सेऊल, 15 जानेवारी : दक्षिण कोरिया देश काही चांगल्या आणि वाईट गोष्टींमुळे सध्या चर्चेत आहे. जन्मदरापेक्षा मृत्यू दराचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा देश चर्चेमध्ये असताना आता आणखी एका घटनेमुळे या देशाची चर्चा होतेय. पण ही घटना थेट भारताशी संबंधित आहे. या देशातील बुसान युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन स्टडीजमध्ये (BUFS) गेल्या 37 वर्षांपासून हिंदी विषय शिकवला जातोय. पण या युनिव्हर्सिटीने आता हिंदीचा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतलाय. युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाविरोधात दक्षिण कोरियातील विद्यार्थी आक्रमक झालेत.
युनिव्हर्सिटीने का घेतला निर्णय?
बुसान युनिव्हर्सिटी ऑफ स्टडीजमध्ये भारतीय भाषा, संस्कृती आणि भारतीय व्यावसायिक अभ्यास हे कोर्स आहेत. पण आता युनिव्हर्सिटीने भारतीय भाषा आणि संस्कृती या विषयांचे कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर फक्त भारतीय व्यावसायिक अभ्यास हा कोर्सच सुरू ठेवण्याचे ठरवलेय. युनिव्हर्सिटीच्या या निर्णयावर दक्षिण कोरियामधील हिंदी विषयावर प्रेम असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच ते युनिव्हर्सिटीच्या निर्णयाविरोधात उभे राहिले आहेत.युनिव्हर्सिटीचे असे म्हणणं आहे की, ‘कोरियामधील विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्था, इतिहास आणि इतर गोष्टी शिकल्या पाहिजे. हिंदी शिकण्याची गरज यासाठी नाही कारण भारतात राहताना, काम करताना इंग्रजी आलं तरी काम होतं.’ दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांना असं वाटतं की, भारतामध्ये काम करताना त्या ठिकाणचे सहकारी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी फक्त इंग्रजी येणं महत्वाचं नाही तर हिंदीची माहिती असणे देखील गरजेचं आहे. याच कारणामुळे याठिकाणी हिंदी विषय शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे.
कधी सुरू झाला होता हा कोर्स?
दक्षिण कोरियामध्ये 1983 साली बुसान युनिव्हर्सिटीमध्ये हिंदी विभाग सुरू करण्यात आला होता. तर याआधी 10 वर्षांपूर्वी सेऊलच्या हेंकुक युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन स्टडीजमध्ये लँग्वेज प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. याच दोन संस्था आहेत ज्या दक्षिण कोरियामध्ये हिंदी भाषा शिकवतात. त्यासोबतच भारतीय संस्कृतीचे देखील ज्ञान देतात. हे सर्व यासाठी आहे की, भारताशी संबंधित लोकांना याबद्दल जाणून घेता येईल आणि विशेष करुन तरुणांना आपला व्यवसाय भारताशी जोडायचा असेल तर त्यांना हिंदी भाषा शिकल्याने फायदा होईल.
भारतामध्ये दक्षिण कोरियाचे अनेक जण नोकरी करतात. इकनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद आणि चेन्नईतील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दक्षिण कोरियातील लोकं काम करतात. दरम्यान, भारत आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांचे व्यावसायिक संबंधामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. २०१९ मध्ये दोन्ही देशांमधील संबंध लष्करी पातळीवर आणखी दृढ झाले आहेत. गरजेच्या वेळी दोन्ही देश एकमेकांना नौदल तळाचा वापर इंधन पोहचवण्यासाठी करु शकतात. हा करार त्यावेळी झाला होता जेव्हा कोरिया चीनवरुन नाराज झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, South korea, Student, Students