मुंबई, 8 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ (Miss Trans Beauty Queen) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे जगाचं लक्ष लागलं होतं. ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ हा मानाचा मुकुट कोण पटकवणार याची लोकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. पाकिस्तानमधल्या (Pakistan) शायरा रायनं (Shyra Rai) ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ (Miss Trans Beauty Queen 2022) या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. शायरा राय पाकिस्तानची पहिली मिस ट्रान्स ब्युटी क्वीन असून, यापूर्वी दोन वेळा तिनं हा किताब मिळवला आहे. शायराचा हा प्रवास फार खडतर ठरला. या प्रवासादरम्यान तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. ती ट्रान्स गर्ल (Trans Girl) असल्याचं समजताच कुटुंबीयांनी तिच्याकडे पाठ फिरवली. त्या वेळी तिच्या दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते; मात्र जिद्दीच्या जोरावर शायरानं हा प्रवास करत मिस ट्रान्स ब्युटी क्वीनचा किताब मिळवला. पाकिस्तानमध्ये नुकतीच एक व्हर्च्युअल ब्युटी (Virtual Beauty) स्पर्धा चर्चेत होती. या स्पर्धेच्या माध्यमातून मॉडेल्सचा त्यांचं टॅलेंट दाखवण्याचं आणि यात विजेत्या ठरलेल्या मॉडेलला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली गेली. या पार्श्वभूमीवर ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ या स्पर्धा विशेष चर्चेत होती. या स्पर्धेत पाकिस्तानची शायरा राय विजेती ठरली. ‘मी पाकिस्तानची पहिली ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन’ असून, मी सातत्यानं दोन वर्षं विजेती ठरली आहे,’ अशी माहिती शायरा रायने ‘आज तक’शी बोलताना दिली. या वेळी शायरा म्हणाली, की ‘मला भारत (India) खूप आवडतो. तिथली संस्कृती (Culture), पर्यटनस्थळं आणि खाद्यपदार्थ मला आवडतात. दुबईतल्या रेस्टॉरंटमध्ये मी भारतीय पदार्थांचा (Indian Food) अनेक वेळा आस्वाद घेतला आहे. माझी जिवलग मैत्रीण लखनऊची आहे. मी भारतातल्या सर्व पर्यटनस्थळांना भेटी देऊ इच्छिते. भानगड किल्ल्याला भेट देण्याची माझी इच्छा आहे. भानगडमध्ये एखाद्या हॉरर सिनेमाचं शूटिंग व्हावं आणि त्यात माझी मुख्य भूमिका असावी, असं मला वाटतं. मी भारताविषयी खूप काही ऐकलं आहे. त्यामुळे मी तिथं यावं, असा मला मनोमन वाटतं; पण माझ्याकडे व्हिसा नाही. व्हिसा असता तर मी तात्काळ भारतात आले असते. मी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Actress Madhuri Dixit) फॅन आहे. त्यांच्याशी एकदा जरी संवाद साधायला मिळाला तरी माझं आयुष्य सफल झालं असं मला वाटेल.’
शायरा राय पाकिस्तानमधल्या लाहोरची (Lahore) रहिवासी आहे. लाहोरमध्येच तिचं शालेय शिक्षण झालं. शालेय शिक्षणानंतर ती कुटुंबीयांसमवेत दुबईला (Dubai) शिफ्ट झाली. पुढील शिक्षणासाठी तिनं एमीटी युनिव्हर्सिटी नोएडा दुबई कॅम्पसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिनं इंटिरिअर डिझायनिंग साठी बीएससीला प्रवेश घेतला; मात्र या कोर्समध्ये मन रमत नसल्याने तो सोडून दिला. त्यानंतर टुरिझममध्ये बीए केलं. यानंतर तिनं पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं. शायराला सुरवातीपासून गायनाची आवड होती. त्यामुळे शिक्षणानंतर तिला दुबईतील एका रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकीचा (Radio Jockey) जॉब मिळाला. या दरम्यान तिनं अभिनेत्री उर्वशी रौतेला, विद्या बालन, करण वाही, बोहेमिया आणि बोमन इराणींसह अनेकांच्या मुलाखती घेतल्या.
शायरानं सांगितलं की, ‘2020 मध्ये मी ट्रान्स गर्ल असल्याचं माझ्या कुटुंबीयांना समजातच त्यांनी मला घराबाहेर काढलं. माझ्याशी नातं तोडलं. त्या वेळी सहा महिने राहण्यासाठी तर सोडाच; पण खाण्यासाठी पैसेदेखील नव्हते. माझ्या एका व्हिडिओ डायरेक्टर मित्रानं 6 महिन्यांकरिता माझ्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली. काही दिवसांनंतर एका विवाह समारंभात माझी आणि माझ्या आई-वडिलांची भेट झाली. त्या वेळी तब्बल सहा महिन्यांनंतर त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. त्यांनी मला स्वीकारलं आहे, असं मी म्हणत नाही; पण मी एवढंच म्हणेन की माझ्याबद्दलची नाराजी दूर झाली आहे.’ 2020मध्ये पाकिस्तानात परतल्यावर तिला मिस पाकिस्तान ब्युटी कॉम्पिटिशनविषयी माहिती मिळाली आणि तिने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती ट्रान्स गर्ल असल्याचं सर्वांना सांगितलं. यानंतर सर्व जण तिला ओळखू लागले आणि तिच्या हिमतीचं कौतुक करू लागले. 2020 मधली ही स्पर्धा शायरा जिंकू शकली नाही. काही कमतरता राहिल्याने अपयश आलं असावं, असा विचार करून ती पुन्हा प्रयत्न करू लागली. त्यानंतर 2021 मध्ये तिने पुन्हा मिस पाकिस्तान ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला. ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करत असलेल्या कॅनडाच्या कंपनीच्या आयोजकांना ती भेटली. त्यांनी शायराला ग्रूमिंग, वॉक आणि ड्रेसअपविषयीचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतरही ज्युरी (Jury) तिच्या सादरीकरणावर खूश झाले नाहीत; मात्र अजून एक संधी देऊ असं सांगून त्यांनी तिला पोर्टफोलिओ शूट करण्यास सांगितलं. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पूर्ण काळजी घेऊन तिनं फोटोशूट पूर्ण केलं. ही बाब ज्युरींना फारच आवडली. त्यानंतर ज्युरींनी या स्पर्धेत मिस ट्रान्स क्वीन ही नवी श्रेणी निर्माण केली आणि 2021 मध्ये या श्रेणीतून तिनं हा किताब मिळवला. त्यानंतर 2022 मध्येही तिला मिस ट्रान्स क्वीन 2022 हा किताब देऊन गौरवण्यात आलं.