नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : डोकंदुखी, हात-पाय दुखणे किंवा शरीरात कुठेही वेदना होत असतील तर अनेकजण सोपा मार्ग म्हणून वेदनाशामक (Pain Killer) औषधे घेतात. बहुतेक लोक या गोळ्या खाताना डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का की, असे दीर्घकाळ केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याबाबत झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार अनेक संशोधनांमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, सतत पेनकिलर खाल्ल्याने नंतर या औषधांचा काहीच परिणाम दिसून येत नाही. शिवाय दीर्घकाळानंतर त्यांचे दुष्परिणामही दिसू लागतात. पेनकिलर आपल्या आरोग्याला कशी हानीकारक आहे, त्याची माहिती जाणून घेऊया.
यकृताचे नुकसान
विशेषत: पॅरासिटामॉलशी संबंधित वेदनाशामक औषधांमुळे यकृताला नुकसान होण्याची शक्यता असते. पॅरासिटामॉलमुळे शरीराच्या चयापचयाद्वारे तयार होणारे पेरोक्साइड यकृतासाठी विषारी घटक बनू शकतात.
पोटदुखी आणि अल्सर
इबुप्रोफेन, ऍस्पिरिन आणि नेप्रोक्सेन यांसारखी वेदनाशामक औषधे पोटाच्या अस्तरांना हानी पोहचवू शकतात. जर तुम्हाला आधीच अल्सरची समस्या असेल तर या स्थितीत रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
नैराश्य
वेदनाशामक औषधे नैराश्यावर उपचार करणाऱ्या औषधांची प्रभाविता कमी करतात. जे लोक एंटिडप्रेसस घेतात त्यांनी वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर टाळावा (जसे की NSAIDs).
किडनी निकामी होण्याचा धोका
मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक जे नियमितपणे ibuprofen आणि naproxen सारख्या वेदनाशामक औषधांचा वापर करतात त्यांना मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांना आधीच किडनीची समस्या आहे त्यांना जास्त धोका असतो.
हे वाचा - वाढतं वय लपवण्याचा नवा ट्रेंड; कमी वयातच मुली करू लागलेत Botox ट्रीटमेंट
गर्भपात
गरोदरपणाच्या पहिल्या 20 आठवड्यात वेदनाशामक (जसे की NSAIDs) वापरणाऱ्या गर्भवती महिलांचा गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.
हे वाचा - हिवाळ्यात ही पालेभाजी खाण्याचे आहेत भरपूर फायदे; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, अनेक आजार राहतील दूर
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या
संशोधनात असे दिसून आले आहे की नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) चा वापर काही आठवड्यांनंतर हृदयविकाराचा झटका येण्याच्या जोखमीशी संबंधित आहे. ही औषधे न वापरणाऱ्या लोकांपेक्षा ही औषधे वापरणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 20 ते 50 टक्के जास्त असतो.
(सूचना- ही माहिती वैद्यकीय क्षेत्रातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Pain