मुंबई, 24 सप्टेंबर - नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा करतात. यंदा सोमवार 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापना होईल आणि नवरात्रोत्सवाची सुरुवात होईल. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अर्पण केले जातात. यामध्ये चंपाकळीचा नैवेद्य सुद्धा देवीला अर्पण केला जातो. हा चंपाकळीचा नैवेद्य कसा बनवला जातो याचीचं सोपी पद्धत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रजनी नाफडे यांनी ही सोपी पद्धत सांगितली आहे. चंपाकळी बनवण्यासाठी साहित्य मैदा- एक वाटी साखर - एक वाटी तूप - एक टेबलस्पून केशरी रंग - चिमुटभर मीठ - चवीनुसार पाणी - गरजेनुसार तेल - बुडत्या तेलात तळावे हेही वाचा : Navratri 2022 : ‘या’ पद्धतीनं करा घटस्थापना, पाहा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी, Video चंपाकळी कशी बनवावी? सर्वप्रथम एक वाटी मैदा पसरट भांड्यात घेऊन त्यावर 2-3 चिमुट मीठ घालावे. एक चमचा साजूक तूप घालून मैद्याला मोहन द्यावे आणि मैद्याची घट्ट कणीक मळावी. या कणकेला 30 मिनिटे झाकून ठेवावे. 30 मिनिटांनी कणकेच्या लाट्या बनवून बारिकसर गोल लाटून घ्याव्या. त्या गोल पोळीला चौकोनी आकारात कापावे. त्यानंतर चौकोनी पुरीला पूर्ण कट न करता आतल्या आत काप करावे. त्यानंतर जाळी सारखा भाग तयार होईल. त्यानंतर आयताकृती घडी करून आत असलेल्या कापांना फुलाच्या पाकळीचा आकार देण्यासाठी दोन भागात विभागावे. पाकळीचे दोन्ही टोक व्यवस्थित घडी करावे. तापलेल्या तेलात मंद फ्लेमवर पाकळ्या सोनेरी होईपर्यंत तळाव्या आणि साखरेच्या पाकात 10 मिनिटे ठेवाव्या. यासाठी पाक कसा बनवावा? एकवाटी साखर भांड्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी त्यात ओतावे आणि त्याचा एकतारी पाक बनवावा. (पाक एकतारी झाला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पाकाचा एक थेंब बोटावर घेऊन त्याला पिंच करून बघावे दोनही बोटांच्या मध्ये पाकाची एक तार तयार झाल्यास तो एकतारी पाक होतो.) पाक तयार झाल्यावर केसरी रंग घालावा. अश्या पद्धतीने चंपाकळी अगदी खुसखुशीत बनते आणि तुम्ही सुद्धा ही सोपी पद्धत वापरून देवीसाठी नैवेद्य घरच्या घरी बनवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.