Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

Life In लोकल : ती ९.१५ ची लेडीज लोकल आणि...

मुंबईकर आणि लोकल हे एक वेगळंच समीकरण आहे. म्हणजे मुंबईकर हक्काने त्यांचा राग लोकलवर काढू शकतात आणि लोकलदेखील सख्या मित्रासारखी नेहमी उशिरा येते.

  • Share this:

मुंबई, २० मार्च- मुंबईकर आणि लोकल हे एक वेगळंच समीकरण आहे. म्हणजे मुंबईकर हक्काने त्यांचा राग लोकलवर काढू शकतात आणि लोकलदेखील सख्या मित्रासारखी नेहमी उशिरा येते. खरंतर पहाटे दारात वासूदेव यायचा, पण मुंबईमध्ये पहाटेपासूनच लोकल पकडायची घाई असते. सकाळी देवपूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून लोकलमध्ये भजनं म्हटली जातात. ती गर्दी, तो गोंधळ. कितीही नकोसा वाटला तरी त्याच्यासोबतचं नातं काही वेगळंच आहे.

कळत नकळत लोकलमध्ये मैत्रीही होते आणि वैरही. आज मी मधुलिका कोशे तुम्हाला लोकलमधल्या मैत्रीबद्दल आणि काही अलिखीत नियमांबद्दल सांगणार आहे. सकाळी कितीही वाजता उठले तरी सकाळची ९.१५ ची लेडिज लोकल पकडण्यासाठी मी वाट्टेल ते करेन. तसं ऑफिसमध्ये थोडं फार उशीरा गेलं तरी चालतं पण मलाच ती ट्रेन सोडायची नसते त्यामुळे सकाळपासून घरातल्या गोष्टी पटापट आटपून मी लेडिज लोकल पकडतेच.

मी दहिसरला राहते तर माझी मैत्रीण ज्योत्सना भाईंदरला. एकच ट्रेन अनेक महिने पकडल्यामुळे तिची साहजिकच इतरांसोबत ओळख झाली होती. माझ्यासाठी त्या सगळ्या नवीन होत्या. सुरुवातीचे काही दिवस मी एकटी त्यांचं बोलणं ऐकत बसायचे. पण कधी त्यांच्या विषयांमध्ये मी बोलायला लागले आणि त्यांच्यातलीच एक झाले हे कळलं नाही. काही महिन्यांनी ज्योत्सनाचं ऑफिसला जाण्याची वेळ बदलली. त्यामुळे ती आमच्या ९.१५ च्या लोकलला येणं बंद झाली. पण मी मात्र त्यांच्यातली एक होऊन गेले.

१४- १५ जणी आम्ही जेव्हा एकत्र डब्यात गप्पा मारतो तेव्हा इतरांसाठी आम्हाला पाहत राहण्यातच एक मजा येते. दिवसातल्या अर्ध्या एक तासाच्या ओळखीसाठी लोक वाट्टेल ते करायलाही तयार असतात. लोकं असं कसं करू शकतात असा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण जेव्हा मी त्यांच्यातली एक झाले तेव्हा हे असं का असतं याचं उत्तर मला मिळालं.

ट्रेनमध्येच आम्ही एकमेकींचे बर्थडे साजरे करतो. एखाद्या दिवशी ठरवून प्रत्येकजण घरात तयार केलेला पदार्थ आणणार आणि सर्व मिळून दहिसर ते चर्चगेटदरम्यान त्याचा फडशा पाडणार. चुकून कधी ही ठरलेली लोकल चुकली तर दिवसाची सुरुवातच खराब झाली अशी अवस्था व्हायची. सर्वसाधारणपणे ट्रेनमध्ये ज्यांचे ग्रुप होतात त्या आपल्या मित्र- मैत्रीणींसाठी जागा अडवून ठेवतात. काहीही झालं तरी त्यांच्या जागेवर दुसऱ्या प्रवाशाने बसलेलं त्यांना आवडत नाही. आमच्याबाबतीत असं कधीच झालं नाही. आम्ही कधी एकमेकींसाठी जागा अडवली नाही किंवा दुसरं कोणी बसलं तरी उठवलं नाही. आमच्यासाठी त्या ट्रेनमधल्या जागेपेक्षा मनामध्ये पक्की केलेली जागा अधिक महत्त्वाची होती आणि नेहमीच राहील.

खरं सांगायचं तर आज मला नक्की असं वाटतं की प्रत्येकाचं ट्रेनमधली एखादी मैत्रीण किंवा मित्र नक्की असावा. त्यांच्याकडून कळत- नकळत आपण अनेक गोष्टी शिकतो ज्या आपल्या आयुष्यात फार उपयोगी पडतात. तसेच एकाचवेळी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसोबत दररोजचा प्रवास केल्यामुळे तुमच्या अनेक सकारात्मक बदल होतात हा माझा अनुभव आहे.

- मधुरा नेरुरकर

First published: March 20, 2019, 6:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading