नवि दिल्ली,28 ऑक्टोबर: आरोग्याच्या अनेक लहान-मोठ्या समस्यांवर आपण घरच्याघरी उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा उपचार म्हणून आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पतींचा वापर देखील करतो. आपल्या अवतीभवती अशा शेकडो वनस्पती आहेत ज्यांना आयुर्वेदात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. कोरफड (Aloe vera), ही अशीच आयुर्वेदिक महत्त्व असलेली वनस्पती आहे. कोरफडीमध्ये असलेल्या विविध औषधी गुणधर्मांमुळे (Medicinal properties) अनेक कारणांसाठी (multipurpose) तिचा वापर केला जातो. पण, कोरफडचे केवळ फायदेच नाहीत तर, काही तोटे देखील आहेत. ज्याबद्दल लोकांना माहिती नाही.
स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तर मोठ्या प्रमाणात कोरफड वापरली जाते. आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे आपण मागचा पुढचा विचार न करता कोरफडीचा वापर करतो. कोरोनाच्या काळामध्ये कोरफडीचा सर्वाधिक वापर केला गेला आहे. कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं, ही गोष्ट आपण विसरतो. कोरफड सेवनाबाबत देखील ही गोष्ट लागू होते. त्यामुळे कोरफडीचं जास्त प्रमाणात सेवन करणं टाळलं पाहिजे.
असे अनेक आजार आहेत ज्यामध्ये कोरफड खाल्ल्यानं तुमची समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते. आपल्याला याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारच्या समस्या असताना कोरफड खाणं टाळलं पाहिजे याबाबत आपण जाणून घेऊया. जेणेकरून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास कोरफड खाणं टाळलं पाहिजे. कारण, कोरफडीमुळं तुमचा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर कोरफड खाणं टाळलं पाहिजे. कोरफडीमुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावण्याचा धोका असतो. त्यामुळं गर्भपात किंवा बाळात जन्मदोषासारख्या समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.
जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही त्रास असेल तर कोरफड खाणं कटाक्षानं टाळलं पाहिजे. कोरफड खाल्ल्यानं शरीरात अॅड्रेनालाईन (Adrenaline) हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतात. यामुळं हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमिता येऊन तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.
किडनी स्टोन म्हणजे मुतखडा असलेल्या व्यक्तीनं कोरफडीपासून दूर राहिलं पाहिजे. स्टोन असलेल्या व्यक्तीनं कोरफड खाल्ल्यास त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय किडनीचा आजार असलेल्या पेशंटने कोरफड खाऊ नये.
कोरफड खाल्ल्यानं रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी कोरफड खाणं टाळावं. नाहीतर रक्तदाब आणखी खाली जाऊ शकतो.
वर दिलेले कोरफडीचे दुष्पपरिणाम सामान्यपणे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे सांगण्यात आले आहेत. कुठल्या त्रासासाठी कोरफड खाल्ली पाहिजे आणि कुठल्या त्रासात ती टाळली पाहिजे, ही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ठरवली तरच उत्तम.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips