मुंबई 21 एप्रिल : आपल्यापैकी काहींना चटकन समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची सवय असते किंबहुना काहींचा तसा स्वभावच असतो. अशा स्वभावाच्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीजवळ मागचा पुढचा विचार न करता सर्व गोष्टी शेअर करतात. पण, समोरची प्रत्येक व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची असेलच असं नाही. काही व्यक्ती आपण विश्वासानं सांगितलेली माहिती इतरांना सांगतात किंवा तिचा गैरवापर करतात. परिणामी, या गोष्टींचा आपल्यालाच मनस्ताप होतो. समोरची व्यक्ती विश्वासपात्र आहे की नाही, हे शोधणं फार सोपं आहे. एखाद्या व्यक्तीच्या अंगी काही ठराविक गुण असल्यास ती व्यक्ती विश्वासपात्र नाही, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अप्रामाणिकपणा: एखादी व्यक्ती अप्रामाणिक असेल तर तिच्यावर विश्वास ठेवू नये. कारण, अशी व्यक्ती चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवल्यास आपलं नुकसान होऊ शकतं. विसंगती: काही व्यक्तींच्या बोलण्यात आणि वागण्यात अजिबात एकवाक्यता नसते. या व्यक्ती बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. स्वार्थीपणा: काही व्यक्ती फार स्वार्थी असतात. इतरांच्या भल्यापेक्षा त्या स्वत:ला जास्त प्राधान्य देतात. अशा वृत्तीच्या व्यक्तींवर कधीही विसंबून राहू नये. सहानुभूतीचा अभाव: काही व्यक्ती फार निष्ठुर असतात. समोरची व्यक्ती कुठल्या संकटात आहे, ती कोणत्या परिस्थितीमधून जात आहे, या गोष्टींचं निष्ठुर व्यक्तींना काहीही घेणं-देणं नसतं. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अविश्वसनीयता: वचन पाळण्याला खूप महत्त्व असतं. एखाद्या व्यक्तीनी वचन देऊन ते पाळलं नाही आणि त्याचा तिला तसूभरही पश्चात्ताप होत नसेल तर अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. अनादर करण्याची वृत्ती: काही व्यक्ती समोरच्या व्यक्तींचा आदर करत नाहीत. त्या स्वत:लाच श्रेष्ठ समजतात. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. सिक्रेटिव्ह बिहेवियर: काही व्यक्ती आपल्या वर्तणुकीबद्दल फार सिक्रेटिव्ह असतात. अशांना आपण बोली भाषेमध्ये आतल्या गाठीच्या व्यक्ती म्हणतो. आपल्या मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ता या व्यक्ती समोरच्यांना लागू देत नाहीत. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवणं, धोक्याचं ठरू शकतं. गॉसिपिंग: काही व्यक्तींच्या पोटामध्ये कोणतीही बाब टिकत नाही. म्हणजेच त्यांना एखादी गोष्ट माहिती झाली की, त्या सर्वत्र सांगत फिरतात. अशा व्यक्तीला जर तुम्ही तुमचं एखादं सिक्रेट सांगितलं तर ती व्यक्ती ते स्वत:पुरतं मर्यादित ठेवेल, याची शाश्वती फारच कमी असते. त्यामुळे ज्या व्यक्तीला गॉसिपिंग फार आवडतं, अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. मॅनिप्युलेटिव्ह बिहेवियर: काही व्यक्तींना समोरच्या व्यक्तीला आपल्या ताब्यात ठेवण्याची सवय असते. त्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीचं वाईट हेतूनं मतपरिवर्तन करण्याचाही प्रयत्न करतात. असा स्वभाव असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.