मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एंडोमेट्रिओसिसमुळे येतेय आई होण्यात अडचण? डॉक्टरांनी सांगितले योग्य उपाय

एंडोमेट्रिओसिसमुळे येतेय आई होण्यात अडचण? डॉक्टरांनी सांगितले योग्य उपाय

आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात मोठ स्थित्यंतर येत असल्यानं आई होणं हा एका स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या स्थित्यंतराची सुरुवात प्रेग्नन्सीपासूनच होते.

आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात मोठ स्थित्यंतर येत असल्यानं आई होणं हा एका स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या स्थित्यंतराची सुरुवात प्रेग्नन्सीपासूनच होते.

आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात मोठ स्थित्यंतर येत असल्यानं आई होणं हा एका स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या स्थित्यंतराची सुरुवात प्रेग्नन्सीपासूनच होते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 22 मार्च : बाळाला जन्म द्यावा, आपणही आई व्हावं, अशी जवळपास सर्वच स्त्रियांची इच्छा असते. आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात मोठ स्थित्यंतर येत असल्यानं आई होणं हा एका स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या स्थित्यंतराची सुरुवात प्रेग्नन्सीपासूनच होते. मात्र सर्वच स्त्रियांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे अनेकींना आई होताना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानांमध्ये एंडोमेट्रिओसिसचा समावेश होतो.

  एंडोमेट्रिओसिस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये गर्भाशयातील अस्तरांसारख्या ऊती गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. साधारण अंडाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा इतर पेल्विक संरचनांवर या ऊती वाढतात. यामुळे स्त्रीला तीव्र वेदना आणि वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. प्रजननक्षम वयातील सुमारे 10 टक्के स्त्रियांना एंडोमेट्रिओसिस प्रभावित करतो. 'हिंदुस्थान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम हा घटक एंडोमेट्रिओसिसच्या सर्वात आव्हानात्मक पैलूंपैकी एक आहे. असा अंदाज आहे की एंडोमेट्रिओसिस असलेल्या 50 टक्के स्त्रियांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो. असं असलं तरी योग्य उपचारानंतर एंडोमेट्रिओसिस असलेल्या अनेक स्त्रियाची गर्भधारणा होऊ शकते आणि त्या निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात.

  एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, मिश्का आयव्हीएफ सेंटरमधील कन्स्लटंट गायनॅकॉलॉजिस्ट, इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आणि कॉस्मॅटिक गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. रुची भंडारी यांनी एंडोमेट्रिओसिस आणि वंध्यत्वाच्या संबंधाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, "एंडोमेट्रिओसिसमुळे प्रजननक्षमतेवर नक्की कशाप्रकारे परिणाम होतो ती यंत्रणा अद्याप पूर्णपणे समजलेली नाही. असे अनेक संभाव्य घटक आहेत जे गर्भधारणेत अडचणी निर्माण करू शकतात."

  गर्भधारणेत अडचणी निर्माण करणारे संभाव्य घटक

  1. एंडोमेट्रिओसिसमुळे चिकट किंवा डाग असलेल्या ऊतींची निर्मिती होऊ शकते. हा प्रकार प्रजनन अवयवांच्या योग्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतो. ज्यामुळे स्पर्मला अंडाशयापासून गर्भाशयापर्यंत प्रवास करणं किंवा पोहोचणं कठीण होतं.

  2. एंडोमेट्रिओसिसमुळे जळजळ होऊ शकते. ज्यामुळे गर्भाशयातील अंड्यांच्या गुणवत्तेला हानी पोहोचू शकते किंवा रोपण होण्यात व्यत्यय येऊ शकतो. शरीरातील हार्मोनल संतुलनावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे ओव्हुलेशन आणि गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सच्या नाजूक हालचालींमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

  3. एंडोमेट्रिओसिस असलेल्या काही स्त्रियांमध्ये निदान होत नसलेली समस्या असू शकते. त्यामुळे प्रजनन क्षमता आणखी गुंतागुंतीची होते. उदाहरणार्थ, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) किंवा युटेरियन फायब्रॉइड्स.

  एंडोमेट्रिओसिस आणि प्रजननाशी संबंधित समस्या असलेल्या स्त्रियांसाठी उपलब्ध असलेल्या उपचारांच्या पर्यायांबद्दल बोलताना, आरोग्य तज्ज्ञांनी खुलासा केला की, एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांना गर्भधारणा होण्यास मदत करणारे अनेक उपचार उपलब्ध आहेत. स्त्रीच्या वैयक्तिक लक्षणांवर, एंडोमेट्रिओसिसची तीव्रता आणि इतर घटकांवर या उपचारांचा वापर अवलंबून आहेत.

  1. सर्जरी : काही प्रकरणांमध्ये, एंडोमेट्रियल टिश्यू काढून टाकण्यासाठी सर्जरीची गरज असू शकते. सर्जरी केल्यास गर्भधारणेतील शारीरिक अडथळे कमी होऊन प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. असं असलं तरी, सगळ्याच केसेसमध्ये सर्जरी प्रभावी ठरत नाही. कारण, त्यात संसर्ग, रक्तस्त्राव किंवा प्रजनन अवयवांचं नुकसान यासारखे धोके देखील असू शकतात.

  2. हार्मोनल थेरेपी : गर्भनिरोधक गोळ्यांसारख्या हार्मोनल थेरेपीमुळे मासिक पाळीचं नियमन करण्यात आणि एंडोमेट्रिओसिसच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यात मदत होऊ शकते. ही थेरेपी ओव्हुलेशनला प्रोत्साहन देऊन प्रजनन क्षमता सुधारण्यास देखील मदत करू शकते. मात्र, एंडोमेट्रिओसिस असलेल्या सर्व स्त्रियांसाठी ही थेरेपी प्रभावी असू शकत नाही. कारण, यामुळे वजन वाढणं, मूड बदलणं किंवा कामवासना कमी होणं यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

  3. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) : गंभीर एंडोमेट्रिओसिस किंवा इतर प्रजनन समस्या असलेल्या स्त्रियांसाठी आयव्हीएफ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये अंडाशयातून अंडी काढणं, त्यांना प्रयोगशाळेत स्पर्मसोबत फर्टिलायझिंग करणं आणि त्यातून तयार झालेला गर्भ गर्भाशयात हस्तांतरित करणं या क्रियांचा समावेश होतो. आयव्हीएफ उपचारपद्धती महाग ठरू शकते आणि प्रत्येकवेळी ती यशस्वी होईलच याची शाश्वती नसते. पण, यामुळे एंडोमेट्रिओसिस असलेल्या अनेक महिलांना गर्भधारणा होण्यास मदत झाली आहे.

  4. लाइफस्टाईलमधील बदल : लाइफस्टाईलमधील अनेक बदलदेखील एंडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रियांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. यामध्ये योग्य वजन राखणं, पुरेसा व्यायाम करणं, तणाव कमी करणं, धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळणं यांचा समावेश होतो.

  डॉ. रुची भंडारी शेवटी सांगतात की, एंडोमेट्रिओसिस ही एक गुंतागुंतीची स्थिती आहे जी स्त्रियांसाठी वेदनादायक आणि त्रासदायक ठरू शकते. पण, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, एंडोमेट्रिओसिस असलेल्या अनेक स्त्रिया योग्य उपचारांच्या मदतीने गर्भधारणा करू शकतात. जर तुम्ही वंध्यत्वाचा सामना करत असाल आणि तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असल्याची शंका असेल, तर उपलब्ध उपचारांच्या पर्यायांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमचं कुटुंब वाढवू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy