मुंबई : आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे सर्व जण हैराण होत आहेत. त्यामुळे साहजिकच कूलर, एसी, पंखा, रेफ्रिजरेटरसारख्या वस्तूंचा वापर वाढला आहे. प्रत्येक घरामध्ये रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज असतोच. उन्हाळ्यात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत, त्यांचा ताजेपणा टिकून राहावा यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. ग्राहकांची गरज आणि बजेटनुसार विविध कंपन्यांचे खास फीचर्स असलेले फ्रीज बाजारात उपलब्ध आहेत. अगदी कमी किमतीतदेखील दर्जेदार फ्रीज उपलब्ध असतात. उन्हाळा असो अथवा हिवाळा, फ्रीजचा योग्य मेंटेनन्स गरजेचा असतो. काही जण उन्हाळा सुरू होताच फ्रीजमधलं तापमान जास्त थंड ठेवतात. परंतु, ऋतुनिहाय फ्रीजमधलं तापमान नेमके किती असावं याची फारशी माहिती अनेकांना नसते. त्यामुळे फ्रीज खराब किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता असते. फ्रीजचा वापर कसा करावा, उन्हाळ्यात त्यातलं तापमान किती ठेवावं, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात फ्रीजला मागणीला वाढते. बहुतांश कंपन्या खास फीचर्स असलेले फ्रीज कमी किमतीत उपलब्ध करून देत असल्याने साहजिक ते खरेदी करणं शक्य होतं; पण फ्रीजची योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. फ्रीजची योग्य काळजी घेतली नाही तर तो लवकर नादुरुस्त होऊ शकतो. तसंच त्याचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. फ्रीजच्या मागच्या बाजूस एक कॉइल कंडेन्सर असतो. त्यामुळे फ्रीजमधलं तापमान थंड होतं; पण जेव्हा या कंडेन्सरवर घाण, धूळ साचते तेव्हा फ्रीज योग्य पद्धतीनं चालत नाही. त्यामुळे ठरावीक कालावाधीनंतर या कंडेन्सरची स्वच्छता करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे फ्रीजच्या मागच्या बाजूला एक ड्रेन पाइप असतो. फ्रीजमधलं अनावश्यक पाणी बाहेर टाकण्याचं काम हा पाइप करतो. हा पाईप खराब झाला आणि पाणी बाहेर पडणं बंद झालं तर फ्रीजमध्ये बर्फ साठू लागतो. त्यामुळे वेळोवेळी या पाइपची स्वच्छता करणं आवश्यक आहे. ओल्याव्यामुळे फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फ साठतो. वारंवार फ्रीज उघडत असाल तर ओलावा तयार होतो. ओलावा वाढू नये यासाठी विनाकारण फ्रीज उघडू नये. फ्रीज उघडल्यानंतर बाहेरची उष्ण हवा आत जाते आणि ती आतल्या थंड हवेच्या संपर्कात आल्याने फ्रीजमध्ये ओलावा निर्माण होतो. फ्रीज रिकामा राहत असेल तर त्यातल्या ओलाव्यामुळे जास्त बर्फ तयार होतो. त्यामुळे फ्रीजमध्ये अन्नपदार्थ, पेयं कायम ठेवावीत. फ्रीज खराब झाला किंवा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाला तर तातडीने कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला कळवावं. कारण कंपनी ओरिजनल पार्ट्सची हमी देते. अन्य पार्ट्स वापरले तर त्यामुळे कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फ्रीजचा वापर करताना स्वच्छता, तसंच अन्य सर्व गोष्टींची काटेकोर काळजी घ्यावी.
बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश फ्रीजमधलं तापमान नियंत्रित करण्यासाठी 1 ते 5 क्रमांक दिलेले असतात. बऱ्याच वेळा अनेक जण फ्रीजमधलं तापमान कमी क्रमांकावर ठेवतात. यामुळे फ्रीजमधल्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते. फ्रीज मीडियम म्हणजेच 3 ते 4 क्रमांकावर ठेवणं योग्य आहे. उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान यादरम्यानच असावं. काही जण हिवाळ्यात फ्रीज बंद करून ठेवतात. हिवाळ्यात फ्रीज बंद करणं चुकीचं आहे. हिवाळ्यात फ्रीज 1 क्रमांकावर ठेवावा. दीर्घ काळ फ्रीज बंद ठेवला तर त्यातला कॉम्प्रेसर जाम होण्याची शक्यता असते. दीर्घ काळ बंद असलेला फ्रीज एकदम सुरू केला तर कॉम्प्रेसर गरम होऊन खराब होतो. उन्हाळ्यात फ्रीजमधलं तापमान मीडियम, तर हिवाळ्यात एक क्रमांकावर असावं. यामुळे फ्रीज दीर्घ काळ उत्तम राहतो.