Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग ३)

मी तिच्या आयुष्यातला खलनायक झालो होतो.. पण ती आजही माझ्या आयुष्यातली नायिका आहे.

  • Share this:

माझे हे शब्द ऐकताच तिचा आवाज कापायला लागला. माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तिचा एकच प्रश्न होता, तुझ्यावर प्रेम केलं हे चुकलं का रे माझं? ती प्रत्येक मार्गाने माझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. पण मी मात्र दगड झालो होतो. 'मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू म्हणशील तर मी नोकरी सोडते. मला नकोय करिअर... मला फक्त तू हवा आहेस. तुझ्या आईशी मी बोलू का एकदा.. मला एक संधी दे... सर्व नीट होईल... का असा वागतोस...

तिच्या प्रत्येक वाक्याने माझ्या मनाला पाझर फुटला होता. पण, काहीही झालं तरी तो मी तिला दाखवत नव्हतो. मी काहीच बोलत नाही हे लक्षात आल्यावर तिने तिने विचारलं, 'केव्हा भेटतोयस?' मीही काही उत्तर द्यायचं म्हणून लवकरच असं सांगितलं. पण खरं सांगायचं तर मला भिती होती की तिला पाहिल्यावर मी माझं मत बदलेन.. आता भेटलो तर तिला इथून घेऊन जायला मी मागे- पुढे पाहणार नाही. जगाची फिकीर करणार नाही. एवढंच काय तर मी माझा बँक बॅलन्सही तपासून पाहिला. पण साहजिकच पैसे अपुरे होते. शिवाय, या गोष्टी चित्रपटात चांगल्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र कठीण असतात याची जाणिवही होती. पण काय करणार जेव्हा गोष्ट प्रेमावर येते तेव्हा माणूस सर्व काही करायला तयार असतो. माझंही असंच काही झालं होतं.

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग १)

मी तिला भेटायचं नाही असं निश्चित केलं. मधल्या काळात केव्हातरी फोन, मेसेज सुरू होते. पण, अजूनही तिला भेटायची माझ्यात हिंमत होत नव्हती. अखेर दोन महिन्यांनी तो तिला भेटला. ती प्रचंड रागावली असल्याचं मला दिसत होतं. हे दोन महिने तिच्यासाठी कसे गेले असतील याचीही कल्पना होती. पण माझ्याकडेही काही पर्याय नव्हता. मी तिला चहा, कॉफीसाठी विचारलं पण तिने नकार दिला. दोन महिन्यांपूर्वी ढसाढसा रडणारी ती आज मला खंबीर वाटली.

थेट विषयाला हात घालत मी म्हणालो 'हो माझं चुकलं..' यावर चेहऱ्याचे हावभावही न बदलता ती म्हणाली, 'याच्या पुढे काहीतरी बोल रे! ५ मिनिटांत बोल. मला ट्रेन आहे.' माझा फक्त तिला पाहण्यात वेळ निघून गेला. ती बाय म्हणत निघून गेली, मी मात्र २ मिनिटं तिथेच थांबलो. थोड्या वेळाने तिला फोन केला. तिने विचारलं, 'आता काय राहिलं?' 'काही नाही एकदा शेवटचं तुला पाहीन म्हणतोय?' 'नको, तू जा! त्याचा काहीही उपयोग नाही. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मलाही देऊ नकोस. जेवढा दिलास तेवढा खूप झाला.' त्याचवेळी आमच्या नेहमीच्या स्टेशनवरची रेल्वेची अनाउन्समेन्ट सुरू झाली.

मी तरीही तिला विचारत होतो. ती जवळच कुठेतरी आहे हे मला कळलं होतं. लोकल येत होत्या, जात होत्या. सारे प्लॅटफॉर्म मी पालथे घातले पण ती कुठे दिसली नाही. पण, तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी ती दिसली. ट्रेनच्या दारात उभी होती. एकीकडे फोन सुरूच होता. ट्रेन तिथूनच सुटणार असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरून निघायला किमान ५ मिनिटं तरी होती. मी तिला पाहिलं आणि म्हणालो, 'इथे पाहा...' दोघांची नजरानजर झाली. मी होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून धावत तिच्यापर्यंत पोहोचलो.

Life in लोकल- मी आजही तिची त्याच प्लॅटफॉर्मवर वाट पाहतो (भाग २)

'मागे हो, लेडिज डब्बा आहे. उगाच शिव्या खाशील.' मी फक्त तिला पाहत राहिलो.. मला काहीच बोलायचं नव्हतं मला तिला फक्त डोळे भरून पाहायचं होतं. दोघांच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. ऊर भरून आला होता... कंठ दाटून आला होता... दोघं केव्हाही कोसळतील अशी स्थिती असताना ट्रेन सुटली.. ती दारातून मागे पाहत होती तर मी पायातले प्राणच गेल्याप्रमाणे पुढचे कितीतरी तास तिथेच उभा होतो. शिवाय नियतीचा खेळ तो पाहा.. त्याच लोकलच्या साक्षीनं मी तिला प्रेमाची कबुली दिली होती आणि याच लोकलच्या साक्षीनं आमचं निस्वार्थी आणि निरागस प्रेम संपलं होतं...

मी आजही अनेकदा त्या वेळेत त्याच प्लॅटफॉर्मवर जातो.. ती एकदा तरी दिसेल अशी भाबडी आशा मनात असते.. पण त्या दिवसानंतर ती मला कधीच दिसली नाही. मी तिच्या आयुष्यातला खलनायक झालो होतो.. पण ती आजही माझ्या आयुष्यातली नायिका आहे.

समाप्त...

- मधुरा नेरुरकर

First published: April 4, 2019, 9:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading