Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

अनेक घटना तर नकळत पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. तर अनेकदा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या गोष्टी डोळ्यांना दिसतात.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 02:12 PM IST

Life In लोकल : अन् सत्तारभाईंचा चालत्या ट्रेनमध्येच प्राण गेला

मुंबई, 21 मार्च- खरंतर मुंबईच्या लोकलबद्दल बोलण्यापेक्षा लोकलने प्रवास करण्याचा अनुभवच काही भन्नाट असतो. असेच काही सगळ्यात वेगळे अनुभव आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या प्रवासात दररोज नानाविध घडामोडी घडत असतात. अनेक घटना तर नकळत पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. तर अनेकदा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या गोष्टी डोळ्यांना दिसतात. घटना कुठली आणि कोणतीही असो ती घडल्यानंतर मुंबईला मात्र त्याचं फारसं काही वाटत नाही. ती तशीच अविरत पळत राहते अखंड... कुठेही न थांबता..

कल्याणला मुंबई मध्य रेल्वेचे उपनगरीय शहरांमधील प्रवेशद्वार म्हटले जाते. अशाच एका रविवारी सायंकाळी शिवाजी महाराज टर्मिनर्सवरून सुटलेल्या पंजाब मेलमधील ही घटना. घटना म्हणावं तर सामान्य आणि म्हणावं तर फार विचार करायला लावणारी.. जातीचा आणि धर्माचा आधार घेऊन उभ्या असलेल्या व्यवस्थेचे पाश गळून पडतील असे होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Life In लोकल ः मुंबईची लाइफ लाइन असलेल्या तुमच्या आमच्या लोकलमधल्या कथा सांगणारी विशेष सीरिज... कधी मनाला भावणाऱ्या तर कधी विचार करायला लावणाऱ्या सत्यकथा दररोज आम्ही घेऊन येणार आहोत. तुमचीही अशी कोणती कथा असेल तर आम्हाला नक्की सांगा. या सीरिजच्या माध्यमातून आम्ही ती मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Loading...

सीएसटीवरून सुटलेल्या आणि ठाणे वगळता कुठल्याही स्थानकावर न थांबता थेट कल्याणच्या दिशेने धावणाऱ्या पंजाब मेलच्या एस-१० या बोगीमधील ही घटना. या बोगीतून एक मुस्लिम कुटुंब प्रवासाला निघालं होतं. कोणतंही बुकींग न करता ते कुटुंब प्रवास करत होते. कल्याणला बरीचशी गर्दी कमी होते म्हणून त्यांनी या बोगीतून प्रवास करण्याचं ठरवलं होतं. रिझर्व्हशेनची बोगी सोडून त्याच्याच मागे असलेल्या जनरलच्या डब्यात चढण्यासाठी सत्तार भाईंच्या पत्नी मुमताज यांनी त्यांच्या दोन लहान मुलांना उतरवण्यासाठी तयार रहायला सांगितलं. तिकडे सत्तारभाईंना डोळा लागला होता. मुमताज यांनी त्यांना उठवलं, पण सत्तारभाई डोळेच उघडत नव्हते. ते हालचालही करत नव्हते. खूप प्रयत्न करूनही सत्तारभाई उठत नव्हते. अखेर त्यांचं लोकलमध्येच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं कळलं.

तातडीने स्टेशन मास्तरांना बोलावण्यात आलं. त्यांना सत्तारभाईंकडे पाहत काय झालं याची कल्पना आली, शिवाय बोगीतील इतर माणसांनी त्यांना घडलेल्या गोष्टीची कल्पना दिली. अखेर स्टेशन मास्तरांनी आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि सत्तारभाईंचा निपचित पडलेला देह ट्रेनच्या बाहेर काढण्यात आला आणि स्ट्रेचरवर ठेवण्यात आला. यावेळी आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी पाहणाऱ्यांपैकी काही प्रवाशांना स्ट्रेचरला हात लावण्याची विनंती केली. यावेळी जाती- पातीचे सर्व पाश गळून पडले. लगेच चारजण मदतीला येत सत्तारभाईंचा स्ट्रेचरवर पडलेला देह उचलून घेऊन गेले.

हा एका ठराविक जातीचा तर हा दुसऱ्या धर्माचा याचा तिथे उपस्थितांपैकी कोणीही विचार केला नाही. या सर्व गोष्टी मागे सारत ती चौघं सत्तारभाईंचा देह घेऊन पुढे चालत होता. त्यांच्यामागे पत्नी आणि तिची दोन मुलंही चालत होती. पुढील सर्व कार्यवाईसाठी त्यांचा मृतदेह रेल्वेच्या रुग्णालयात नेण्यात आला. तर रेल्वेच्या पोलीस चौकीत त्यांची पत्नी आणि दोन मुलं शुन्यात नजर लावून एका कोपऱ्यात उभी होती.

मुमताज यांना मागे ठेवून सत्तारभाई कायमचे निघून गेले होते. पण त्या कल्याण स्टेशनवरील पोलीस स्थानकातील प्रत्येकजण मुमताज यांच्या मदतीसाठी धावत होते. आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे मुमताजचं दुःख त्यांना आपलं वाटत होतं.

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 06:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...