‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “पीजी स्टोरी”चा हा दुसरा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील.
ही गोष्ट आहे 25 वर्षांच्या शब्द वर्माची. 2011 साली तो गोरखपूरवरून मेरठला शिक्षणासाठी आला होता. तिथं त्यांना मिळालेलं भाड्याचं घर ते कधीच विसरू शकणार नाहीत. पेशानं वकील असणाऱ्या या तरुणाला जे अनुभव आले, त्याचं हे ‘शब्द’चित्र.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळ असणाऱ्या सिद्धार्थनगरमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर कायद्याची पदवी घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 2011 साली मेरठला आलो आणि सीसीएस युनिव्हर्सिटीत 'लॉ'ला प्रवेश घेतला. विद्यापीठाच्या जवळच एक भाड्याची खोली घेतली. या परिसरात प्रचंड घाण होती. दिवसातला बराच वेळ लाईट गायब असायचे. महिन्याभरातच मी नवी खोली शोधली.
एकदम चकाचक घर मिळालं. घरात बेड, कपाट, लाईट, पंखा, किचन अशा सगळ्या सुविधा होत्या. इथं सतत लाईट असायचे. चुकून कधी लाईट गेलेच, तर इन्व्हर्टर होते. त्या इमारतीच्या खोल्या एखाद्या हॉटेलसारख्या होत्या. भाडं थोडं जास्तच होतं. महिना 5 हजार रुपये. आम्ही दोघं भाऊ होतो. आ्म्ही भाडं वाटून घेतलं. घरमालकाची एकच अट होती. आम्ही रुमवर नसताना जर कुणी आलं, तर तो ती खोली वापरेल. त्या खोलीची एक चावी त्याच्यापाशी असेल. आम्ही ही अट मान्य केली.
बिल्डिंगमध्ये चांगलीच वर्दळ होती. तिथले लोक अगदी खुल्लमखुल्ला दारु पित असत, बिड्या-सिगरेटी फुंकत असत. माझ्यासोबत माझा चुलत भाऊ होता. आम्ही बारावी करून पुढच्या शिक्षणासाठी मेरठला आलो होतो. आम्हाला वाटलं की भाड्याची घरं अशीच असतात. आम्ही फारशी चौकशी न करता तिथं राहायला सुरुवात केली. आम्हाला रुम आवडली होती.
साधारणत चाळीशीतला घरमालक होता. त्याचा 23-24 वर्षांचा एक भाऊ होता. या दोघांशिवाय त्यांच्या कुटुंबात कुणीही नव्हतं. स्वयंपाकाला, धुणीभांडी करायला बाई येत असे. मी आठवड्यातले दोन दिवस शनिवार आणि रविवार रुमवरच पडून असे. दोन्ही दिवस कॉलेज बंद असायचं. माझ्या भावाचा रविवारची वेगळाच काहीतरी प्लॅन असायचा.
ती अजब दुपार
रविवारी दुपारची वेळ होती. मी रुमवर पहुडलो होतो. तेवढ्यात घरमालक आला आणि त्यानं मला काही वेळासाठी रूममधून बाहेर जाण्यास सांगितलं. आता घरमालकानंच सांगितल्यामुळे काहीच विरोध करू शकलो नाही. त्याच्यासोबत 19-20 वर्षांची एक मुलगी होती. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली तरी ते बाहेर आले नाहीत. त्यानंतर मी दरवाजावर थाप मारली आणि विचारले की किती वेळ लागणार आहे अजून? त्यानंतर आतून उत्तर आलं की थोड्याच वेळात बाहेर येत आहे.
हळूहळू हे प्रकार वाढत गेले. ‘थोड्या वेळासाठी रुम हवी आहे’, ही परिस्थिती सुट्टीच्या दिवशी दोन-तीन वेळा उद्भवू लागली. हे नेहमीचं झालं होतं. घरमालकानं कित्येक वेळा मला रुम रिकामी करायला सांगितली. त्यानंतर एक दिवस त्याचा 23-24 वर्षांचा भाऊ आला. त्याच्यासोबत स्वयंपाक करणाऱ्या एक आंटीही आल्या. त्यांचं वय चाळीशीपेक्षाही जास्त होतं.
मग त्यानंही मला रुम रिकामी करायला सांगितलं. याला कशाला रुम हवी असेल, याचा विचार करण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्याचं काहीच उत्तर मला मिळत नव्हतं. त्याच्यासोबत स्वयंपाक करणारी बाई होती. गेल्या आठवड्यात घरमालकाने ज्या तरुणीला आणलं होतं, ती किमान त्याची गर्लफ्रेंड तरी वाटत होती. पण हिच्यासोबत कुणीच नव्हतं.
मी - काय झालं?
तो - भाई, तू फक्त रुम खाली कर
मी - कुठे जाऊ?
तो - तू जा.
मी - पण कुठे?
तो - बाजारात फिरून ये. दुधाचं एक पाकिटही घेऊन ये येता येता.

मी रुमच्या बाहेर आलो. खोलीच्या पायऱ्यांवर बसून राहिलो. बराच वेळ त्यांनी क्वालिटी टाईम एकत्र घालवला आणि फायनली मला माझ्या रुममध्ये प्रवेश मिळाला. योगायोगानं हे सगळे कांंड माझ्या डोळ्यांदेखतच झाले. माझ्या भावाचे आठवड्यातून सहाही दिवस क्लासेस असत. रविवारी त्याचा काही ना काही प्लॅन ठरत असते. तो सकाळी लवकर बाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. खोलीत सर्वाधिक वेळ मीच घालवत असे.
मी भावाला म्हणालो की काही झालं तरी रुम बदलायची आहे. त्यानं मला याचं कारण विचारलं. मी त्याला परिस्थिती सांगितलं, पण जे घडलं ते स्पष्टपणे सांगू शकलो नाही. कॉलेजचं वर्ष संपत आलं होतं. माझा भाऊ दोन दिवसांसाठी दिल्लीला गेला होता. माझे पेपर सुरू झाले होते.
मध्यरात्रीचे दोन वाजले होते. मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होतो. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडून मी पाहिलं. आता नक्कीच मला कुणीतरी रुम रिकामी करायला सांगणार आणि खाली जायला सांगणार, हे मी आधीच ओळखलं होतं. दरवाजा उघडल्यावर समोरची व्यक्ती म्हणाली, खाली मुलगी आहे. येतोय का? त्या रात्री मला खोलीतून बाहेर पडण्याची नव्हे, तर खोलीत जाण्याची ऑफर मिळाली होती. मी मानेनंच नकार दिला, दरवाजा बंद केला आणि ढसाढसा रडलो.
भाऊ परत आल्या आल्या त्याला सांगितलं की काहीही झालं तरी आपण इथं राहायचं नाही. आपण जिथं राहतो, ते भाड्याचं घर नाही, कोठा आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.