heat) काहिलीनं सर्व जण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे लिंबू, कलिंगड, खरबूज, आंबा आदी फळांना मागणी वाढली आहे. खरं तर उन्हाळा म्हटलं, की कलिंगड (Watermelon) आणि आंबा (Mango) ही दोन फळं प्रामुख्यानं डोळ्यांसमोर येतात. रसरशीत आणि आतून लालचुटूक असलेली कलिंगडं बहुतांश जणांना आवडतात. कलिंगड बाहेरून हिरवं किंवा पिवळं आणि आतून लाल असतं हे आपण सर्वजण जाणतोच; पण एका देशात काहीसं वेगळ्या प्रकारचं कलिंगड पाहायला मिळतं. हे कलिंगड खूप महाग (Costly) असतं. या कलिंगडाला ब्लॅक वॉटरमेलन (Black Watermelon) किंवा डेनसूक वॉटरमेलन (Densuke Watermelon) असं म्हटलं जातं. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. खासकरून उन्हाळ्यात कलिंगड खाणं आरोग्याच्या दृष्टीनं हितावह मानलं जातं. या काळात विविध आकाराची कलिंगडं बाजारात येतात. परंतु, जपानमधलं (Japan) ब्लॅक अर्थात डेनसूक वॉटरमेलन काहीसं वेगळं आहे. जपानी लोक खाण्यासोबतच गिफ्ट (Gift) म्हणून देण्यासाठी डेनसूक वॉटरमेलन खरेदी करतात. हे कलिंगड खूप महाग असतं. महाग असल्याने हाय प्रोफाइल सेलेब्रिटीजना गिफ्ट म्हणून हे कलिंगड देण्याची प्रथादेखील जपानमध्ये आहे. विशेष म्हणजे जपान डेनसूक वॉटरमेलन अन्य देशांना निर्यातदेखील करतं. डेनसूक वॉटरमेलनचा बाहेरून रंग काळा असल्याने त्याला ब्लॅक वॉटरमेलन असंही म्हणतात. जपानमध्ये अन्य कलिंगडांप्रमाणे बाजारात याची विक्री केली जात नाही. या खास जपानी कलिंगडासाठी बोली लावली जाते. त्यामुळे हे कलिंगड जगातलं सर्वांत महाग कलिंगड म्हणून ओळखलं जातं. 2019 मध्ये एका ब्लॅक वॉटरमेलनची तब्बल 4.5 लाख रुपयांना विक्री झाली होती.
जपानमधल्या होकाइडो आयलंडच्या उत्तर भागात या कलिंगडाचं उत्पादन होतं. या कलिंगडाचं उत्पादन जेमतेमच होतं. त्यामुळे हे कलिंगड दुर्मीळ मानलं जातं. एक वर्षात सुमारे 100 कलिंगडांचं उत्पादन होतं. चव, बिया, तसंच बाहेरचा भाग वैशिष्ट्यपूर्ण असल्याने डेनसूक वॉटरमेलन अन्य कलिंगडांच्या तुलनेत वेगळं ठरतं. हे ही वाचा-
Nutrition Tips: मनुके की द्राक्षे? काय खाणं आहे जास्त फायदेशीर; पोषण तज्ज्ञांनी दिलं याचं उत्तर
डेनसूक अर्थात ब्लॅक वॉटरमेलन अन्य कलिंगडांच्या तुलनेत जास्त गोड (Sweet) असतं. त्यामुळे सर्वांत गोड कलिंगड अशीदेखील याची ओळख आहे. यात बियांचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे ते अगदी सहजपणे खाता येतं. खास चवीमुळे हे कलिंगड जपानमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. अन्य कलिंगडांच्या बाहेरील भागावर पट्टे असतात; पण डेनसूक वॉटरमेलनच्या बाहेरच्या भागावर कोणतेही पट्टे नसतात. डेनसूक वॉटरमेलनची डिलिव्हरी साध्या पॉलिबॅग ऐवजी एका प्रीमियम बॉक्समधून केली जाते. जपानमध्ये हे कलिंगड खाण्यासोबतच गिफ्ट म्हणूनदेखील दिलं जात असल्यानं त्याचं पॅकिंगदेखील खास पद्धतीनं केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.