आजकाल सामान्य संभाषणापासून ते सोशल मीडियापर्यंत, बोलत असताना अनेकदा कपल गोल्सचा उल्लेख केला जातो. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कपल गोल्स सेट केले आहेत. त्यानुसार ते आपल्या आयुष्याचा आणि नातेसंबंधाचा प्रवास पुढे नेतात. गोल्स म्हणजे ध्येय आणि कपल गोल्स म्हणजे नातेसंबंधाच्या बळकटीसाठी डिझाइन केलेली काही उद्दिष्टे. ज्यावर प्रत्येकजण जगण्याचा आणि एक उदाहरण बनण्याचा प्रयत्न करतो. सोप्या शब्दाच सांगायचं झालं तर दोघांनी मिळवून ध्येय ठरवायचं आणि ते सत्यात उतरवण्याठी प्रयत्न करायचे. मात्र, आज आपण अशा एका कपलला भेटणार आहोत, ज्यांच्या ‘गोल्स’मुळे ते कपल झाले आहेत. होय तुम्ही बरोबर वाचलतं. ही गोष्ट आहे, रसिका आणि प्रसादची. रसिकाला लहानपणापासून बाईक रायडींगची भारी आवड. तिच्या या वेडाला कुटुंबियांनीही नेहमी साथ दिली. आधी शिक्षण आणि नंतर नोकरी सांभाळत तिने आतापर्यंत अनेक राईड पूर्ण केल्या आहेत. याच प्रवासात तिला आयुष्यभर साथ देणारा तिचा जोडीदारही भेटला. याबद्दल रसिका सांगते, की मी माझ्या मोटरसायकलवरून इंडिया फॉरेस्ट फेस्टिव्हलला गेले होते. बाइकर म्हणून एखाद्या कार्यक्रमात जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मला नवीन लोकांना भेटायला, बोलायला खूप आवडतं. यामुळे माझ्या या कार्यक्रमात खूप मित्र तयार झाले. त्यातला एक प्रसाद बोरकर. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही आयुष्याचा जोडीदार शोधत नसता तेव्हा तुम्हाला असा जोडीदार मिळतो जो फक्त तुमच्यासाठी बनला आहे. आमची मैत्री वाढली, एकत्र बाईकवर राईड करू लागलो. या प्रवासात आम्हाला जाणवले की आमच्यात अनेक गोष्टींत साम्य आहे. अगदी खाण्यापासून मोटरसायकलच्या प्रेमापर्यंत. आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचं प्रेम पाहून घरच्यांनीही लगेच होकार दिला. आणि 3 जानेवारी 2021 पासून बाईकवरुन सुरू झालेला आमचा प्रवास आता अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्यासाठी सुरू झाला.
दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास.. लग्नानंतर अनेकांना वाटलं की आता हे दोघे एकाच बाईकवर राईड करतील. प्रत्यक्षात आम्ही असं कधीच केलं नाही. नेहमी दोन वेगवेगळ्या बाईकवरुनच प्रवास करतो. प्रत्येक बाईकरचं स्वप्न असतं की एकदातरी K2K राईड म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर राईड करावी. आमचंही तेच स्वप्न होतं. शेवटी योग जुळून आला. पण, निघाताना आम्ही एक चूक केली.
माझं एक स्वप्न होतं, जे मी बाईक रायडींग सुरू केल्यापासून पाहिलं होतं. भारताचा ट्रेड कॉरिडॉर, कन्याकुमारी ते काश्मीर आपल्या बाईकने प्रवास करुन पार करायचा. खरंतर हे बोलण्याइतकं सोपं नाही. चांगले अनुभवी रायडर देखील ही राईड करायच्या आधी दहावेळा विचार करतात. मनात विचार केला, म्हातारपणी आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण्यासाठी काहीतरी करायलाच हवं. आणि पोरांनाही काही गोष्टी सांगायला नको का? त्यावेळी माझ्यात काय संचारलं मला माहिती नाही. पण, म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, आपण हे ध्येय गाठायचंच.
आमची नेहमीप्रमाणे काही दिवसआधी तयारी.. कन्याकुमारी ते काश्मीर अशा लांब राईडसाठी लोक किमान दोनतीन महिने आधीच तयारी सुरू करतात. आम्ही मात्र 15 दिवस आधी मोहीम आखली. प्रसाद आणि मी दोघेही जॉबवरुन आल्यानंतर तयारी करायचो. गाडीचे टायर बदलण्यापासून स्पेअर पार्ट्स तयार करणे ते गाडी सर्व्हींसिंगला देणे सर्व गोष्टी आम्हीच करत होतो. रोज थोड्या थोड्या गोष्टी बाजूला काढून ठेवत होतो. मग निघण्याच्या दोन दिवस आधी पिशवी भरली. मला पूर्वीपासून लाईटवेट घेऊन प्रवास करायची सवय आहे. त्यामुळे माझी एक मोठी बॅगही अर्धीच भरली होती. 3 दिवसआधी दोघांच्या बाइक्स त्रिवेंद्रमला पाठवल्या होत्या. तर आम्ही रेल्वेने प्रवास सुरू केला. मुंबई ते त्रिवेंद्रमला आम्ही दोन दिवसात पोहचलो. बाईक्स ताब्यात घेतल्या अन् कन्याकुमारीच्या दिशेने कूच केली. 100 किलोमीटरचं अंतर आहे, आम्ही ते तीन तासात पूर्ण करुन कन्याकुमारीला पोहचलो. कन्याकुमारी फिरलो, स्वामी विवेकानंद स्मारक बघितलं. सायंकाळच्या सुमारास आम्ही देशाच्या शेवटच्या टोकाला होतो. उद्यापासून आम्हाला येथून काश्मीरच्या दिशेने प्रवास सुरू करायचा होता.
सूर्योदयाच्या साक्षीने प्रवासाला सुरुवात कन्याकुमारीचा सूर्योदय अनुभवण्यासाठी आम्ही पहाटे साडेपाचला हॉटेलमधून चेक आऊट केलं. निळ्याशार आणि अथांग समुद्रातून सुर्यनारायण पाण्यातून वर येताना पाहणे हा विलक्षण अनुभव होता. ते क्षण संपूच नये असं वाटतं होतं. प्रसादच्या खांद्यावर डोक टेकवून ते क्षण डोळ्यात सामावून घेण्याची आठवण मी कधीच विसरू शकणार नव्हते. पण, वेळ कोणासाठी थांबत नसते. इच्छा नसतानाही आम्हाला निरोप घ्यावा लागाला. आपापल्या गाडीवर बसण्याआधी मी प्रसादला एक घट्ट मिठी मारली. ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् स्टार्टर मारला. पहिल्याच दिवशी आम्ही 530 किमीचा मोठा टप्पा गाठला. दिवसाचे 12 तास गाडी चालवायची आणि 12 तास आराम करायचं असं आमचं नियोजन होतं. दुसरा दिवस उगवला तेव्हा सूर्योदयासोबत आम्हीही हैद्राबादकडे निघालो.
अन् मोठं विघ्न उभं राहिलं हैदराबाद 600 किलोमीटर अंतरावर होतं. अर्धा टप्पा पार केल्यानंतर लक्षात आलं की प्रसादच्या गाडीमधून तेल गळती होत आहे. आम्हाला वाटले कुठेतरी गाडी आपटली असणार किंवा दगड लागला असावा. जवळच्या पेट्रोल पंपावर ऑइल टॉपअप केले आणि तसेच 50 किलोमीटर लांब रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला जायला निघालो. अजून आमचा अर्धा प्रवास देखील पूर्ण झाला नव्हता. तोच कार्यात विध्न आलं होतं. दोघांनाही जाम टेंशन आलं. आता पुढे काय होणार अशा विचार सुरु असतानाच आम्ही अनंतपुरला पोहचलो. तिकडे समजले की चेन स्प्रॉकेटचा भाग उपलब्ध नाही. जवळपास 200 किलोमीटरनंतर आम्ही कुर्नूलमध्ये एका रॉयल एनफिल्डच्या सर्व्हीस सेंटरमध्ये गेलो. आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केले. सेंटर वेळेच्या पलीकडे चालू ठेऊन आमची गाडी दुरुस्त करुन दिली. प्रवासाला निघण्याच्या आधी गाडी सर्व्हीसिंगला दिल्याने हा सर्व घोळ झाला. आम्ही हैदराबादमध्ये पाहिजे होतो. मात्र, मधेच अडचण आल्याने प्लान चुकला. हैदराबादपासून दूर 100 किमी अंतरावर आम्ही होतो.
प्रवासाचा तिसर दिवस.. पुन्हा त्याच जिद्दीने प्रवास सुरू केला. हैदराबादमध्ये मुक्काम करुन चारमिनार आणि जवळचा परिसर एक्स्प्लोअर करू या हिशोबाने आम्ही 2 तास गाडी चालवून हैदराबादमध्ये पोहचलो. ठरवल्याप्रमाणे मनासारखं फिरलो. प्लॅननुसार आम्ही एक दिवस मागे होतो. पण, काश्मीरची ओढ मात्र तुसूभरही कमी झाली नव्हती.
मायभूमीत प्रवेश.. चौथा दिवस फार खास होता. आम्ही आज महराष्ट्रात पोहचणार होतो. मायभूमीत येणाचा आनंद काही वेगळाच असतो. नागपूरमध्ये आमच्या मित्रांसोबत राहणार होतो. ते सर्वजण आमची आतुरतेने वाट पाहत होते. नागपूरचे तर्री पोहे, साऊजी चिकनवर ताव हाणण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक होतो. नागपूरला म्हणजे भारताचा मध्यभाग. येथील झिरो पाईंट प्रसिद्ध आहे. इथं पोहचल्यानंतर आम्हाला एक वेगळाच अनुभव आला. आपण उभे आहोत, त्याच्या चोहीकडे विविधतेने नटलेला भारत पसरला होता. कन्याकुमारी ते काश्मीरचा अर्धा प्रवास पूर्ण झाला होता.
तो रस्ता संपूच नये असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा तर्री पोह्याचा आस्वाद घेऊन आम्ही मध्य प्रदेशच्या दिशेने निघालो. आमच्या प्रवासाचा हा पाचवा दिवस होता. पेंच राष्ट्रीय उद्यानमधून आमचा प्रवास सुरू होता. निसर्गाची मुक्त उधळण कोणालही आकर्षित करेल अशीच होती. आतापर्यंत मी निसर्गाचं असं रूप पाहिलं नव्हतं. नॅशनल पार्कमधून जाणारा रस्ता एक ब्रिज हायवे होता. त्या ब्रीजवरुन खाली विविध वन्यजीव दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा केशरी, लाल आणि हिरव्या रगाच्या वेगवेगळ्या शेड्स. त्यात पावसाच्या हलक्या सरी.. खरंतर त्या अनुभवाचं शब्दात वर्णन करणे कठीण आहे. शहराच्या गोंगाटातून दूर, निसर्गाच्या सानिध्यात, जिथं नीरव शांतात आहे. आवाज आहे, तो फक्त निसर्गाचा. कानाला मंजुळ भासणारा आणि मनाला हवाहवासा वाटणारा. आम्ही जवळपास 400 किमी गाडी चालवून सागरला पोहचलो. आजचा मुक्काम इथेच होता.
सहावा दिवस खूप स्पेशल होता सहावा दिवस खूप स्पेशल होता. आम्ही जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला भेट देणार होतो. कधीतरी जोडीने इथे भेट द्यायची असं आम्ही ठरवलं होतं. आज तो दिवस सत्यात उतरणार होता. ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक आहे, मी आणि प्रसाद पहिल्यांदाच एकत्र भेट देत होतो. तो एक परिपूर्ण जोडीदार आहे. आम्ही जे काही करतो ते 50-50 आहे. आम्हा दोघांना मोटरसायकलची आवड आहे. आमच्यात बर्याच गोष्टी साम्य आहेत. प्रसादशी लग्न करण्याचा माझा निर्णय योग्य होता हाच अनुभव मला त्याच्यासोबत असताना पदोपदी होत असतो.आजचा दिवस ताजमहालला भेट देऊन प्रेम आणि यश साजरे करण्याचा होता.
सागरहून आग्र्याला पोहोचलो. पहाटे सूर्योदयाच्या वेळी ताजला जायचं ठरवलं होतं. ठरल्यप्रमाणे सकाळी 6.40 वाजता ताजमहालात होतो. लार्जर दॅन लाइफ आर्किटेक्चर. काही गोष्टी अशा असतात की कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. ताजमहाल त्यापैकीच एक आहे. प्रसादचा हात पकडून राईडबद्दल विचार करत होते. आम्ही आतापर्यंत 2450 किलोमीटरचा प्रवास केला आहे, जो राईडचा वन थर्ड होता. दुपारी आवरुन दिल्लीकडे निघालो. अब दिल्ली दूर नही.. यमुना एक्सप्रेस वे म्हणजे भारताचा अभिमान. सरळ आणि दर्जेदार रस्ते. औषधालाही खड्डा सापडणार नाही, इतका तो स्वच्छ महामार्ग आहे. दिल्ली हे शहर नाही तर एक भावना आहे. आम्ही इंडिया गेटला भेट देण्याचा विचार केला. भारताच्या गेटवर तिरंगी रंगाची उधळण पाहणे मंत्रमुग्ध करणारे दृश्य होते. तिथल्या बागेत नजारा पाहण्यासाठी बसलो. आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान आणि प्रेमाची भावना आपोआप मनात येईल, असच वातावरण होते. दिवस संपला आणि दुसर्या दिवसाची वाट पाहण्याची वेळ आली, जी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधून होणार होती. आम्ही पठाणकोटला पोहोचणार होतो.
भारत अनेक रंगांचा आणि संस्कृतींचा.. उत्तर भारताजवळ येताच निसर्गाचे रंग बदलताना तुम्हाला पाहायला मिळतील. गवत आणि शेत पिवळसर दिसतात. भारत अनेक रंगांचा आणि संस्कृतींचा आहे. प्रत्येक दिवस नवीन शहर आणि नवीन राज्यासह नवीन दिवस होता. आम्ही रोज नवीन पदार्थ आणि चव अनुभवत होतो. पठाणकोटवरुन 400 किलोमीटरवर दूर असलेले श्रीनगर हे आमचं पुढचं डेस्टीनेशन होतं. आता ध्येय टप्प्यात आलं होतं. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव माझ्या मनात येत होता. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जिद्दीने प्रयत्न करावे आणि ती पूर्ण होत असताना पाहण्याचं जे फिलिंग असतं ते मला जाणवत होतं. अक्षरशः मला रडू कोसळलं. आज सोनियाचा दिनू.. संपूर्ण 3600 किलोमीटरपैकी आम्ही 3200 पूर्ण केला होता. आता शेवटचे 400 किमी कव्हर करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. पठाणकोटपासून जम्मू बॉर्डर अवघ्या अर्ध्या तासावर होती. आम्ही तिथे पोहोचताच, थांबलो आणि आमचा एक फोटो क्लिक केला. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये होतो.
शेवटच्या टप्प्यातील प्रवास कठीण भारतातील सर्वात लांब महामार्ग, समुद्रसपाटी ते थेट सर्वात उंच हिमालय पर्वतरांग. कन्याकुमारी ते काश्मीर, विविध राज्य, भाषा, संस्कृतीतून केलेला हा प्रवास होता. हा प्रवास भावना आणि आव्हानांनी भरलेला होता. पर्वतरांगांमध्ये प्रवास करणे म्हणजे मृत्यूशी खेळणे आहे. तुमची एक चूक शेवटची ठरू शकते. इथं गुळगूळीत रस्ते नसतात. छोटासा दगड जरी टायरखाली आला तरी तुमचा तोल जाऊ शकतो. एकीकडे उचं पर्वत तर दुसरीकडे शेकडो फूट खोल दरी. कधीकधी तर रस्ते नव्हते, ओलांडण्यासाठी एकेरी गल्ल्या. जम्मू काश्मीरमध्ये नेटवर्क नसल्याने कोणाची मदत मिळणेही अवघड असते.
प्रवास सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच विश्रांती हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मी घरच्यांना वायफाय वापरून कॉल केला. दुसऱ्या दिवशी सूर्यास्त पाहत दल तलावाजवळ आराम करण्याचा आमचा बेत होता. हा आमचा पहिला पूर्ण विश्रांतीचा दिवस होता. आम्ही दुपारी दोनपर्यंत झोपलो, उठलो आणि जेवलो. निवांत झालो आणि दल सरोवरात नवचैतन्य आणायला गेलो. दल सरोवरावर किती विलोभनीय सूर्यास्त होता. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, या सर्व राज्यांमधून आम्ही प्रवास केला. दररोज नवीन सूर्योदय, नवीन सूर्यास्ता आणि नवीन रस्त्यांसह आमचा प्रवास सुरू झाला.
कन्याकुमारी ते काश्मीर.. अफलातून खाद्यसंस्कृती कन्याकुमारी येथील मासे, डोसा, इडली, दक्षिणेतील वडे, हैदराबादमधील बिर्याणी, नागपुरातील तर्री पोहे आणि साऊजी चिकन, मध्य प्रदेशातील कोफ्ते, दिल्लीतील चाट, पठाणकोटचे पराठे आणि काश्मीरचा वाजवान. हे सर्व अनुभवायला मिळाले. प्रत्येक दिवस हा जुना उत्साह असलेला नवीन दिवस होता.
काश्मीरमध्ये आपला राष्ट्रध्वज फडकवला, त्यामुळे आम्हाला आपल्या देशासाठी, देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली. प्रवासात आम्हाला अनेक जवानांनी थांबवून चौकशी केली. आमच्या राइडबद्दल ऐकून त्यांनाही कौतुक वाटले. अनकेदा लोक म्हणतात जग फिरले पाहिजे. माझंही तेच मत आहे. मात्र, त्याआधी एकदा आपला भारत देश फिरुन पाहा. त्यासमोर जग फिकं वाटेल, अशीच काहीशी भावना माझ्याही मनात निर्माण झाली. पुन्हा भेटू अशाच एका नव्या प्रवासात, नव्या आव्हानासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. - रसिका दळवी-बोरकर, बाईक रायडर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.