मुंबई, 28 मे : आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस (World Menstrual Hygiene Day 2022). आजच्या दिवशी ठाकरे सरकारने राज्यातील महिलांना सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यात फक्त एक रुपयात 10 सॅनिटरी पॅड मिळणार आहेत (10 sanitary pads for only 1 Rupee). राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी ही घोषणा केली आहे (Ministry of Rural Development Maharashtra). मासिक पाळीत स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्व पटवण्यासाठी, जनजागृतीसाठी म्हणून आजचा दिवस मानला जातो. मासिक पाळीची स्वच्छता म्हणजे सॅनिटरी पॅड. पण सर्वांनाच ते परवडत नाही. त्यामुळे कितीतरी महिला आजही कापडाचा वापर करतात. अशा महिलांसाठी सरकारने पुढाकार घेत त्यांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले आहेत.
या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील महिला आणि महिला बचत गटाच्या महिलांना होणार आहे. येत्या 15ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे.
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसाचा इतिहास सर्वप्रथम, 2014 मध्ये वॉश युनायटेड ऑफ जर्मनी या एनजीओने मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. वास्तविक, हा दिवस निवडण्यामागेही एक कारण आहे. साधारणपणे, बहुतेक महिलांची मासिक पाळी चक्र 28 दिवसांचे असते. त्यामुळेच हा दिवस साजरा करण्यासाठी 28 तारीख निवडण्यात आली. हे वाचा - स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना डास चावण्याचं प्रमाण जास्त का? यामागे आहे मजेशीर वैज्ञानिक कारण
वास्तविक, आजही जगभरात असे अनेक समाज आहेत, जिथे महिला याविषयावर उघडपणे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात किंवा कोणत्या प्रकारची समस्या कशामुळे उद्भवते, स्वच्छतेच्या मदतीने कोणते आजार टाळता येतात, इत्यादींची माहिती कधीच मिळत नाही. अशा स्थितीत मासिक पाळी हा गुन्हा नसून ती एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, असे लोकांना सांगता येईल, असे वातावरण या दिवशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.