रोम, 02 जानेवारी: स्वातंत्र चीनचे पहिले अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी पक्षी शेतातलं धान्य खातात म्हणून त्यांना मारून टाकण्याचा आदेश दिला होता. वर्षभरात हे पक्षी लाखो टन धान्य फस्त करतात. त्यामुळे देशाला मोठा तोटा सहन करावा लागातो, हा त्यामागचा विचार. पक्षी मारण्यासाठी नागरिकांना त्यांनी बक्षिसंही जाहीर केली होती. यावेळी देशातील नागरिकांनी असंख्य पक्षांना मारलं होतं. काही काळातच या देशात एकही पक्षी दिसेनासा झाला. परिणामी चीनमध्ये निसर्गाचं संतुलन बिघडवलं आणि तेथील बहुतांशी शेतीवर टोळधाडी पडल्या. यामध्ये चीनचं अमाप नुकसान झालं होतं. हे सगळं आठवायचं कारण आहे हा फोटो. इटलीमध्ये तसाच काहीसा प्रकार घडला. पण तो अनवधानाने!
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इटलीच्या राजधानीत नवीन वर्षाच्या रात्री जल्लोषात फोडलेल्या फटाक्यांमुळे शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पशु हक्कांसाठी काम करणाऱ्या समूहांनी याला "नृशंस" म्हटलं आहे.
रेल्वे स्थानकात शेकडो पक्षी मृतावस्थेत आढळले
रोमच्या मुख्य रेल्वे स्थानक परिसरात असंख्य पक्षी जमिनीवर मृतावस्थेत पडलेले दिसले आहेत. या पक्ष्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ एनिमल्स (OIPA) ने असं म्हटलं आहे की, नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे आजूबाजूच्या परिसरातील झाडांवर राहणाऱ्या हजारो पक्षांचा मृत्यू झाला आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेले पक्षी भीतीमुळे मरण पावले असल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे.
विद्युत तारांचा धक्का बसल्याने पक्षांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
असं म्हटलं जात आहे की, हे सर्व पक्षी कदाचित फटाक्यांच्या भीतीमुळे एकत्र उडत असतील. त्यामुळे ते एकमेकांशी धडकले असतील किंवा खिडक्यांची ठोकर लागून मरण पावले असतील. शिवाय इलेक्ट्रिक पॉवर लाइनला धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या संघटनेच्या प्रवक्त्या लॉर्डाना डिग्लिओ यांनी सांगितलं की, हे पक्षी हृदयविकाराच्या झटक्यानं देखील मरू शकतात, हे आपण विसरता कामा नये. अशाप्रकारच्या आतिषबाजीमुळे दरवर्षी असंख्य वन्य आणि पाळीव प्राण्यांना त्रास आणि दुखापत होते.