मुंबई, 16 सप्टेंबर: परदेशप्रवास करावा अशी जवळजवळ प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. त्यामुळे जरी प्रत्यक्ष जायला जमलं नाही तरीही तो मनात परदेशवारीची स्वप्नं नक्की पाहत असतो. कोविडचा काळ ओसरला आहे, जगातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि जगातील सर्व ठिकाणं आता खुली झाली आहेत त्यामुळे प्रवासाला जाणं सहज शक्य होणार आहे. तुम्ही जर परदेशप्रवासाला जाणार असाल तर भारताजवळ नेपाळ, भूटान किंवा श्रीलंकेला जाऊ शकता. यापैकी श्रीलंकेचा पर्याय सगळ्यात छान आहे. क्रिकेटमुळे आपल्याला श्रीलंकेतील स्टेडियमची नावं किंवा बिचची नावं माहीत असतात पण प्रत्यक्ष श्रीलंका देश पर्यटनासाठी खूपच सुंदर आहे. इथं धार्मिक स्थळं आहेत. धाडसी व्यक्तींसाठी घनदाट जंगलं, उंच पर्वतही इथं आहेत. समुद्रकिनारे, जंगलं, धबधबे अशा निसर्गसौंदर्याने नटलेला श्रीलंका हा आशियातील एक बेटावर वसलेला देश आहे. तुम्ही जर श्रीलंकेला गेलात तर ही पाच ठिकाणं पहायला विसरू नका. नाइन आर्च ब्रिज श्रीलंकेतील नाइन आर्च ब्रिज खूपच आकर्षक आहे. एला या इथल्या छोट्या शहरात हा ब्रिज असतो. वाळू आणि सिमेंटपासून हा नऊ कमानींचा पुल तयार करण्यात आला आहे. या परिसरातील निसर्गसौंदर्य मंत्रमुग्ध करणारं आहे. मिनटेल मिनटेल ही श्रीलंकेतली एक पर्वतरांग आहे. इथं बौद्ध भिक्खु महिंदा यांना भेटले होते. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर तुम्हाला हे ठिकाण खूपच आवडेल. हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं असलं तरीही तिथलं निसर्गसौंदर्यपण विलक्षण आहे. उनावातुना श्रीलंकेतल्या सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे उनावातुना. हा एक छोटा समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे. या किनाऱ्यावरची पांढरी वाळू ही जगभरात प्रसिद्ध आहे. तुम्हाला शांत रहायला आवडत असेल तर तुम्ही या बिचला भेट द्यायलाच हवी. गल विहार गल विहार हे इथलं एक अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे. श्रीलंकेत बहुसंख्य नागरिक बौद्ध धर्माचं पालन करतात. गल विहारातील गुहांमध्ये भगवान गौतम बुद्धांची अनेक शिल्प तुम्हाला पहायला मिळतील. या गुहा पहायला जगभरातून बौद्धधर्मीय येत असतात. रावण वॉटरफॉल तुम्ही जर उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीलंकेला गेलात तर रावण वॉटरफॉल म्हणजेच रावण धबधब्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटायला विसरू नका. हा धबधबा आणि या ठिकाणाशी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कहाण्या जोडलेल्या आहेत. तिथं गेल्यावर गाईड तुम्हाला या सुरस कहाण्या सांगतात. भारत आणि श्रीलंकेच्या संस्कृतीत बरंच साम्य असल्यामुळे आहार-विहारापासून हा देश पहायला खूप मजा येते. तुम्ही श्रीलंकेत गेलात तर ही पाच ठिकाणं आवर्जून बघाच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.