Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

तिचं ते बोलणं डब्यात उभ्या असलेल्यांच्या काळजात असं काही रुतलं की, या मुलीला आपण मदत नाही केली ही अपराधी भावना साऱ्यांच्या मनात होती.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 02:25 PM IST

Life In लोकल- विरार ट्रेनमधल्या त्या भांडणामुळे ती आजीच्या अंतयात्रेला वेळेत पोहोचू शकली नाही

मुंबई, १७ एप्रिल- विरार ट्रेनमध्ये तुम्ही कधीही चढा तुम्हाला किमान गर्दी ही मिळतेच. त्यातही पिक अवरला चढलात तर मग काही बोलायचीच सोय नाही. त्यातही बोरिवलीला ट्रेन थांबणं हेच बहूधा बोरिवलीच्या पुढे राहणाऱ्यांना पटत नाही. बोरिवलीत फक्त माणसं उतरण्यासाठीच ट्रेन थांबावी. बोरिवलीहून कोणी चढू नये अशीच काहीशी त्यांची अजब इच्छा असते. मीही त्यांच्यातली आहे की नाही माहीत नाही.. कदाचित अनेक वर्ष बोरिवली ते चर्चगेट प्रवास केल्यामुळे आणि आता भाईंदरला राहायला आल्यामुळे मी बोरिवलीकरांचं मन जास्त समजू शकते असं मला वाटतं. मी चैत्राली परुळेकर आज तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहे जो पाहिल्यावर माझं मन पुरतं हलून गेलं होतं. माणूसकी जवळपास संपलीच यावर माझा ठाम विश्वास व्हायला लागला होता.

अनेकदा ऑफिस अवरच्या वेळी ट्रेनमध्ये एवढी गर्दी होते की, मुंगी शिरायलाही जागा नसते. त्यात बोरिवलीतली माणसं चढली तर दहिसरसाठी उभं राहिलेल्या त्रास होतो. पण फास्ट ट्रेन का सोडा.. घरी, कामावर १० मिनिटं लवकर जाऊ असाच विचार सगळे करतात. यात चुकीचं काहीच नाही.. कारण कामाला जायला उशीर होतो तेव्हा अशा डबल फास्ट गाड्यांची फार मदत होते. पण अनेकांना हे पटतंच असं नाही.

एक साधारण २५ ते २६ वर्षांची मुलगी मुंबई सेंट्रलला विरार गाडीत चढली आणि ती आत जाऊन उभी राहिली. तिला बोरिवलीला उतरायचं होतं. दादर गेलं... वांद्रे गेलं.. अंधेरी गेलं.. त्यानंतर आता बोरिवली येणार म्हणून ती दाराकडे जायला निघाली. आधीच गाडी खच्चून भरलेली त्यात ती वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. प्रत्येकजण तिला वाट करून देत होतं पण जेव्हा त्यांना तिला बोरिवलीला उतरायचं कळत होतं तेव्हा अचानक प्रत्येकजण तिला ज्ञानाची दोन वाक्य ऐकवून दाखवत नाखूश होऊन जागा देत होतं.

दहिसरची मोठी लाइन पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं टेंशन मला स्पष्ट दिसत होतं. कशीबशी ती पुढे गेली आणि डोअरच्या दोन पावलं मागे होती. तिने पुढे असणाऱ्या बाईला तिला बोरिवलीला उतरायचं असल्याचं सांगितलं आणि जागा द्यायला सांगितली. पण डोअरवरच्या दोन्ही बायका आणि त्यांच्या मागेच उभ्या असलेल्या अजून एका बाईने तिला उतरायला मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलं. इथे हलायलाही जागा नाही आणि तुम्ही बोरिवलीवाले का आलात?... तुम्हाला तुमच्या ट्रेन नाहीत का? अशा लोकांना उतरायलाचं दिलं नाही पाहिजे तेव्हा हे सुधारतील आणि दुसऱ्यावेळी विरार ट्रेनमध्ये चढणार नाहीत...

ती मुलगी सारख्या विनवण्या करत होती पण त्या महिलांनी तिला उतरू न देण्याचंच ठरवलं. यात मागे उभ्या असलेल्या आणि दहिसरलाच उतरणाऱ्या काही महिलांनी मध्यस्ती केली आणि त्यांचं हे वागणं चुकीचं असल्याचं सांगितलं. पण त्या तीन बायका कोणाचंही ऐकून घेत नव्हत्या. शिवाय तू का बोलतेस.. तुला तर दहिसरला उतरायचं आहे ना मग तिची बाजू का घेतेस असं बोरिवलीला जिला उतरायचं आहे ती काही बोलत नाही आणि बाकीचेच तोंड चालवतात हा तर्क लावून त्या तीन बायका इतरांशी भांडायला लागल्या.

Loading...

दरम्यान, ती मुलगी रडकुंडीला आली होती. तिला काही करून बोरिवलीत उतरायचं होतं पण त्या तीनही बायका तिला तसूभरही जागा करून देत नव्हत्या. शिवाय दाराच्या दुसऱ्या बाजूने मालाड- कांदिवलीवरून चढलेल्या बायकांमुळे पलिकडे जाणंही शक्य नव्हतं. बोरिवली स्टेशन तर जवळ येत होतं. त्या तीन बायकांच्या चेहऱ्यावर मुलीला चांगलीच अद्दल घडवल्याचे भाव होते तर मुलगी आता रडायलाच लागली होती. मुलीने आपल्या हातातला मोबाइल काढला आणि कोणाला तरी फोन लावत रडत म्हणाली, ‘काका मी येते.. आजीची बॉडी नेऊ नका.. बोरिवलीत उतरेन. थोडावेळ थांबा..’

तिचं ते बोलणं डब्यात उभ्या असलेल्यांच्या काळजात असं काही रुतलं की, या मुलीला आपण मदत नाही केली ही अपराधी भावना साऱ्यांच्या मनात होती. त्या मुलीचं रडणं थांबत नव्हतं आणि बोरिवलीत तिला उतरायलाही मिळालं नव्हतं. त्या तीन बायकांचे चेहरे पाडण्यासारखे होते. गरज नसतानाचा दाखवलेला शहाणपणा त्यांना नडला होता. त्या मुलीला शेवटी दहिसरलाच उतरावं लागलं आणि पुन्हा मागे बोरिवलीचा प्रवास करायला लागला होता.

जराशी माणुसकी जर त्यांनी दाखवली असती तर ती मुलगी वेळीच आपल्या घरी पोहोचली असती. बोरिवलीला उतरणार या रागापायी त्यांनी आयुष्यभराची जखम त्या मुलीला दिली होती. तो क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर आजही ट्रेनमध्ये चढताना मला एकच प्रश्न पडतो.. बोरिवलीत आणि विरारमध्ये वेगळ्या हाडाची माणसं राहतात का? बोरिवलीच्या पुढे राहणाऱ्यांनाच घरी लवकर जायचं असतं का? ट्रेनसाठी आणि नकोत्या मान अपमानासाठी आपण माणुसकी हरवत चाललो आहोत का?

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2019 08:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...