मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा होतो मृत्यू

फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा होतो मृत्यू

सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागची कारणं, त्यामुळे होणारे मृत्यू, त्याची लक्षणं आदी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.

सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागची कारणं, त्यामुळे होणारे मृत्यू, त्याची लक्षणं आदी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.

सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागची कारणं, त्यामुळे होणारे मृत्यू, त्याची लक्षणं आदी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : कॅन्सर अर्थात कर्करोगाचं (Cancer) निदान झालं तर संबंधित रुग्णासह त्याच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतं. कॅन्सर हा जीवघेणा आजार समजला जातो. कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आढळून येतात. त्यापैकी बहुतांश प्रकार हे महिला आणि पुरुष अशा दोघांमध्ये दिसून येतात. मात्र काही प्रकार हे केवळ महिलांमध्ये (Women) दिसतात. सर्व्हायकल कॅन्सर (Cervical cancer) हा त्यापैकीच एक होय.

भारतीय महिलांमध्ये हा कॅन्सर होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. या कॅन्सरवर नुकतीच भारताने स्वदेशी लस (Vaccine) आणली आहे. लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. हा कॅन्सर होण्यामागची कारणं, त्यामुळे होणारे मृत्यू, त्याची लक्षणं आदी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. `दैनिक भास्कर`ने या विषयीची माहिती दिली आहे.

भारतीय महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) एक स्वदेशी लस तयार केली आहे. क्वाड्रिव्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सीन (Quadrivalent Human Papillomavirus Vaccine) असं या लसीचं नाव आहे. लवकरच ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. खरं तर हा कॅन्सर होण्यामागं काही कारणं असतात. त्याची लक्षणं काहीशी उशिरा दिसू लागतात. पण लक्षणं दिसताच तातडीनं निदान आणि उपचार गरजेचे आहेत.

Cervical Cancer Vaccine : महाभयंकर कॅन्सरवर पुण्याने दिला जबरदस्त फॉर्म्युला; सीरमने लाँच केली पहिली स्वदेशी लस

दिल्ली येथील डॉ.आयुष पांडे, धर्मशीला कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. अंशुमन कुमार आणि राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्युटच्या डॉ. वंदना यांनी सर्व्हायकल कॅन्सरच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

महिलांच्या गर्भशयाच्या खालच्या भागाला सर्विक्स (Cervix) असं म्हणतात. सर्व्हायकल कॅन्सर महिलांच्या सर्विक्स पेशींवर परिणाम करतो. याला गर्भशयाच्या मुखाचा कॅन्सर असंदेखील म्हणतात. सर्व्हायकल कॅन्सरचे तीन प्रमुख प्रकार आहेत. यात स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, एडेनोकार्सिनोमा, मिक्स्ड कार्सिनोमा यांचा समावेश होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी भारतात सर्व्हायकल कॅन्सरचे 1.23 लाख रुग्ण आढळून येतात. या कॅन्सरमुळे दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू होतो. भारतीय महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सामान्य कॅन्सर आहे. सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो.

जगभरात 2020 मध्ये 6 लाखांहून अधिक महिलांना या कॅन्सरचं निदान झालं. त्यापैकी 3.42 लाख महिलांचा या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. यापैकी 90 टक्के रुग्ण हे अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटाच्या देशांमधले होते, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून दिसतं.

सर्व्हायकल कॅन्सर होण्यामागे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे (HPV) वेगवेगळे स्ट्रेन्स कारणीभूत असतात. शारीरिक संबंध (Physical Relation) हे या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Diseases) आहे. शारीरिक संबंधामुळे हा विषाणू पुरुषांच्या माध्यमातून महिलांमध्ये पसरतो. एकापेक्षा अधिक पुरुषांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये हा कॅन्सर आढळतो. 35 ते 44 वर्षाच्या महिलांना याचा धोका जास्त असतो. 15 टक्क्यांपेक्षा जास्त नवीन प्रकरणं 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आहेत, विशेषतः ज्यांची नियमित तपासणी होत नाही.

हा कॅन्सर होण्यासाठी सर्वसाधारणपणे 10 ते 15 वर्षं लागतात. त्यामुळे ज्या महिलांचं वय 35 पेक्षा जास्त आहे, त्यांनी या आजाराच्या लक्षणांकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सर्व्हायकल कॅन्सरचं निदान होण्यासाठी पॅप स्मिअर टेस्ट (Pap Smear Test) किंवा एचपीव्ही टेस्ट करावी लागते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, 25 ते 65 वर्ष वयोगटादरम्यान असलेल्या महिलांनी या कॅन्सरची टेस्ट करावी. दर पाच किंवा तीन वर्षांनी टेस्ट करणं गरजेचं आहे. मासिक पाळी आलेली नसताना रक्तस्त्राव होणं, प्रायव्हेट पार्टमधून पांढरा स्त्राव येणं, अचानक वजन कमी होणं, प्रायव्हेट पार्टमधून घाण वास येणं ही या कॅन्सरची काही लक्षणं आहेत.

इम्युनिटी कमकुवत असणं, गंभीर आजार असणं, एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत लैंगिक संबंध असणं, पाच वर्षापेक्षा जास्त काळ सातत्यानं गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणं, धूम्रपान या गोष्टींमुळे महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका जास्त असतो.

सर्व्हायकल कॅन्सरचं वाढतं प्रमाण पाहता, भारताने यावर स्वदेशी लस विकसित केली आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनमध्ये इंडियन जर्नल ऑफ मेडिकल अँड पीडियाट्रिक ऑन्कोलॉजीचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानुसार, एचपीव्ही व्हॅक्सिनवर तीन वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यात ही लस 95.8 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं. महिलांचा सर्व्हायकल कॅन्सर आणि व्हल्वर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं.

``सध्या या लसीच्या किमतीबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून त्याची किंमत 200 ते 400 रुपयांदरम्यान असेल,`` अशी माहिती एसआयआयचे प्रमुख अदर पूनावाला यांनी दिली.

``सर्व्हायकल कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी महिलांनी प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. लक्षणं दिसताच तातडीने तपासणी करावी. एका विशिष्ट वयानंतर महिलांची मासिक पाळी बंद होते. याला मेनोपॉज म्हणतात. मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होणं ही सामान्य बाब नाही. काही महिलांना शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होतो. मात्र रक्तस्त्राव (Bleeding) जास्त प्रमाणात होत असेल, तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे,`` असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

First published:

Tags: Cancer, Vaccine, Who