नवी दिल्ली, 29 एप्रिल : ‘एकंदरीत विचार करता अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोविड-19 ची परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. डेल्टा व्हॅरिएंटमुळे (Delta Variant) आलेली दुसरी लाट वगळता आपल्याकडच्या कोरोना संसर्गाच्या लाटा (Controlled Covid Waves) नियंत्रित होत्या. भारतात वापरण्यात आलेल्या लशीही (Indian Anti Covid Vaccines) त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली असली, तरी घाबरण्याचं कारण नाही,’ असं मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR या संस्थेतल्या व्हायरॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता यांनी ‘न्यूज 18 डॉट कॉम’कडे व्यक्त केलं. हाँग काँग, कॅनडा आदी अनेक देशांनी कोरोनाच्या पाचव्या-सहाव्या लाटा अनुभवल्या आहेत किंवा सध्या अनुभवत आहेत; मात्र भारतातली दुसरी लाट वगळता अन्य लाटा नियंत्रित स्वरूपात आहेत. भारताची कामगिरी चांगली आहे, असं डॉ. गुप्ता म्हणाल्या. ज्या देशांनी झीरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) अवलंबली, त्यांनी कडक निर्बंध आणि लॉकडाउन (Lockdown) वारंवार लागू केले. त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लगेचच तिथे रुग्णसंख्येत वाढ दिसू लागली, असं त्या म्हणाल्या. भारतात वापरण्यात आलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशी, खासकरून कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींचा वापर हे भारताची कोरोना नियंत्रणाची कामगिरी अन्य देशांच्या तुलनेत चांगली असण्याचं एक कारण असू शकेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ‘पाश्चिमात्य देशांमध्ये वापरण्यात आलेल्या लशींच्या तुलनेत भारतात वापरण्यात आलेल्या लशी अधिक संरक्षक ठरल्या, हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक तो डेटा आपल्याकडे नाही; मात्र ही शक्यता फेटाळून लावता येण्यासारखा डेटाही आपल्याकडे नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सूर्यग्रहणात गर्भवती महिलांनी मोबाईल वापरावा का? तुमच्या मनातील प्रश्नांना डॉक्टरांचं उत्तर ‘नैसर्गिक संसर्ग होणं, हाय सिरो पॉझिटिव्हिटी रेट (High Sero Positivity Rate), योग्य प्रतिबंधक लशींचा वापर आणि वेळेवर बूस्टर डोस या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे भारताला कोरोनाच्या लाटा नियंत्रणात ठेवण्यास आणि ही परिस्थिती अन्य काही विकसित देशांच्या तुलनेत चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत झाली असावी,’ असंही डॉ. गुप्ता म्हणाल्या. सध्या कोरोनाचा कोणताही नवा व्हॅरिएंट दृष्टिपथात आलेला नाही. केवळ ओमिक्रॉनचे उपप्रकारच दिसत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या नव्याने वाढताना दिसली, तरी पॅनिक होण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात, ‘मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन, स्वच्छतेची काळजी आदी बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं,’ असंही त्यांनी सांगितलं. लशीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेतला जाण्याचं प्रमाण तुलनेने कमी असून, हे चांगलं लक्षण नाही, असा इशारा त्यांनी दिला. ‘ज्येष्ठ व्यक्ती, तसंच सहव्याधी (Co-Morbidites) असलेल्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन बूस्टर डोस घेतला पाहिजे. सरकारने 18 वर्षांवरच्या सर्वांना बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली आहे. लहान मुलांच्या ज्या वयोगटातलं लसीकरण सुरू झालं आहे, त्या मुलांच्या लसीकरणासाठी पालकांनीही आग्रही असलं पाहिजे,’ असं डॉ. गुप्ता म्हणाल्या. डॉ. गुप्ता यांच्या मते, आता पुन्हा शाळा बंद केल्या जाऊ नयेत. अगदीच लॉकडाउनची वेळ आलीच, तर शाळा बंद करण्याचा पर्याय सर्वांत शेवटचा असावा. आतापर्यंत मुलांमध्ये कोविड-19 मुळे कोणतंही गंभीर आजारपण झाल्याची नोंद झालेली नाही. शिवाय, शाळा बंद असल्यामुळे गेली दोन वर्षं मुलांच्या मानसिक आरोग्याचं खूप मोठं नुकसान झालं. त्यांच्या मानसिक आरोग्यावरचा परिणाम हा त्यांच्यावरच्या कोविडच्या परिणामापेक्षा खूप धोकादायक आहे, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. ‘लहान मुलं कोरोना संसर्गाची वाहक झाली आणि त्यांच्यामुळे त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना संसर्ग झाला तर काय, अशीही एक काळजी व्यक्त केली जात आहे; मात्र प्रौढ लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं असल्यामुळे फारसा धोका नाही,’ असंही डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







