Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

Life In Local- ऐन गर्दीत ते कपल पुरुषांच्या डब्यात चढलं आणि...

या सगळ्याचा त्या दोघांवर काहीही परिणाम झाला नाही. ते दोघं संपूर्ण ट्रेन रिकामी आहे याच आर्विभावात एकमेकांशी त्या गच्च ट्रेनमध्ये गप्पा मारत होते.

  • Share this:

मुंबई, ९ एप्रिल- संध्याकाळी ७.३० वाजताची वेळ. कामावरून सुटून चाकरमानी घरी जाण्याची वेळ. त्यामुळे ट्रेनलल लोकलल गर्दी काय असू शकते याचा विचार करता येऊ शकतो. खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये अचानक कपल चढलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल... नेमकी तिच माझीही होती. मी सुरज यादव तुम्हाला माझा ट्रेनमधला हाच अनुभव सांगणार आहे. कुर्ला स्थानकावर मी स्लो ट्रेन पकडायला उभा होतो. ट्रेन आली तिच भरून आली. कसं बसं दरवाज्यावर उभं राहायला जागा मिळाली. पण त्याचवेळी एक कपल पुरुषांच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होते. ती मुलगी कशी बशी ट्रेनमध्ये चढली त्यामुळे पर्यायाने मुलालाही आत शिरायला जागा द्यावी लागली.

ट्रेनमध्ये दोघं एकमेकांना बिलगून उभे होते. त्यामुळे साऱ्यांचीच पंचाईत झाली होती. पुरुष मंडळींना तर धड बोलता येईना आणि काही सांगतादेखील येईना. प्रत्येकजण आपआपल्या परिने स्वतःला सावरत आणि मुलीला धक्का लागणार नाही याची काळजी घेत पुढे सरकत होते.

या सगळ्याचा त्या दोघांवर काहीही परिणाम झाला नाही. ते दोघं संपूर्ण ट्रेन रिकामी आहे याच आर्विभावात एकमेकांशी त्या गच्च ट्रेनमध्ये गप्पा मारत होते. लोक चढत होते.. उतरत होते. पण, ते दोघं जागचे हलले देखील नाहीत. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एकजण मोठ्याने बोललंच.. यांना गर्दीचीच वेळ मिळते का चढायला.. यांना दुसरी जागा नाही का... आता गर्लफ्रेंडसोबत आहे म्हटल्यावर त्या मुलालाही चेव आला. आपणही काही कमी नाही हे दाखवण्याच्या तोऱ्यात तो अरे ला कारे करू लागला. अखेर हमरीतुमरीवर आलेला विषय हाहा म्हणता शांत झाला.

त्याचवेळी मी देखील एक हलकासा कटाक्ष त्या मुलीकडं टाकला. पण, त्यावेळी तिच्या डोळ्यात काही वेगळंच भाव होते. ते म्हणतात ना, डोळेदेखील बोलतात... तसा हा प्रकार. जेन्टस डब्ब्या चढलेलं तिला कदाचित आवडलं नव्हतं. पण तरुणाच्या हट्टपायी आणि प्रेम आहे मग घाबरायचं का? या भंपकगिरीसाठी तिने पुरुषांच्या डब्यात चढण्याचा निर्णय घेतला असावा. तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला होता. पण तिचे डोळे काही वेगळंच सांगत होते.

हा सारा प्रकार पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न येऊन गेले की खरंच शरीराने एकत्र येणं किंवा सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या नजरेत येऊ असं वागणं म्हणजे प्रेम का? तसं असेल तर मग जे असं वागत नाहीत त्यांचं एकमेकांवर प्रेम नसतं का? नेमकी प्रेमाची व्याख्या तरी काय? अशा प्रसंगांत तिच्या किंवा त्याच्या मनाचा विचार केव्हा होणार? खरंच ऐन गर्दीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी असं प्रदर्शन करणं योग्य? (याला संस्कृती रक्षणाचा संदर्भ कृपया जोडू नका.) आजच्या तरणाईला हवं तरी काय? आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न खरं प्रेम म्हणजे काय? त्याची व्याख्या काय? शिवाय ते ठरवणार कोण?

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या