मुंबई, २३ एप्रिल- ट्रेनमध्ये तुम्ही जेव्हा नियमित प्रवास करता तेव्हा तुम्हाला दररोज नवनवीन अनुभव मिळतच असतात. अनेकदा आपण आपल्याच विश्वात एवढे रममाण झालेले असतो की, आपल्या अवतीभवती काय सुरू आहे याचा थांगपत्ताही आपल्याला नसतो. मी शरद माने नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी वाशीवरून सीएसटीला जाणारी ट्रेन पकडत होतो. तेव्हा वाशी स्टेशनवर मला असं काही दृष्य दिसलं की ज्याने मला अंतर्मुख केलं.
पाठीवर बिराड घेऊन फिरणाऱ्यांपैकीच एक कुटुंब वाशी स्टेशनवर बसलं होतं. नवरा बायको आणि त्यांची कमी वयातली तीन चार पोरं स्टेशनवर अगदी हे आपलंच घर आहे या आविर्भावात बसले होते. सर्वात लहान मुलीचं वय एक ते दोन वर्षांपेक्षा जास्त नसेल. त्यांना ना कालची पर्वा होती ना उद्याची चिंता... तर दुसरीकडे मी मात्र दोन महिन्यांनी परीक्षा आहे, त्यात चांगले टक्के नाही मिळाले तर पुढच्या अॅडमिशनचं काय होईल या विचारात गढून गेलेलो.
त्या लहान मुलीला खेळायला तिच्या आईने चिंधीच्या कपड्यांनी तयार केलेला बॉल दिला होता. ती त्या बॉलसोबत खेळण्यात एवढी मग्न होती की, तिला जणू जगाचा विसर पडला होता.
एवढ्यात माझ्या बाजूला एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली. त्या मुलाचं वयही फार नाही तर तीन ते चार वर्ष असेल. त्याच्या आईने त्याला उचलून घेतलं होतं. ट्रेन यायला वेळ असल्यामुळे तिने त्याला खाली ठेवलं. तसा तो मुलगा रडू लागला, म्हणून त्याच्या हातात आईने महागडं खेळणं दिलं. तसा तो शांत झाला. त्या खेळण्याकडे पाहत त्याचा थोडा वेळ गेला. पण कदाचित त्या खेळण्याचाही त्याला कंटाळा आला असेल आणि तो रडू लागला. यानंतर ती आई त्याचं रडू थांबवण्यासाठी अनेक गोष्टी करत होती.
एव्हाना त्या चिंधीच्या बॉलने खेळणाऱ्या मुलीचंही लक्ष त्याच्या रडण्याकडे गेलं. ती थोडावेळ शांत उभी राहिली आणि नंतर त्याच्याकडे जाऊन तिने स्वतःचा माखलेला चिंधीचा बॉल त्याला देऊ केला. त्या मुलालाही कदाचित तो बॉल हवा असेल त्याने रडणं थांबवत बॉल घेण्यासाठी हात पुढे केला पण तेवढ्यात त्याच्या आईने त्याला मागे खेचून घेत त्याला बॅगतलं दुसरं चांगलं स्वच्छ खेळणं दिलं. पण त्या मुलाला मात्र तोच बॉल हवा होता. एव्हाना त्या मुलीच्या आईनेही हे सर्व पाहिलं आणि तिला स्वतःकडे बोलावून घेतलं. तोवर ट्रेन आली आणि ती आई आपल्या रडणाऱ्या मुलाला घेऊन ट्रेनमध्ये बसली आणि निघून गेली. तोवर ती दोन्ही मुलं एकमेकांकडे पाहतच होती.
-मधुरा नेरुरकर