Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

Life In Local- ...जा आधी ट्रेनचे नियम शिकून या आणि मग बोला

सर्वसामान्यपणे स्त्रियांच्या डब्यात सीटवर बसण्यासाठी तुम्हाला आधीच विचारावं लागतं. एखादी फर्स्ट सीटची महिला उतरणार असेल तर त्या जागेसाठी ज्या महिलेने क्लेम केलं असेल तिला फोर्थ सीट मिळते.

  • Share this:

मुंबई, ८ एप्रिल- बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईच्या ट्रेनचं अमाप कौतुक असतं. याच कौतुकामुळे अनेकजण ऐन गर्दीच्यावेळीही ट्रेनमधून प्रवास करतात. अनेकांना लोकल ट्रेनचे अलिखित नियमही माहीत नसतात. त्यामुळे एखादं प्रेक्षणीय स्थळ पाहायला यावं तसे लोक ट्रेनमधून प्रवास करायला येतात. त्यामुळे अनेक किस्से घडतात.. मी श्वेता पवार आज तुम्हाला असाच एका किस्सा सांगणार आहे.

नेहमीप्रमाणे मी बोरिवलीहून ८.१० ची चर्चगेट फास्ट लोकल पकडली. ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर एकवरून सुटत असल्यामुळे इतर प्लॅटफॉर्मपेक्षा १० टक्के गर्दी या प्लॅटफॉर्मवर असते. याचमुळे बहूदा ती भाई आपल्या सात- आठ वर्षाच्या मुलाला घेऊन चढली. मी चर्चगेटला उतरणार असल्यामुळे आत सीटवर जाऊन बसले.

सुरुवातीला बोरिवलीला चढूनही ती बाई विरुद्ध दिशेच्या दरवाजावर जाऊन उभी राहिली. शक्यतो लेडीज डब्यात कोणीही कोणाला ज्ञान द्यायला जात नाही. शिवाय बोरिवलीला चढून विरुद्ध दिशेला उभी राहिल्यामुळे अनेकांना तिला कांदिवली मालाड स्टेशनवर उतरायचं असेल असंच वाटलं. थोड्यावेळाने कांदिवलीला उतरणाऱ्यांनी तिला कुठे उतरणार असा प्रश्न केला. यावर तिने मरिन लाइन्स असं उत्तर दिलं.

तिचं हे उत्तर ऐकताच कांदिवलीला उतरणाऱ्या महिलांमध्ये अचानक एकता जागृत झाली आणि सगळ्या मिळून तिला ओरडू लागले. तोवर कांदिवली स्टेशन येणार असल्यामुळे सर्वांनी तिला दरवाज्यावर उभं राहण्यापेक्षा आत जायला सांगितलं. तशी ती मुलाला फरफटत नेत गर्दीतून आत जाण्याचा प्रयत्न करत होती. बोरिवली स्टेशन ज्या दिशेला येतं त्याच दिशेला बाकी सर्व स्टेशन येतात असा तिचा समज होता. तिच्या या समज गैरसमजामुळे नेहमी प्रवास करणाऱ्या इतरांची ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची सगळी गणितं चुकली होती.

डब्यात आत आल्यावर तिने मुलाला खिडकीपाशी उभं केलं आणि स्वतः फोर्थ सीटकडे उभी राहिली. सर्वसामान्यपणे स्त्रियांच्या डब्यात सीटवर बसण्यासाठी तुम्हाला आधीच विचारावं लागतं. एखादी फर्स्ट सीटची महिला उतरणार असेल तर त्या जागेसाठी ज्या महिलेने क्लेम केलं असेल तिला फोर्थ सीट मिळते. महिलांच्या डब्यात रोटेशनने सीट मिळते. हाच अलिखित नियम त्या नव्याने प्रवास करणाऱ्या महिलेला माहीत नव्हता. त्यामुळे अंधेरीला उतरण्यासाठी एक महिला उभी राहिल्यावर ही महिला त्या सीटवर जाऊन बसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र इतरांनी तिला रोखल्यामुळे ती चक्क वाद घालायला लागली. पण पुन्हा एकदा ट्रेनमधली यूनिटी दिसली आणि त्या महिलेला दादर येईपर्यंत उभं राहावं लागलं.

दादरला सर्वसामान्यपणे ट्रेन बहुतांशी रिकामी होते. दादरला त्या महिलेला बसायला जागा मिळाली. ती मुलाला घेऊन बसली.

ज्याक्षणी ती बसली त्या क्षणापासून ती आणि तिचा मुलगा सतत खातच होते. खाल्ल्यानंतर ती कागद आणि प्लॅस्टिक ट्रेनमध्येच टाकत होती. आतापर्यंत शांतपणे बसलेले मी तिला फटकारलं. ट्रेनमध्ये घाण करू नका. यातून आम्ही नेहमी प्रवास करतो असं सांगितल्यावर ती ही ट्रेन म्हणजे तुझं घर आहे का असा प्रश्न तिने मला केला. मग काय माझ्यासोबत इतर महिलांनीही तिला चांगलंच धारेवर घेतलं. एकतर कधी तरी प्रवास करतात आणि आम्हाला ट्रेनमधले नियम शिकवतात.. जा आधी ट्रेनमधून प्रवास करण्याचे नियम शिकून या आणि मग आम्हाला बोला असे एक ना अनेक टोमणे त्या बाईला मरिन लाइन्स येईपर्यंत ऐकावे लागले होते.

ती बाईही शांत बसणारी नव्हती आपणच कसे योग्य आहोत हे सांगण्याचा ती पूर्ण प्रयत्न करत होती. पण तिला कल्पना नव्हती की ती भांडतेय कोणाशी.. मुंबईच्या ट्रेनमधून नियमित प्रवास करणाऱ्यांच्या रक्तातच कोणत्याही विषयावरून टोकाचं भांडण करण्याचं कौशल्य उपजत असतं. त्यासाठी त्यांना कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे जर भविष्यात तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला मुंबई ट्रेनचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांना दुपारच्यावेळी फिरायला सांगा किंवा आधी ट्रेनच्या प्रवासाचे नियम समजून घ्यायला सांगा.. नाहीतर भांडणं अटळ आहेतच...

- मधुरा नेरुरकर

First published: April 8, 2019, 8:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading