नवी दिल्ली, 09 जानेवारी : थंडीच्या मोसमात केस कोरडे
(Dry Hair) आणि निस्तेज होतात. त्यामागील मुख्य कारण म्हणजे केसांमध्ये ओलावा नसणं. त्यामुळं या ऋतूत केसांची काळजी घेणं
(Hair care) आवश्यक मानलं जातं. अनेकांनी केसांची निगा राखण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करतात. परंतु, अनेकदा त्यांच्याकडून नकळतपणे होण्याऱ्या चुकांमुळं केस खराब होऊ लागतात.
एका अहवालानुसार, सुमारे 90 टक्के लोक केस धुताना किंवा धुतल्यानंतर अनेक चुका करतात आणि त्यामुळे केस कोरडेपणा आणि निस्तेजपणा येतो. शिवाय, केस गळणंही
(Hair care tips) सुरू होतं.
गळणाऱ्या किंवा निर्जीव केसांची काळजी घेण्यासाठी त्यांनी हेअर केअर प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध असतात. मात्र, यातील बहुतेक उत्पादनं विविध रसायनांनी बनविली जातात. ती लगेच परिणाम देतात. परंतु, नंतर केसांचं खूप नुकसान होतं. त्यामुळं केसांची निगा राखण्यासाठी घरगुती उपाय करणं केव्हाही चांगलं. जाणून घेऊ, केसांची काळजी घेण्यामध्ये लोक कोणत्या चुका करतात.
बराच वेळ तेल लावून ठेवणं
केसांना तेल लावून मसाज करणं सर्वोत्तम मानलं जातं. असं असलं तरी काही वेळा लोक केसांना तेल लावून बराच वेळ ते तसंच ठेवतात. तेलामुळं केसांना पोषण मिळतं हे खरे आहे. मात्र, सध्याचं वातावरण अत्यंत खराब आणि प्रदूषित आहे. यामध्ये धूळ आणि इतर कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. आपण बाहेर फिरताना त्यामधील बरेचसे घटक आपल्या अंगावर आणि केसांवर बसतात. अशात केसांना तेल बराच वेळ लावून ठेवल्यानं ही सर्व धूळ आणि प्रदूषकं केसांमध्ये बऱ्याच काळासाठी स्थिर होतात. यासाठी केस धुण्याच्या सुमारे 4 ते 5 तास आधी केसांना तेल लावणं आताच्या काळात फायदेशीर ठरणारं नाही. उलट यामुळं केस गळण्यास सुरुवात होते. यासाठी केस चांगले धुवून केसांना तेल लावणं अधिक चांगलं आहे. यानंतर तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी केस धुवून ते सुकल्यानंतर बाहेर पडणं चांगलं.
गरम पाण्याने आंघोळ
थंडीत गरम पाण्यानं अंघोळ करायला सर्वांनाच आवडतं. मात्र, केसांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं पाहिलं तर, खूप गरम पाण्यानं आंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो. फार गरम पाण्यानं केस धुतल्यामुळं केसांची मुळं कमकुवत होतात आणि काही काळानंतर प्रदूषण, धूळ यामुळं त्यामध्ये कोंडा तयार होतो. यामुळं केस खराब होऊ लागतात. यासाठी हिवाळ्यात थंड किंवा कोमट पाण्यानेच केस धुवावेत.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
खूप जास्त शॅम्पूचा वापर
अनेकदा लोकांना असं वाटतं की जास्त शॅम्पू वापरल्यानं केस व्यवस्थित स्वच्छ होण्यास मदत होते, परंतु तसं नाही. शॅम्पू किती प्रमाणात वापरावा हे केसांच्या लांबीवर अवलंबून असतं. केस धुताना नेहमी शॅम्पू हातात घेऊन तो दोन्ही हातांच्या तळव्यांवर चोळून घ्यावा आणि नंतर केसांना लावावा. तसंच, शिकेकाई, रीठा, आवळा, संत्री-मोसंबी-लिंबू यांच्या वाळवलेल्या सालींची पूड आदी गरम पाण्यात भिजवून ठेवून त्या पाण्यानं केस धुणं खूप फायदेशीर आहे. केसांसाठी रासायनिक उत्पादनांचा वापर करण्याऐवजी पारंपरिक घरगुती उपायांचाच शक्यतो वापर करावा. तसंच, आहार सकस आणि चौरस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
कंडिशनरचा चुकीचा वापर
अनेकदा लोक कंडिशनर चुकीच्या पद्धतीनं वापरतात. ते संपूर्ण डोक्यावर कंडिशनर लावून ते जोरदारपणे घासतात. त्यामुळं केस तुटण्याचा धोका असतो. हे अजिबात करू नये.
हे वाचा - संसर्ग होऊ नये म्हणून आईनं मुलाला गाडीच्या डिकीत कोंबलं; अमेरिकेतील कोरोना स्थिती भयावह!
केस धुतल्यानंतर लगेचच कंगव्याचा वापर
ही चूक अगदी सामान्य मानली जाते. अनेक लोक केस धुतल्यानंतर लगेचच कंगवा वापरण्यास सुरुवात करतात. ओल्या केसांवर कंगवा किंवा ब्रश फिरवल्यानं केस तुटतात, त्यांची मुळं कमकुवत होतात आणि काही काळानंतर केस गळू लागतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.