मुंबई,20 नोव्हेंबर : सध्याचा प्रोसेस्ड फूड खाण्याचा कल कायम राहिला तर, 2050 पर्यंत जगभरातील ४ अब्जांपेक्षा अधिक लोक स्थूल असतील, त्यापैकी 1.5 अब्ज लोक अतिस्थूल असतील, असं बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या एका अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. आरोग्य आणि पर्यावरण समस्येबाबत इशारा देताना पॉटसडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च संस्थेचे तज्ज्ञ म्हणाले, ‘शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक अन्नधान्याची मागणी ५० टक्क्यांनी वाढेल, त्याचा परिणाम पृथ्वीच्या नैसर्गिक क्षमतेवर पडणार आहे. पीक उत्पादन वाढल्यामुळे जगातील ताज्या पाण्याचा तीन तृतीयांश साठा आणि एक तृतीयांश भूभाग व्यापला गेला असून, ग्रीनहाउस वायूचे उत्सर्जन तिप्पट वाढलं आहे. 1965 ते 2100 या प्रदीर्घ कालावधीतील जगभरातील बदलत गेलेल्या खाद्यसेवनाच्या पद्धतींचा आढावा घेउन संशोधकांनी एक मॉडेल तयार केले आहे, ज्यामुळे खाद्य पदार्थांची मागणी कशाप्रकारे लोकसंख्या वाढ, वयोवर्धन, वजन वाढणं, शारीरिक हालचालींचा कंटाळा आणि अन्नपदार्थ वाया घालवण्याची सवय यावर परिणाम करेल, याचा वेध घेता येणार आहे. सध्याचा कल कायम राहिला तर 2050 पर्यंत जगभरातील चार अब्ज म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 45 टक्के लोक अतीवजनदार होतील. या मॉडेलच्या आधारे काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, सध्या जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 29 टक्के लोक अतीजाड आहेत, तर त्यापैकी 9 टक्के लोक अतिस्थूल आहेत. 2050 पर्यंत अतिस्थूल लोकांचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत वाढेल. अन्न वाया घालवण्याचं प्रमाणही वाढत असून, प्राणीजन्य प्रोटिन्स सेवनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेतलं तर कृषी व्यवस्थेवरील आपलं नियंत्रण आपण हरवून बसू, असा इशारा नेचर सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या मॉडेलचे प्रमुख लेखक बेंजामिन बोडीरस्काय यांनी दिला आहे. ग्रीनहाउस गॅस, नायट्रोजनचे प्रदूषण, जंगल नष्ट होणे, हे सर्व बघता आपण आपल्या पृथ्वीला त्याच्या अंतिम मर्यादेपर्यंत ताणत आहोत, मर्यादेचा अंत बघत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. जगभरातील खाद्य सेवनाचे कल वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे आहेत. वनस्पतीजन्य आणि पिष्टमय पदार्थावर आधारित आहारांपेक्षा साखर, फॅट, प्राणीजन्य आहार आणि प्रोसेस्ड फूड यांचा समावेश आहारात मोठ्या प्रमाणात होत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी या अभ्यासात असंही आढळलं आहे की, अन्न पदार्थ वाया घालवण्याचे प्रमाणही वाढले आहे. एकतर अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी अपुरी व्यवस्था किंवा अती खरेदी यामुळे अन्नधान्य वाया जात आहे. त्यामुळे या शतकाच्या मध्यापर्यंत जगभरातील अर्धा अब्ज लोक कुपोषित असल्याचे चित्र दिसून येईल. जगात पुरेशी अन्नधान्य निर्मिती होते, पण अनेक गरीब लोकांची ते विकत घेण्याची क्षमता नाही, असं या अहवालाचे सह लेखक प्राजल प्रधान यांनी म्हटलं आहे. श्रीमंत देशातील लोक अन्न वाया घालवताना त्याचा आर्थिक आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची दाखल घेत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदल विषयावरील अंतर्गत समितीने गेल्या वर्षी सादर केलेल्या एका विशेष अहवालात हे नमूद केलं होतं की, वेळीच वायू उत्सर्जन, अशाश्वत शेती आणि जंगलतोड कमी केली नाही तर, येत्या दशकभरात अन्न सुरक्षा आणि तापमानातील वाढ याचा गंभीर फटका मानवजातीला बसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







