मुंबई, १९ एप्रिल- विरार- चर्चगेट लोकलमध्ये भांडण होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. दर दिवशी जागेवरून, उभं राहण्यावरून एवढंच काय तर कोणत्याही छोट्याशा कारणावरून लोकलमध्ये भांडण होऊ शकतं, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. रोज मरे त्याला कोण रडे यानुसार ट्रेनमधल्या भांडणाचीही लोकांना इतकी सवय झालेली असते की याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. मीही पाहत नव्हते पण त्या घटनेने मला पुरतं हादरून सोडलं. मी मंजिरी देशमुख आज तुम्हाला ट्रेनमध्ये माझ्यासमोर घडलेली अशी घटना सांगणार आहे, ज्याने तुम्हीही काही मिनिटं विचार कराल.. मी विरार- चर्चगेट ट्रेन फार क्वचित पकडते. ऑफिसला जायला फार उशीर झाला असेल तरच मी विरारची डबलफास्ट लोकल पकडते. त्या दिवशी मला ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्यामुळे मी विरारहून येणार फास्ट ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे ट्रेनमधल्या बायकांनी बोरिवलीकरांना शिव्या घालायला सुरूवात केली. त्यांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दूर्लक्ष करत आम्ही चढलो. मालाड, गोरेगाव गेलं नसेल तेवढ्यात डब्यातून भांडणाचा आवाज सुरू झाला. सुरुवातीला त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण नंतर डब्यातला आवाज वाढत गेला आणि सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. मी त्या भांडणापासून थोडी लांब उभी होती पण तिकडे काय सुरू आहे हे मला स्पष्ट दिसत होतं. शिवाय डब्यात मुंगी शिरायलाही जागा नव्हती त्यामुळे हलता येणंही शक्य नव्हतं. भांडणाची सुरुवात अर्थात सीटवर बसण्यावरून झाली होती. त्यांचं झालं असं की, बोरिवलीहून चढलेल्यी ४०- ४५ वर्षांच्या एका महिलेला बसायला जागा मिळाली. पण विरार ट्रेनच्या अलिखीत नियमांनुसार जे विरार वसई मिरारोड येथून प्रवास करत येतात त्यांना बसायला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. कधी तरी प्रवास करणाऱ्या त्या महिलेला या काहीही अर्थ नसलेल्या नियमाबद्दल माहीत नव्हतं. अंधेरीला उतरणाऱ्या एका महिलेने तिला जागा दिली आणि ती जाऊन बसली. मग काय तिथे उभ्या असलेल्या एका ग्रुपने तिच्यावर हल्लाबोलच केला. एकटी ती महिला आणि पाच ते सहा जणींचा ग्रुप असा वाद सुरू होता. त्या ग्रुपमधल्या बायका या २५ ते ३५ वयाच्या असतील. आपण कोणाशी, कोणत्या भाषेत भांडतोय याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नव्हतं. एका फोर्थसीटसाठी तो ग्रुप कोणत्याही खालच्या पातळीला जायला तयार होता, किंबहून गेला होता. ‘झुंड से मारो’ प्रमाणे त्या महिलेला सगळ्यांनी घेरलं. दरम्यान तिथे बसलेल्या एकाही बाईने तिची मदत केली नाही किंवा भांडण थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की, ती महिला जागा सोडत नाही हे कळल्यावर ग्रुपच्या काही मुलींनी त्यांना मारायला सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूच्या बायका मध्ये पडल्या पण तरीही त्या ऐकत नव्हत्या. ती ४०- ४५ वर्षांची बाई रडक होती.. कण्हत होती… पण मारणाऱ्यांना तिला अद्दल घडवायची होती. त्यांनी तिचा चष्मा मोडला… केस ओढले आणि तिच्या ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. चुकून त्या बाईचा श्वास बंद झाला असता तर.. तिचा मृत्यू झाला असता तर… एका फोर्थ सीट माणसाने कोणती पातळी गाठावी याचा विचार कोण करणार.. शेवटी मी कशीबशी तिथे जाऊन पोहोचले आणि त्या बाईला त्या विकृत ग्रुपपासून दूर केलं. त्या बाईमध्ये मला माझी आई दिसत होती. माझ्या आईसोबत असं झालं तर काय झालं असतं हाच विचार माझ्या मनात आला. तिला प्यायला पाणी दिलं आणि थोडं शांतं केलं. थोड्यावेळाने अंधेरी आल्यावर तिला उतरायला सांगितलं. अंधेरी स्टेशन गेल्यावर त्या विकृत मुलींनी एकमेकांना टाळी देत आनंद साजरा केला. त्यातली २६- २७ वर्षांची मुलगी पटकन बोलली, ‘चुकलं आपलं आपण तिला मारताना व्हिडीओ काढायला हवा होता..’ ते वाक्य माझ्या कानावर पडलं आणि मी सून्न झालं. माणूसकी संपली यावर माझा ठाम विश्वास पटला. जर माझ्या वयाची मुलं मुली अशाप्रकारे वागू शकतात तर आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या दुसऱ्या पिढीकडून काय अपेक्षा करणार… - मधुरा नेरुरकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







