अंतराळ सफरीच्या क्षेत्रात स्पेसएक्स कंपनीनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चार सर्वसामान्य नागरिकांना या कंपनीनं अंतराळ सफरीवर पाठवलं आहे. हे चौघे पुढचे तीन दिवस अंतराळात राहणार आहेत. पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणारा हा पहिला नॉन-प्रोफेशनल प्रयोग असणार आहे. ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून चौघांना अंतराळात पाठवण्यात आलं. हे चोघे पृथ्वीपासून 160 किलोमीटर उंचीवरून परिक्रमा करणार आहेत.
या यानानं रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी आकाशात उड्डाण केलं. उद्योजक जेरेड इसाकमेन हे या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. मेडिकल ऑफिसर हेली आर्सिनॉक्स, बालकॅन्सर तज्ज्ञ क्रिस सेम्ब्रोस्की आणि इंजिनिअर डॉ. सियान प्रॉक्टर हे अंतराळ सफरीवर गेले आहेत.
हे यान 575 किलोमीटर परिघात फिरणार आहे. आतापर्यंतच्या कुठल्याही मानवी यानाच्या तुलनेत हे यान पृथ्वीपासून सर्वाधिक दूर जाणार आहे. वरून पृथ्वीचे अप्रतिम आणि दुर्मिळ फोटोदेखील टिपले जाणार आहेत.
या मिशनचा उद्देश मानवतेला समृद्ध करणं आणि लहान मुलांच्या उपचारांसाठी निधी जमवणं हा असल्याचं सांगण्यात आलं आहे. अंतराळ सफरीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यासही या प्रवासानंतर केला जाणार आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन यांनी तीन कर्मचाऱ्यंसोबत अंतराळ सफर केली होती. त्यानंतरच सर्वसामान्यांसाठी अंतराळ सफरीचे दरवाजे खुले झाले होते.