मुंबई : आरोग्यासाठी पोषक आणि संतुलित आहार गरजेचा आहे. आरोग्य उत्तम राहावे आणि शरीराला सर्व पोषक घटक मिळावेत या साठी बहुतांश लोक शाकाहारासोबत मांसाहारदेखील करतात. अंडी, चिकन, मासे आणि मटन आदी पदार्थांच्या सेवनातून शरीराला विविध पोषक घटक मिळतात.
मांस प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजांचा उत्तम स्रोत मानला जातो. मात्र काही वैद्यकीय तज्ज्ञ लाल किंवा प्रक्रियायुक्त मांस कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. लाल मांस अर्थात रेड मीट जास्त प्रमाणात खाणं शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतं. लाल मांस जास्त खाल्ल्यास कोलेस्टेरॉलची पातळी वाढून हृदयविकार होऊ शकतो तसेच हाडांचे आजार होऊ शकतात.
लाल मांस जास्त खाण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते, ते सविस्तर जाणून घेऊया. मांसामध्ये विविध पोषक घटक असतात. पण लाल मांसाचं सेवन प्रमाणात करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. काही प्रकारच्या मांसात सॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असतात.
त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने कोरोनरी हार्ट डिसीजचा धोका वाढतो. प्राणिज प्रथिनं, विशेषतः लाल मांस हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसानदायी ठरू शकते.
जास्त प्रमाणात प्रोटिन असलेले पदार्थ विशेषतः प्राणिज पदार्थ आहारात समाविष्ट केले तर शरीरातील कॅल्शियम कमी होऊन हाडांचे आरोग्य बिघडू शकते. प्राणिज प्रथिनं विशेषतः लाल मांस खाल्ल्याने रक्त अम्लीय बनू शकते. त्यामुळे हाडांमधले कॅल्शियम बाहेर टाकले जाऊ शकते.
मांसामध्ये उच्च फॉस्फरस ते कॅल्शियम असे गुणोत्तर असते. त्यामुळे कॅल्शियम बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. परिणामी, हाडांतील कॅल्शियम कमी होऊन ती ठिसूळ होऊ शकतात.
``तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन आणि वनस्पती आधारित प्रोटिनयुक्त पदार्थ समाविष्ट असावेत. त्यासोबत भरपूर फळं,भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समतोलदेखील आहारात गरजेचा आहे,`` असं न्युट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी सांगितले.
बीन्स, मसूर, भाज्या आणि पौष्टिक धान्य हे मांसविरहित पदार्थ आहारात गरजेचे आहेत. वनस्पती आधारित प्रोटिनयुक्त पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पालेभाज्या, वनस्पती आधारित प्रोटिनयुक्त पदार्थ हे मांसाच्या तुलनेत स्वस्त आहेत.
यामुळे तुमची आर्थिक बचतही साध्य होते. तसेच लाल किंवा प्रक्रियायुक्त मांस, सॉफ्ट ड्रिंक्स, तळलेले पदार्थ आणि रिफाईंड धान्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केला तर तुमच्या हाडांच्या आरोग्यावर निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Tasty food