मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पिझ्झा-बर्गर खाणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण? वैज्ञानिकांकडून अलर्ट

पिझ्झा-बर्गर खाणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण? वैज्ञानिकांकडून अलर्ट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या अन्नपदार्थांत केमिकल आणि स्वीटनर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 29 नोव्हेंबर : निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सध्या पिझ्झा, पास्ता, बर्गर, वेगवेगळ्या प्रकारची सूप, इन्स्टंट नूडल्स, पॅक केलेलं अन्न, केक, बिस्किट अशा गोष्टींचा आहारात सर्रास समावेश केला जातो. परंतु हे अन्नपदार्थ खात असताना आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होतो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये अपायकारक केमिकल, स्वीटनर अधिक असल्यानं दीर्घकाळापर्यंत याचं सेवन करणं आजाराला निमंत्रण देण्यासारखं आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करू नये असं आहारतज्ज्ञ सांगत असतात. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थांत फायबर आणि पोषक घटकांची कमतरता असल्याचं दिसून आलं आहे. दीर्घकाळापर्यंत पिझ्झा, बर्गर, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स असे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाण्याची तुम्हाला आवड असेल तर यापासून आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

फॅमिली हिस्ट्री, वाढतं वय आणि चुकीच्या जीवनशैलीशी संबंधित हा आजार आहे. एखाद्या व्यक्तीची दीर्घकाळापर्यंत जीवनशैली बिघडलेली असेल तर ती व्यक्ती या आजाराच्या विळख्यात येण्याची दाट शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाणाऱ्या 29 टक्के पुरूषांमध्ये हा आजार होण्याची शक्यता असल्याचंही यात म्हटलं गेलं आहे. दुसरीकडे महिला अधिक प्रमाणात ‘रेडी टू ईट’चे अन्नपदार्थ खात असेल तर त्यांच्यात 17 टक्क्यांपर्यंत कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं शास्त्रज्ञांनी संशोधनात स्पष्ट केलं आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे काय? यापासून कॅन्सर कसा होतो

घरात दैनंदिन स्वयंपाक करताना ज्या अन्नपदार्थांचा उपयोग केला जात नाही त्याला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हटलं जातं. या अन्नपदार्थांत केमिकल आणि स्वीटनर मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. वास्तविक पाहता अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये यामध्ये बराच फरक आहे.

अन्नपदार्थ गरम करणं, त्याला फ्रीज करणं, डायसिंग, ज्युसिंग आदी गोष्टींचा प्रोसेस्ड फूडमध्ये समावेश होतो. तुलनेत प्रोसेस्ड फूड शरीराला अधिक अपायकारक नाही. पण इन्स्टंट नूडल्स आणि सूप, रेडी टू ईट मील्स, पॅक्ड स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, केक, बिस्किट, मिठाई, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड शरीराला अपायकारक ठरू शकतं.

हे खाद्यपदार्थ अगदी सहजपणे मिळतात. यात अधिक कॅलरीज असतात. आपणाला भूक किती आहे याचा विचार न करता याचं अधिक सेवन केलं जातं. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. सध्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड पाश्चिमात्य जीवनशैलीचा एक भाग बनला आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाणाऱ्या व आरोग्यदायी आहार न घेणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं जवळपास 23,000 लोकांवर केलेल्या संशोधनातून शास्त्रज्ञांना आढळलं आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थापासून दूर राहण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.

अल्ट्रा पोसेस्ड अन्नपदार्थ असे टाळा

अल्ट्रा पोसेस्ड अन्नपदार्थ खाणं सामान्य बाब आहे आणि इच्छा असूनही ते टाळता येऊ शकतं नाही, असं मानलं गेलं आहे. पण वास्तविक पाहता हा समजच चुकीचा असल्याचे ब्राझीलमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार समोर आले आहे. कुठल्याही प्रकारच्या डाएटमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडची गरज नसते. लोक केवळ त्यांची सोय आणि चव यासाठी या अन्नपदार्थाचा आहारात समावेश करतात.

बहुतांशी वेळा अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चरबी, साखर आणि मीठ असते. परंतु आरोग्याला आवश्यक असणाऱ्या फायबर आणि पोषक घटकांची यात कमतरता असते. लोकांनी अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थांकडे वळू नये म्हणून सरकारने धोरण ठरवणं गरजेचं आहे.

यांचं उत्पादन, विक्री व प्रचार कमी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजेत असं या संशोधनात म्हटलं गेलं आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे दुष्परिणाम सांगून लोकांना आरोग्यदायी आहार घेण्यासाठी प्रेरीत केलं जाणंही तितकचं आवश्यक असल्याचं यात म्हटलं गेलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक स्वत: आपल्या खाण्याच्या सवयींत बदल करू शकतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून या समस्येपासून सुटका करून घेऊ शकतात.

First published:

Tags: Cancer, Health Tips, Junk, Lifestyle