मुंबई, ११ एप्रिल- मुंबईची ट्रेन म्हटलं की त्यात वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर सगळंच आलं. कारण ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांचे कमी अधिक प्रमाणात अनुभव सारखेच असतात. मी अचेशा अंकोलेकर माझा थोडासा वेगळा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मी विलेपार्ल्यात राहते. माझं शिक्षण, ऑफिस सगळंच दक्षिण मुंबईमध्ये झालं. शिवाय कामाच्या निमित्ताने म्हणा हवं तर फार फार तर बोरिवलीपर्यंत जाणं व्हायचं.. २७ वर्षांमध्ये मी विरार वसई फक्त एकदा किंवा फार फार तर दोनदा पाहिलं असेन. पण काही महिन्यांनंतर मला ते दररोज पाहायला मिळणार होतं. कारण माझं लग्न विरारमध्ये राहणाऱ्या मुलाशी होणार होतं. आतापर्यंत मी अनेकांना लांब राहतात म्हणूनच नकार दिला होता. आता माझा जन्म पार्ल्यासारख्या ठिकाणी झाला यात काही माझा दोष नाही. ट्रेनने चर्चगेटपर्यंतचा प्रवास असो किंवा बोरिवली.. हार्बल लाइनच्या प्रवास कुठेही जायला मला फार वेळ लागत नाही. शिवाय स्ट्रेशनपासून हाकेच्या अंतरावर घर असल्यामुळे तो प्रवासही वाचतो. हे कारण लग्नाला नकार द्यायला काहींना फारच चुकीचं किंवा माज करणारं वाटू शकतं. पण तुम्ही हे आयुष्यभर अनुभवता, त्यानंतर तुमच्यात एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. त्यातही मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे प्रवासातच संपतं असं म्हणतात. मला माझं आयुष्य तसं संपवायचं नव्हतं, त्यामुळेच मी लांब राहणाऱ्या मुलांना नकार देत होते. त्यातही आपण काय आहोत याची पूर्ण कल्पना असल्यामुळे फक्त लग्नासाठी शक्य नसतानाही काही गोष्टींना होकार देणं मला पटत नाही. त्यातून प्रॉब्लम्स जास्तच वाढत जातात. यावर अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात, पण माझ्या बाबतीत जे होतं ते असंच काहीसं होतं. अचानक माझ्या आयुष्यात सिद्धेश आला. अरेंज मॅरेज करण्याचं ठरत असताना मी लव्ह मॅरेज करत होते. शिवाय माझं सासर विरारला होतं. लग्नापेक्षाही मला नंतरच्याच प्रवासाची सर्वात जास्त टेंशन होतं. एरव्ही अर्ध्या ते पाऊण तासात मी ऑफिसवरून घरी यायचे पण आता त्याच प्रवासाला मला दोन तास लागणार होते. मला याचाच विचार करून टेंशन आलं होतं. सवयीने सर्व गोष्टी होतात असं म्हटलं जातं पण माझ्याकडून झालं नाही तर… मग काय.. बरं मला तो प्रवास जमला नाही तर त्यात माझा तरी काय दोष… अशावेळी मला सासरचे समजून घेतील ना ही शंकाही मनात येते. कधी कधी विरार वसईची ट्रेन मी पकडायची तेव्हा मला या महिला कशा काय एवढ्या लांबचा प्रवास करत असतील. फक्त एवढंच नाही तर हा प्रवास करून ऑफिसचं काम करून त्या घरचं कामही तेवढ्याच शिताफीने कसं काय करू शकतात हा मला नेहमीच प्रश्न पडायचा. आता यांच्यातलीच मी एक होणार हा विचार मला खरं तर पटत नाहीये. प्रवासाववरून मी कधी एवढा विचार करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण, म्हणतात ना की आयुष्यात अनेक गोष्टी नव्याने घडत असतात आणि तुम्हाला जे नको असतं त्याचे तुमच्या समोर येऊन पडतं. पाहू.. मला कसं जमतंय ते… - मधुरा नेरुरकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







