पावसाला सुरुवात झाली की रानात माळावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. आदिवासी महिला भर पावसात या भाज्या घेऊन बाजारात येतात. पण, आपल्याला या भाज्यांची ओळख नसल्याने त्या कशा करायच्या आणि खायच्या हेच माहिती नसतं.
काही रानभाज्या किंवा जंगली भाज्या केवळ पावसाळ्यात मिळतात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम,कॅल्शियम असतं.
शेवळं-ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला मिळते. ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. पण, यात मूत्राशयाचे आजार बरे करण्याची ताकद असते. शेवळांची भाजी किंवा वडीही बनवतात.
टाकळा-टाकळ्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो.तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजी प्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होतं शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.
करटोली-थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होतं आणि मुळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्या सारखी दिसते.
कुर्डू-पावसाळ्यात मिळणारी ही भाजी गावाकडच्या भागात अवडीने खाल्ली जाते. युरीनच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला,कफ कमी करू शकते. ही भाजी आपल्या पालेभाज्यांप्रमाणेच बनवतात.
कोरळा-या भाजीला फोडशी,कुळी किंवा कुबळी म्हटलं जातं. लांबट पातीसारखी ही भाजी असते. याची भाजी, थालीपिठं बनवता. अतिशय चवदार असते.
तादूंळजा किंवा रानमाठ-जसा चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.
पावटा-हा भाजी बाजारात मिळत नाही पण, घरीच उगवता येते. त्यासाठी गावठी वाल भिजत घालावेत, त्यांना मोड आल्यावर पानं फुटेपर्यंत तसेच ठेवावेत. अगदी हिरवी पानं आली की मेथीच्या भाजी प्रमाणे बनवावेत. पावसाळ्यातच असे मोड येतात. याला वालाचे स्प्राऊट म्हणता येईल.
आळू किंवा तेरी-बारामाही आळूपेक्षा या भाजीची पानं थोडी पातळ असतात. या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. आळूची वडी किंवा फदफद आवडीने खाल्ल जातं.
उळशीचा मोहोर-साधराणपणे ऑगस्ट महिन्यात उळशीचा मोहोर येतो. या मोहराची भाजी बनवतात. अगदी माशाच्या अंड्यासारखी ही भाजी दिसते म्हणून तिला गाबूलीची भाजीही म्हणतात.
रान कंद- पावसाळ्यात मिळणारे करांदे आवडीने खाल्ले जातात. कापलेले करांदे राखेत घोळवून पळसाच्या पानात शिजवतात. शिवाय पाऊस कमी झाला की, रताळे, करांदे,कोळू,चाई,कणंक यात व्हिटॅमीन ए,बी 5,बी 6,थायमिन, नायसिन, रिबोफलाविन, कॅरोनाईट्स असतं. हे घटक कॅन्सर सारख्या आजाराला दूर ठेवातात.