मुंबई, 9 ऑगस्ट- राखीपौर्णिमा म्हणजे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावाच्या हातावर बहीण प्रेमाचा धागा बांधते आणि भाऊ आयुष्यभर तिला साथ देण्याचं, तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. काळ कितीही बदलला तरी बहीणभावाचं हे अतूट नातं कायम असतं. त्यामुळेच राखीपौर्णिमेचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. हा भारतातील महत्त्वाचा सण आहे. इतिहासातही आणि पुराणातही राखी पौर्णिमेचे अनेक दाखले सापडतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा राखीपौर्णिमा येत्या गुरुवारी म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. पण यंदा भद्रकाल असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे. भद्रकालात कोणतीही शुभ गोष्ट करू नये असं मानलं जातं. त्यामुळे भद्रकालात राखी बांधणंही अशुभ समजलं जातं. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबद्दल वृत्त देण्यात आलं आहे. या वर्षी पौर्णिमा 11 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.17 मिनिटांपर्यंत पौर्णिमा असेल. 11 ऑगस्टला पौर्णिमेबरोबरच भद्राकालही आला आहे. 11 ऑगस्ट रोजी भद्रकाल आल्याने 12 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारीही राखीपौर्णिमा साजरी केली जाऊ शकते असं काहीजणांचं म्हणणं आहे. भद्रकालात राखी बांधल्यास त्याचे भावाच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतात असा समज आहे.रामायणातील रावणाची बहीण शूर्पणखेनं भद्रकालातच रावणाला राखी बांधली होती. यानंतरच रावणाचा वाईट काळ सुरू झाला असं मानलं जातं आणि रावणाचा प्रवास त्याच्या अधोगतीकडे होऊ लागला. त्यामुळे रावणाचा सर्वनाश झाला असं म्हणतात. त्यामुळे आपल्या भावावर भद्रकालाचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी या काळात बहिणींनी भावाला राखी बांधू नये. **(हे वाचा:** Rekshabandhan 2022: रक्षाबंधननिमित्त तुमच्या हातावर काढा सुंदर मेहंदी, पाहा ‘या’ आकर्षक डिझाईन ) भविष्यवेत्त्यांचं म्हणणं आहे की भद्रा तीनही लोकांमध्ये फिरत असते आणि ती विविध राशींमध्येही वास करते असं म्हटलं जातं. पण जेव्हा ती मृत्युलोकात वास करते तेव्हा कोणतंही शुभकार्य करू नये असं म्हटलं जातं. मृत्युलोकात असताना भद्रा शुभकार्यामध्ये अडचणी निर्माण करते. भद्रकालात कोणत्याही प्रकारची शुभकार्यं करू नयेत. भद्रा शनिदेवाची बहीण आहे आणि तिचा स्वभावही शनीसारखाच आहे असं हिंदू धर्मशास्त्राचे विद्वान सांगतात. म्हणजेच भद्रा ही सूर्याची मुलगी आहे. पंचागावरून भद्राची स्थिती मोजली जाते. भद्राची स्थिती समजण्यासाठी ब्रह्मदेवाने पंचागामध्ये एक वेगळी स्थिती प्रदान केली आहे असं म्हटलं जातं. या वर्षीच्या राखीपौर्णिमेच्या दिवशी या भद्राकालाचं सावट आहे. पण भद्राची सावली पाताळ लोकात पडणार आहे. पृथ्वीवर (Earth) त्याचा परिणाम होणार नाही असं काही ज्योतिषांचं म्हणणं आहे. तुमच्या धारणेनुसार तुम्ही राखी पौर्णिमा कधी साजरी करायची हे ठरवू शकता पण ती साजरी मात्र करा म्हणजे तुमचं नातं दृढ होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.