मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गरोदरपणातला उन्हाळा होईल कूल! फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स

गरोदरपणातला उन्हाळा होईल कूल! फॉलो करा तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स

गरोदर स्त्रियांना उन्हाळ्यात काही प्रमुख समस्या समस्या भेडसावू शकतात. त्याबाबत माहिती घेतल्यास उपाय करणं शक्य होतं.

गरोदर स्त्रियांना उन्हाळ्यात काही प्रमुख समस्या समस्या भेडसावू शकतात. त्याबाबत माहिती घेतल्यास उपाय करणं शक्य होतं.

मुळातच गरोदरपणात स्त्रियांची प्रकृती नाजूक असते. त्यातच वाढत्या तापमानामुळे गरोदरपणात अस्वस्थ वाटू शकतं. उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होतं, पचनशक्ती मंदावते, भूक लागत नाही. याचाही गर्भावर परिणाम होऊ शकतो.

  मुंबई, 25 मे : कडक उन्हाळ्यात लहान मुलं आणि वृद्धांची अधिक काळजी घ्यावी लागते. तशीच काळजी गरोदर स्त्रियांचीही घेणं गरजेचं असतं. मुळातच गरोदरपणात स्त्रियांची प्रकृती नाजूक असते. त्यातच वाढत्या तापमानामुळे गरोदरपणात अस्वस्थ वाटू शकतं. उन्हाळ्यात शरीरातलं पाणी कमी होतं, पचनशक्ती मंदावते, भूक लागत नाही. याचाही गर्भावर परिणाम होऊ शकतो.

  त्यामुळे विशेषतः गरोदर स्त्रियांनी उन्हाळ्यात योग्य काळजी घेतली पाहिजे. बेंगळुरूच्या फोर्टिस हॉस्पिटलमधल्या ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजीच्या सीनिअर कन्सल्टंट डॉ. जयश्री नागराज भस्की यांनी त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. गरोदर स्त्रियांना उन्हाळ्यात काही प्रमुख समस्या समस्या भेडसावू शकतात. त्याबाबत माहिती घेतल्यास उपाय करणं शक्य होतं.

  - सुरुवातीच्या काळातली मळमळ आणि उलट्या

  दिवस राहिल्यानंतर सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये 60 ते 70 टक्के स्त्रियांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. जास्त उलट्यांमुळे शरीरातलं पाणी कमी होतं आणि अशक्तपणा येऊ शकतो. बरेचदा त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. उन्हाळ्यात ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते.

  - अपचन, गॅसेस, सूज येणं, भूक कमी होणं

  गरोदरपणात होणारे बदल अन्ननलिका, पोट आणि आतड्यांमधून अन्नाची हालचाल मंदावण्यास कारणीभूत ठरतात. आतड्याचे स्नायू आणि sphinctersदेखील शिथिल होतात. त्यामुळे आम्ल आणि अन्नाचं नीट पचन होत नाही व छातीतली जळजळ वाढते. गर्भामुळे पोटाचा आकार वाढून पोटाच्या वरच्या बाजूचा दाब वाढतो व अस्वस्थताही वाढते.

  - सूज

  गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यांनंतर साधारण 60 टक्के महिलांचे पाय व पावलं सुजतात. उष्ण हवामानामध्ये हे अधिक जाणवू शकतं व अस्वस्थता निर्माण होऊ शकते. अर्थात पावलं, पाय, बोटं आणि चेहऱ्याला जास्त सूज येणं किंवा अचानक सूज येणं हे गरोदरपणात उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. त्यामुळेच प्रमाणापेक्षा जास्त सूज असेल व विश्रांतीनेही कमी होत नसेल, तर आपल्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं.

  - गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे श्वास लागणं

  गर्भाच्या आकारासोबत वाढणारं गर्भाशय फुफ्फुसांवर दबाव निर्माण करतं. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे स्त्रियांना जाणवणारी गुदमरण्याची भावना उष्ण तापमानात वाढू शकते. विशेषत: झोपताना त्यांना श्वास घेण्यात समस्या येऊ शकतात.

  - गरम होणं

  गरोदर स्त्रिया बहुतेकहा गरम होत असल्याची आणि घाम आल्याची तक्रार करतात. त्याचं कारण गरोदर महिलांच्या शरीरात इतर स्त्रियांच्या तुलनेत 1-1.5 लिटर अतिरिक्त रक्त असतं. हे त्यांचं चयापचय जास्त असल्यामुळेदेखील असू शकतं.

  गरोदरपणातला उन्हाळा असा ‘कूल’ करा

  1. भरपूर पाणी प्या : गरोदर महिलांच्या शरीराचं तापमान अनेकदा वाढतं. ते स्थिर ठेवणं गरजेचं असतं. उष्णतेचा सामना करताना शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढणं ही पहिली गोष्ट करावी लागते. हे मुख्यतः भरपूर पाणी पिऊन साध्य करता येतं. परंतु फळांचे रस किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या ताज्या भाज्यांचं सेवनदेखील केलं जाऊ शकतं. केवळ पाणी पिण्याव्यतिरिक्त आहारात भाज्या, फळं, सूप यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात खूप गोड पेयं प्यायल्यानंतर लगेचच तहान लागल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे शक्यतो टाळा.

  2. आंघोळ : कडक उन्हाळ्यात तापमानाचा सामना करण्यासाठी सामान्य तापमानातल्या पाण्याने आंघोळ करणं किंवा शॉवर घेणं इष्ट असतं. गरम हवामानात थंड पाण्याचा शॉवर घेण्याचा मोह होऊ शकतो; मात्र यामुळे शरीराचं तापमान वाढतं. कारण आपल्या शरीराला सभोवतालच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी काम करावं लागतं. म्हणूनच जास्त थंड पाण्याने आंघोळ केल्यावर शरीर काही मिनिटांनंतर पुन्हा गरम होईल. पहाटे किंवा झोपायच्या आधी थंड पाण्याने आंघोळ केली, तर कित्येक तास ताजंतवानं राहता येईल. थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय नसेल तर आधी आपल्या पावलांवर, पायांवर आणि नंतर हातांवर पाणी घेऊन सुरुवात करा. डोक्यापासून सुरुवात करा व पोटावर सर्वांत शेवटी पाणी घ्या. हाताने गोलाकार मसाज करून पोटावरून पाणी घ्या.

  3. योग्य कपड्यांची निवड : उन्हाळ्यात चांगले आणि आरामदायी कपडे निवडा. हे कपडे घट्ट नसावेत. तसंच त्यानं अस्वस्थ वाटू नये, हालचाल सुलभ करता यावी. घाम शोषून घेऊन लगेचच वाळतील असे कपडे या काळात घाला. त्वचेची छिद्रं मोकळी राहतील, यासाठी हलके कपडे घाला. एकावर एक कपडे चढवू नका.

  4. हलका व्यायाम व हालचाल : गरोदर स्त्रियांनी हलका व्यायाम करणं हिताचं असतं. उन्हाळ्यातही हे व्यायामप्रकार केले पाहिजेत; मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं. स्नायू लवचीक ठेवल्याने वाढत्या वजनामुळे येणारी शिथिलता कमी होऊ शकते. तसंच रक्ताभिसरणही चांगलं राहतं. चालणं आणि पोहणं हे उत्तम व्यायाम समजले जातात; मात्र त्यांचा अवलंब डॉक्टरांच्या सल्ल्यानंच करावा.

  5. हलका व थोड्या थोड्या वेळानं आहार : उन्हाळ्यात रात्री उशिरा जेवू नये आणि हलका आहार घ्यावा. सकाळचा नाश्ता परिपूर्ण, पौष्टिक असणं आवश्यक असतं. दिवसभरात 5 वेळा थोडं-थोडं खावं. त्यापैकी किमान एक किंवा दोन आहारांमध्ये फळं व भाज्या असाव्यात. या काळात आहारात पचायला हलक्या प्रथिनांचा समावेश जरूर करावा.

  6. विश्रांती : दिवसातून एकदा किंवा दोन वेळा थोडी झोप घेणं गरजेचं असतं. सावलीत व ताज्या, मोकळ्या हवेत बसणं हिताचं ठरतं. पाण्यावर तरंगण्यामुळेही शरीर व मनाला आराम मिळतो. त्रास होणार्‍या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरोदरपणात फायदेशीर ठरतं.

  गरोदरपणात उन्हाळा सुसह्य व्हावा, यासाठी लहान-मोठ्या बदलांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्लाही अवश्य घ्यावा.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips, Life18, Lifestyle, Pregnancy